पहिल्या टी-20 सामन्यात इंग्लिश महिलांची बाजी
वृत्तसंस्था /मुंबई
येथील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या पहिल्या टी-20 सामन्यात इंग्लंडच्या महिला संघाने भारतीय महिला संघाचा 38 धावांनी पराभव केला. इंग्लंडच्या विजयात डॅनियल वॅट, नेट सायव्हर ब्रंट आणि सोफी एक्लेस्टोन यांनी दिलेले योगदान महत्वाचे ठरले. या विजयासह इंग्लंडने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. उभय संघातील दुसरा सामना दि. 9 रोजी वानखेडेवरच खेळवण्यात येईल. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने निर्धारित 20 षटकांमध्ये 6 गडी गमावत 197 धावा केल्या. इंग्लंडसाठी डॅनियल वॅटने 75, तर नेट सायव्हर ब्रंटने 77 धावांची सर्वोत्तम खेळी केली. सलामीवीर सोफिया डंकले (1) आणि कर्णधार हेदर नाईट (6) स्वस्तात बाद झाल्या. ऍलिस कॅप्सी एकही धाव करू शकली नाही. यष्टीरक्षक फलंदाज एमी जोन्स अवघ्या 23 धावांवर बाद झाली. भारतासाठी राधिका सिंगने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. श्रेयांका पाटील हिने 2 बळी घेतले. प्रत्युत्तरात विजयासाठी मिळालेले 198 धावांचे लक्ष्य भारतीय संघ गाठू शकला नाही. 20 षटकांमध्ये भारतीय संघ 6 बाद 159 धावांपर्यंतच मजल मारू शकला. भारतासाठी एकट्या शेफाली वर्माने (52) अर्धशतक केले. कर्णधार हरमनप्रीत कौर (26), रिचा घोष (21), आणि कनिका अहुजा (15), स्मृती मानधना (6) आणि जेमिमा रॉड्रिग्ज (4) या स्टार खेळाडूंनी सपशेल निराशा केली. गोलंदाजीत सोफी एक्लेस्टोनने 4 षटकात 15 धावा खर्च करून 3 विकेट्स घेतल्या. नेट सायव्हर ब्रंट, फ्रेया केम्प आणि सारा ग्लेन यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
भारतीय कर्णधार हरमनप्रतीचा असाही विक्रम
भारत व इंग्लड महिला संघातील पहिला टी-20 सामना बुधवारी वानखेडे स्टेडियमवर पार पडला. हा सामना इंग्लंड संघाने 38 धावांनी जिंकला. असे असले, तरीही भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने एक अनोखा विक्रम आपल्या नावे केला. ती आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक सामने खेळणारी महिला खेळाडू ठरली आहे. इंग्लंडविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यात नाणेफेकीसाठी मैदानात उतरताच हरमनप्रीत कौर विश्वविक्रम करण्यात यशस्वी झाली. आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून हा तिचा 101 वा सामना होता. तिने ऑस्ट्रेलियाची दिग्गज माजी कर्णधार मेग लॅनिंग हिला मागे टाकले. तिने टी-20 क्रिकेटमध्ये 100 सामन्यात नेतृत्व केले होते. इंग्लंडची चार्लोट एडवर्ड्स 93 टी-20 सामन्यात नेतृत्व करण्यासोबत यादीत तिसऱ्या स्थानी आहे.