सेंथिलकुमार, अनाहत सिंग विजेते
वृत्तसंस्था / चेन्नई
इंडियन टूरवरील येथे झालेल्या पुरूष आणि महिलांच्या आंतरराष्ट्रीय स्क्वॅश स्पर्धेत पुरूषांच्या विभागात भारताचे राष्ट्रीय विजेते वेलावन सेंथिलकुमारने तर महिलांच्या विभागात अनाहत सिंगने विजेतेपद पटकाविले.
पुरूषांच्या विभागातील झालेल्या अंतिम सामन्यात भारताचा टॉपसिडेड आणि जागतिक क्रमवारीत 46 व्या स्थानावर असलेला व्ही. सेंथिलकुमारने इजिप्तच्या अॅडॅम हेवेलचा 11-7, 11-9, 9-11, 11-4 अशा गेम्समध्ये पराभव करत जेतेपद पटकाविले. या सामन्यात चेन्नईच्या सेंथिलकुमारने शेवटच्या गेममध्ये दर्जेदार खेळ केल्याने त्याला जेतेपद मिळविता आले.
महिलांच्या विभागातील अंतिम सामन्यात 29 व्या मानांकीत अनाहत सिंगने आपल्याच देशाच्या माजी टॉपसिडेड जोश्ना चिन्नप्पाचा 11-8, 11-13, 11-13, 11-6, 11-8 असा पराभव केला. गेल्याच महिन्यात झालेल्या डॅली कॉलेज इंडियन खुल्या स्क्वॅश स्पर्धेत अनाहत सिंगने जोश्ना चिन्नप्पाला पराभूत केले होते.