दलित समाजातील उद्योजकांनी योजनांचा लाभ घ्यावा
कर्नाटक दलित उद्योग संघाचे राज्याध्यक्ष डॉ. एल. हनुमंतया यांचे आवाहन
बेळगाव : समाजातील आर्थिक मागास असलेल्या दलित बांधवांनी स्वत:चा व्यवसाय सुरू करण्यासाठी पुढे आले पाहिजे. दलित उद्योगपती होणे गरजेचे आहे. उद्योगधंदे सुरू करण्यासाठी सरकारच्या वेगवेगळ्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन कर्नाटक दलित उद्योगपती संघाचे राज्याध्यक्ष तसेच माजी राज्यसभा सदस्य डॉ. एल. हनुमंतया यांनी केले. कर्नाटक दलित उद्योगपती संघातर्फे शहरातील एका हॉटेलमध्ये दलित समाजातील उद्योगपतींना मार्गदर्शन करण्यासाठी मेळाव्याचे आयोजन केले होते. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संघटनेचे राज्याध्यक्ष डॉ. एल. हनुमंतया, कार्याध्यक्ष श्रीनिवास, बेळगाव जिल्हा अध्यक्ष शिवानंद संजीवगोळ, कार्याध्यक्ष डॉ. अरविंद घट्टी, कार्यदर्शी सुरेश तळवारसह मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
उपस्थितांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मार्गदर्शन मेळाव्याला सुरुवात करण्यात आली. कार्याध्यक्ष अरविंद घट्टी यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी जिल्हा अध्यक्ष शिवानंद संजीवगोळ म्हणाले, एखादा व्यवसाय सुरू करताना वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावे लागते. दलित समाजातील नागरिकांना व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकारच्या विविध योजना आहेत. मात्र त्याचा योग्यरित्या लाभ घेतला पाहिजे. जमीन खरेदी करण्यासह कर्ज घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे देणे गरजेचे आहे. वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून सबसिडी देखील दिली जाते. या योजनांचा लाभ घेऊन दलित समाजातील तरुण-तरुणी मोठ्या झाल्या पाहिजेत, असे ते म्हणाले. मार्गदर्शन मेळाव्याला उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.