पर्यवरण, अर्थकरण अनु मनुष्य

जगात जेथे कोठे मनुष्याने पाऊल ठेवले नाही, तिथे तिथे पर्यावरण समृद्ध आहे. प्रकृतीमधील मनुष्य वगळता इतर सर्व जीवसृष्टी, त्यातल्या सूक्ष्म जीवांपासून पशू, पक्षी, वनस्पती यांचे जीवन प्रकृतीचक्राच्या नैसर्गिक शाश्वत नियमांनुसार चालते. निसर्गातील जीवांचे, प्रकृतीचे परस्परावलंबन, त्यांची अन्नसाखळी, त्यांचे उपजत प्रेरणांनी नियंत्रित केलेले जीवन, त्यांची पोटाच्या आकाराइतकीच मर्यादित भूक, त्यांच्या संपूर्ण जीवनात एकही असा पदार्थ ते निर्माण करीत नाहीत, ज्याचे प्राकृतिक विघटन होत नाही, हे सगळे फक्त डोळे उघडे ठेवून पाहिले, तरी मनुष्याचे प्रकृतीबद्दलचे प्राथमिक आकलन पक्के व्हायला हरकत नाही.
संपूर्ण जीवसृष्टी आणि मनुष्य यांच्यात एक अत्यंत महत्त्वाचा फरक हा आहे, की प्रकृतीमधील एकाही जीवावर संपत्तीचा प्रभाव चालत नाही, आणि मनुष्यावर सर्वाधिक अंमल, वर्चस्व संपत्तीचे आहे. मनुष्याची भूक त्याच्या पोटाच्या आकारावर ठरत नाही. तो उत्क्रांतीच्या दृष्टीने सर्वश्रेष्ठ असला, तरी तो प्रकृतीच्या बहुतांश नियमांचे धडधडीत उल्लंघन करणारा प्रकृतीचा मारेकरी ठरावा इतका पतीत झाला आहे. त्याने विकासाच्या नावाखाली तयार केलेली प्रत्येक व्यवस्था अर्थ केंद्रित आहे. त्यानेच निर्माण केलेल्या संपत्तीचे त्याच्यावर इतके वर्चस्व आहे, की या जगात समाधानाने जगायला नेमकी किती संपत्ती लागेल? याचा विवेक असणारा एकही मनुष्य सूक्ष्मदर्शक भिंग घेऊन शोधला तरी सापडणं अवघड आहे.
विकास म्हणजे काय?
मनुष्य ज्याला विकास म्हणतो, तो विकास म्हणजे नेमकं काय? तर मनुष्य कधीच निर्माण करू शकत नाही, अशा पंचमहाभूतांची (पृथ्वी, जल, तेज, वायू, आकाश) त्याने चलनात ठरवलेली किंमत होय. तो जमिनीची, पाण्याची, हवेची, सौर ऊर्जेची आणि ज्या घरात तो कधीच रहात नाही, तरीही गुंतवणूक म्हणून विकत घेऊन कुलूप लावून ठेवलेल्या घरातील पोकळीची किंमत चौरस फुटावर ठरवतो. मनुष्याला अन्नाची नैसर्गिक भूक नव्हे तर संपत्तीची अनैसर्गिक भूक लागलेली आहे, आणि ती अनिवार आहे. या अनैसर्गिक भुकेमुळे तो अगोदर समस्या निर्माण करतो आणि मग ती सोडविण्यासाठी केलेल्या कामाची किंमत पैशात करतो.
मनुष्याने निर्माण केलेलं विज्ञान जेव्हा अगदी बाल्यावस्थेत होतं, तेव्हा यत्किंचितही प्रदूषण नसल्याने जगातील सर्व जलस्रोत शुद्ध होते. कोणत्याही नदीचं पाणी पिण्यायोग्य होतं. आधुनिक परिभाषेत अग्हक्त होतं. मनुष्याने साबणापासून अॅसिडपर्यंत जे जे शोधून काढलं, वापरलं, यातून तयार झालेले सांडपाणी त्याने गटारी बांधून नदीच्या प्रवाहाच्या दिशेने जमिनीला स्वाभाविक उतार असल्याने तिकडे सोडून दिलं. पाणी प्रदूषित करण्याचा पराक्रम केल्यावर अनारोग्य वाढलं. मग त्याने नदीत सांडपाणी सोडणं न थांबवता मिनरल वॉटरच्या नावाखाली शुद्ध पाण्याची हजारो कोटींची बाजारपेठ तयार केली. ते पाणी कुठेही कुणालाही विकता यावे यासाठी प्लास्टिकच्या बाटल्या वापरल्या. पाणी विकत घेऊन तहान भागवली, की बाटल्या कोण सांभाळणार? त्या कोणीही कुठेही फेकायला सुरुवात केली. मग हा प्लास्टिकचा कचरा गोळा करण्याची, त्याच्या प्रक्रिया करण्याची वेगळी बाजारपेठ. त्या प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये जास्त काळ ठेवलेले पाणी पिण्याने कॅन्सर होतो असा शोध लागला.
बाजारपेठेचे दुष्टचक्र
मनुष्याचे डोळे संधीचा अंदाज येऊन चांगलेच चमकले. त्याने जलस्रोत शुद्ध करण्याऐवजी ते प्रदूषण तसेच ठेवून, प्लास्टिकचा वापर चालूच ठेवून आता पॅन्सरवर उपचार करण्यासाठी मोठमोठी हॉस्पिटल्स, पॅन्सरच्या उपचारासाठी महागडी औषधे निर्माण केली. हा लाखो ऊपयांचा उपचारांसाठी लागणारा खर्च बहुतांश लोकांना मुळीच परवडणार नाही, याची भीती दाखवून मेडिक्लेम, आरोग्य विम्याची हजारो कोटींची वेगळी बाजारपेठ तयार केली. आरोग्य चांगले असले, तरी तुम्ही केव्हाही आजारी पडू शकता, अशी भीती दाखवून आरोग्य विम्याची बाजारपेठ रोज कशी वाढवता येईल, यासाठी केलेल्या प्रयत्नांचा भाग म्हणून आरोग्य विम्याचे मार्केटिंग करणारी हजारो माणसं आधुनिक व्यवस्थापन तंत्र या नावाखाली चांगल्या पगाराचं, कमिशनचं आमिष दाखवून तयार केली. या आश्चर्यकारक उलाढालीत सरकारला भरभक्कम कर मिळतात म्हणून सरकार खूश. कमिशन मिळतं म्हणून एजंट खूश. आपल्याला न परवडणारे उपचार चांगल्या हॉस्पिटलमध्ये घेता येतील म्हणून भविष्यात होतील अशा व्याधींच्या भीतीने भेदरलेले भावी ऊग्ण खूश. कंपन्यांची उलाढाल वाढते त्यामुळे त्याही खूश. त्यांचे वेगवेगळे कन्सल्टंट पैसा मिळतो म्हणून खूश. पहा एका पाण्याच्या प्रदूषणातून बुद्धिमान मनुष्याने अक्षरश: लक्षावधी कोटी ऊपयांची बाजारपेठ कशी निर्माण केली!
राक्षसी भुकेला चाप
मनुष्याच्या या राक्षसी भुकेला थोडीशी वेसण घालावी, यासाठी प्रकृतीने मानवी डोळ्यांना न दिसणारा एक अतिसूक्ष्म विषाणू-कोरोना नावाचा मनुष्याच्या श्वासातून आत सोडला. पटापट माणसं मरायला लागली. ही भेदरलेली कोट्यावधी माणसं घरात सक्तीने बसली, मृत्यूचे भय खरंच फार भयंकर असते. नद्यांचे प्रदूषण नाहिसे करून त्यांचे प्रवाह शुद्ध करण्यासाठी सरकारने हजारो कोटी ऊपये खर्च करूनही ज्या नद्यांचे पाणी शुद्ध झाले नाही, त्या सर्व नद्यांचे पाणी केवळ मनुष्य नावाचा महाभयंकर प्राणी मृत्यूच्या भीतीने घरात काही महिने कोंडून ठेवल्याने अक्षरश: स्फटिकासारखं शुद्ध झालं. तेसुद्धा सरकारने दमडीही खर्च न करता! हे सगळ्या जगाने प्रत्यक्ष अनुभवलं, तरी सृष्टीच्या शाश्वत नियमांचे आकलन करून घेत त्यांचे दैनंदिन जीवनात पालन करून शारीरिक, मानसिक आरोग्य, आणि मन:शांती विनामूल्य मिळवावी इतके शहाणपण मनुष्य अजूनही शिकला नाही. याचा विचार करायला त्याला वेळ नाही. जशी मनुष्याची पिण्याच्या पाण्याची गरज मर्यादित असते. तशीच त्याने त्याच्या आर्थिक गरजांचेही चिंतन शांतपणाने केले तर तो आता करतो तेवढा अगदी दमछाक होईल इतका संपत्तीचा पाठलाग करणार नाही. संपत्ती हे ध्येय न मानता ती एक उत्तम साधन मानली तर आपले आधुनिक जीवन आणि निसर्ग यातील संतुलन अधिक चांगले कसे राहील? याबद्दलचा विवेक मानवी वर्तनात दिसेल.
प्रकृतीचे लाडके अपत्य माना
मनुष्याच्या अमर्याद लालसेने तो फक्त निसर्गाचं शोषण करतो असे नव्हे तर तो स्वत:च्या सुखालाही ग्रहण लावण्याची आत्मघाती चूक करत असतो. थोडक्यात मनुष्य जेव्हा इतर जीवांसारखा स्वत:ला प्रकृतीचे लाडके अपत्य मानायला लागेल, तेव्हा त्याला संपूर्ण प्रकृती आणि तिच्या आधाराने जगणारे अनंत जीव यांच्याबद्दल प्रेम आणि आस्था वाटेल. मनुष्य ज्यांच्यावर जीवापाड प्रेम करतो, त्यांना दु:खी पाहू शकत नाही, हे खरे आहे. म्हणूनच त्याला त्याने प्रकृतीवरही निस्सीम प्रेम करावे, यासाठी संस्कारित करणे आवश्यक आहे. एकदा त्याला हे समजले, की त्यानंतर तो त्याच्या जीवलगांची जशी काळजी घेतो, तशीच निसर्गाचीही काळजी आपोआप घेईल. आपल्याला असा निसर्गाशी मनाने, जाणीवेने एकरूप होणारा समाज घडवायचा आहे. मग पर्यावरणाची चिंता करावी लागणार नाही.
प्राणवायू उद्यानाचा प्रकल्प साकारला
अभियांत्रिकी पदवीका घेतलेले अभय भंडारी बांधकाम व्यावसायिक आहेत. हिंदू धर्म आणि संस्कृती याचा त्यांना गाढा अभ्यास आहे. याशिवाय तत्त्वज्ञान, राष्ट्रपुरुषांची चरित्रे व जीवनकार्य, भारतीय कृषी, शिक्षण, आरोग्य, अर्थकारण, राजनिती, प्रशासन, जागतिकीकरणानंतरचा बदलता भारत, स्वदेशी, स्वातंत्र्य, स्वराज्य आणि सुराज्य हे त्यांच्या चिंतनाचे विषय आहेत. विटा या गावाजवळ गार्डी येथे साडेतीन एकर माळरानावर पाणी व वीज उपलब्ध नसताना दोन हजार वृक्षांची लागवड करून प्राणवायू उद्यानाचा प्रकल्प साकारला आहे. यात पारंपरिक वृक्ष संपदा आता बहरली आहे. गेल्या 18 वर्षांत आजपर्यंत यासाठी 16 लाख 80 हजार लिटर पाणी टँकरने विकत घेऊन वापरले. महाराष्ट्रासह ठिकठिकाणी त्यांनी दोन हजारहून अधिक व्याख्याने दिली आहेत.
-अभय देवीदास भंडारी
