महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

प्रवेशद्वार...

06:42 AM Jan 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

(गीतेतील दुसऱ्या अध्यायातील 60वा श्लोक)

Advertisement

गीतेच्या दुसऱ्या अध्यायात आलेला हा श्लोक खरंतर इंद्रियांसाठी लिहिलाय. इंद्रिये म्हणजे शरीराचे दार. इंद्रीये जी फसवी असतात, त्याचे हे वर्णन. अगदी महाभारतातील मयसभेसारखी, ज्याच्यात रांगोळी समजून फसून दुर्योधन पाण्यात पडतो. अशी ही द्वारं म्हणजे आमची पाच इंद्रिये. ज्ञानाची म्हणून काम करत असली तरी आम्ही कमीत कमी कष्टात जास्तीत जास्त सुख कसं मिळवता येईल याचाच आयुष्यभर विचार करत असतो. अगदी नोकरीवर पगार घेत असलो तरी नोकरीच्या वेळेत शेअर्सची काम करणं, इन्शुरन्स विकणे, अगदी महत्त्वाची कागदपत्रसुद्धा विकणे यात आम्ही तरबेज असतो. शिवाय ऑफिसातले काम करताना प्रत्येक फायलीचे वेगळे पैसेसुद्धा घेत असतो. आणि त्या माणसावर उपकार केल्यासारखं काम करत असतो. कारण एकच ‘इंद्रिया पडले वळण’ ऑफिसच्या वेळात काम करणाऱ्या, फुलांचे गजरे करणाऱ्या, तासंतास फोनवर बोलणाऱ्या, सतत बाहेर जाऊन चहा पिणारे, वेळ काढणारे कितीतरी सरकारी नोकर पाहिले आहेत. अशावेळी हे ज्ञान किंवा जाणीव देणारी इंद्रिये खरंच फसवी असतात आणि आम्हाला चुकीच्या मार्गावर नेत असतात. ज्याला आमच्या शरीराची प्रवेशद्वारे म्हटले जातात. ही सगळी इंद्रिये आमच्याकडून चुकीची काम करून घेण्यात तरबेज असतात आणि प्रसंगी आम्हाला तोंडघशी पाडत असतात. जिभेला आवडलेला गोड पदार्थ पोटाचे तीन तेरा वाजवतो, डोळे सतत दुसऱ्याचे वाईट शोधत असतात, कानाला तर सतत काहीतरी दुसऱ्यांबद्दल वाईट ऐकण्याची आवड असते. देवाचं नाव, भजन कीर्तन टाळण्याकडेच या कानाचा कल असतो. यालाच ‘कानाडोळा करणे’ म्हणतात. अशा इंद्रियांना संयम शिकवायला खूप कष्ट पडतात. एकनाथांकडे एकदा एक बाई आपल्या लहान मुलाची तक्रार घेऊन आली होती. हा रोज खूप गुळ खातो म्हणून. तेव्हा एकनाथांनी त्याच्यावर काहीही उपाय न सांगता त्यांना दहा दिवसांनी यायला सांगितले. या दहा दिवसात त्यांनी स्वत: आपल्या जिभेवरती नियंत्रण मिळवलं, गुळ खाणं पूर्ण बंद केलं आणि मगच त्या मुलाला उपदेश केला. अशा घटना अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतक्याच. आम्ही मात्र सतत इंद्रियांचंच ऐकत होतो. आम्हाला व्यायाम करायला कधीच आवडत नाही, सुखाची झोप मात्र खूप आवडते. आमची इंद्रिये नाठाळ असतात, तेच आपल्याकडून हवं नको ते करून घेत असतात आणि म्हणूनच या गीतेने इंद्रियांना ‘नरकाची द्वारं’ असे म्हटले आहे. आम्हाला जन्मण्याचे दार माहिती आहे परंतु ज्या दाराच्या पलीकडे आम्हाला जायचे त्याची आम्हाला सुतराम कल्पना नसते. या दारातून पलीकडे जाताना आमची इंद्रिये किंवा शरीर आमच्याबरोबर येणार नसतं. आमची कर्म फक्त आमच्याबरोबर असणार. म्हणून अशावेळी आम्ही कसं वागलं पाहिजे हे स्वत: ठरवायला हवं. नाहीतर आमचा नरकाचा प्रवास सुरू झालाय असंच मानायला हवं. आमच्या पाप पुण्याच्या कल्पना खरंतर आता आम्हाला बदलायला हव्यात. स्वत:च्या सुखासाठी जगणारी इंद्रिये दुसऱ्याला दु:खाचे त्रासाचे मार्ग ठरतात आम्ही मात्र बेफिकीर वृत्तीने या इंद्रियांचंच कौतुक करत असतो, म्हणून या दरवाजांचे स्वभाव बदलण्याचा प्रयत्न करायला हवा कारण ती जुनाट दरवाजासारखी सतत कुरकुरत असतात. आदळ आपट करत असतात किंवा स्वत:च आतून कडी लावून बसल्यासारखे वागतात पण ते असे दरवाजे जेव्हा दुसऱ्यांसाठी उघडतील, दुसऱ्याच्या कामी येतील तेव्हा खरा आनंद तिथे निर्माण होईल. सुगरणीच्या घरट्याचे दार आत गेल्याशिवाय दिसतच नाही. कोकणातल्या सिंधुदुर्ग किल्ल्याचे दारदेखील तुम्हाला बाहेरून कुठूनही दिसणार नाही. त्याच्या जवळ जायला लागतं. अशी दारं बघता बघता कधीतरी स्वर्गाचे दारसुद्धा समोर येतं. म्हणजेच देवाचे दार. या देवाच्या दारात आम्ही क्षणभर उभं राहायला हवं, तेव्हा खऱ्या अर्थाने स्वर्ग प्राप्ती होतेच. ‘देवाचिये द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्ती चारी साधीयेल्या’ असं ज्ञानदेवांनी म्हणूनच ठेवलंय. म्हणून अशा दारात क्षणभर उभं राहण्याचं काम आपण करायला हवं. देवाचे दर्शन घ्यायला हवं आणि मगच आपापली कर्म नित्यनेमानी करायला हवीत. अशी दारं घराचीसुद्धा होऊ शकतात. आम्ही घरात जाताना माझ्या घरी चाललो असे म्हणतो पण आम्ही देवाच्या घरात राहतो असं कोणीही चुकूनही म्हणत नाही, या अहंकारी स्वभावामुळे आमचं घर कधीच देवघर बनत नाही. आम्हाला आमच्या घरावर स्वत:चं नाव लावायला आवडतं. स्वत:चं कौतुक करून घ्यायला आवडतं. घरात गेल्यानंतर आमच्या स्वत:च्याच नावाची मेडल, फोटो, सर्टिफिकेट, भिंतीवर लावतो. देवाला मात्र एखादा कोपरा किंवा कपाटाच्या खाली, कपाटावरती अशी जागा आम्ही ठेवतो. दार मात्र ही सगळी गंमत बघत असतं. जसं जसं आमचं देवाकडे जास्त लक्ष जाईल तस तसे या गोष्टी आपोआपच कमी होत जातील. असाच एक देव पूर्वीच्या काळी आपले ज्ञानाचे दरवाजे लावून बसला होता. लोकांच्या अपमानाने कासावीस झाला होता. लोकांना किती समजावलं तरी दगडावर डोकं आपटलं असंच वाटायचं. अशा वेळेला योग माया मुक्ताबाईने या दरवाजावर थाप मारली आणि कळकळीची विनंती केली. हे दार ताटीच दार होतं आणि नंतर ते उघडलं ते लोक कल्याणासाठी. समाजाचं अज्ञान त्याच्यामुळे संपलं आणि लोकांना आत्माराम भेटायचा स्वर्गाचा मार्ग उघडा झाला. अशी दारं तुम्हा आम्हाला सापडायला हवीत.

Advertisement

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article