मेक्सिकोत पूरामुळे वाहून गेले पूर्ण गाव
60 हून अधिक लोकांचा मृत्यू
वृत्तसंस्था/ मेक्सिको सिटी
मेक्सिकोत पूर आणि भूस्खलनामुळे मोठे नुकसान झाले अहे. पूरामुळे 400 लोकांचे एक पूर्ण गाव नकाशावरून मिटले आहे तसेच अनेक भागांचा संपर्क तुटल आहे. अनेक ठिकाणी अडकून पडलेल्या लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात येत आहे. हजारो सैनिक आणि नागरी कार्यकर्ते लोकांना वाचविण्यासाठी आणि रस्ते पूर्ववत करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
पूर आणि भूस्खलनामुळे आतापर्यंत 64 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण बेपत्ता असल्याची पुष्टी मेक्सिको सरकारने दिली आहे. दुर्गम भागांमध्ये हजारो लोक बेपत्ता असून मोठ्या जीवितहानीची भीती अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. मेक्सिकोच्या पश्चिम किनाऱ्यावर दोन उष्णकटिबंधीय वादळांच्या प्रभावामुळे अतिवृष्टी झाली आहे. यामुळे नद्यांना मोठा पूर आला असून पर्वतीय भागांमध्ये भूस्खलन होत आहे. रस्ते पूर्ववत करत लोकांना धान्यपुरवठा करून त्यांना सुरक्षितस्थळी हलविण्यास सरकारने प्राथमिकता दिली असल्याचे मेक्सिकोच्या अध्यक्ष क्लाउडिया शीनबाम यांनी सांगितले आहे.
प्रशासन आणि सैन्याकडून लोकांना वाचविण्यासाठी जोरदार प्रयत्न केले जात आहेत. अनेक लोकांनी अमेरिकेत राहत असलेल्या स्वत:च्या नातेवाईकांकडून मदत मागितली आहे, अमेरिकेत राहत असलेल्या लोकांनी भाड्याने हेलिकॉप्टर घेत अनेक लोकांना वाचविले आहे. मेक्सिकोच्या वेराव्रूज, हिडाल्गो आणि पुएबाल प्रांतांमध्ये पूरामुळे मोठे नुकसान झाले आहे. हिडाल्गो येथे सुमारे 1 लाख घरांचे नुकसान झाले आहे. वेराक्रूजमध्ये 29 जणांना जीव गमवावा लागला आहे.