For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

इंग्लंडचा विजयी प्रारंभ

06:45 AM Dec 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
इंग्लंडचा विजयी प्रारंभ
Advertisement

पहिल्या कसोटीत न्यूझीलंडवर टी 20 स्टाईलने मात :  अवघ्या 76 चेंडूत जिंकला सामना

Advertisement

वृत्तसंस्था/ ख्राईस्टचर्च

ख्राईस्टचर्च येथील हॅगले ओव्हलच्या मैदानावर खेळवल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत इंग्लंडने न्यूझीलंडचा पराभव केला आहे. इंग्लंडने हा कसोटी सामना टी 20 शैलीत जिंकला. किवी संघाने दिलेले लक्ष्य इंग्लंडने अवघ्या 12.4 षटकांत पूर्ण केले. इंग्लंडकडून जेकब बेथेलने अवघ्या 37 चेंडूत नाबाद 50 धावा केल्या. तर जो रुट 15 चेंडूत 23 धावा करुन नाबाद परतला. सामन्यात 10 विकेट्स घेणाऱ्या ब्रायडेन कारसेला सामनावीराचा किताब मिळाला. या विजयासह इंग्लंडने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. उभय संघातील दुसरा सामना दि. 6 ते 10 डिसेंबरदरम्यान वेलिंग्टन येथे खेळवण्यात येईल.

Advertisement

बॅझबॉलसाठी प्रसिद्ध असलेल्या इंग्लंडने न्यूझीलंडविरुद्ध आपल्या अनोख्या शैलीत विजय मिळवला. पहिल्या कसोटीत इंग्लंडसमोर विजयासाठी 104 धावांचे लक्ष्य होते. जे पाहुण्या संघाने चौथ्या दिवशी अवघ्या 12.4 षटकांत म्हणजेच अवघ्या 76 चेंडूत पूर्ण केले. या सामन्यात न्यूझीलंड संघाने पहिल्या डावात 348 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात इंग्लंडने पहिल्या डावात 499 धावा केल्या व 151 धावांची महत्वपूर्ण आघाडी घेतली. इंग्लंडकडून हॅरी ब्रूकने सर्वाधिक 171 धावांची खेळी खेळली.

न्यूझीलंडचा संघ 254 धावात ऑलआऊट

चौथ्या दिवशी 6 बाद 155 धावसंख्येवरुन त्यांनी पुढे खेळायला सुरुवात केली. अनुभवी डॅरिल मिचेलने शानदार अर्धशतकी खेळी साकारताना 167 चेंडूत 12 चौकार व 1 षटकारासह 84 धावांचे योगदान दिले. मिचेलच्या या शानदार खेळीमुळे न्यूझीलंडला दोनशेचा टप्पा गाठता आला. त्याला इतर फलंदाजांची मात्र अपेक्षित साथ मिळाली नाही. नॅथन स्मिथ 21 धावा काढून बाद झाला तर मॅट हेन्रीला एकच धावा करता आली. टीम साऊदीही 12 धावा करुन माघारी परतला. मिचेल शेवटच्या विकेट्सच्या स्वरुपात बाद झाल्यानंतर न्यूझीलंडचा डाव 254 धावांत आटोपला. इंग्लंडकडून ब्रायडेन कारसेने सर्वाधिक 6 बळी घेतले.

इंग्लंडला विजयासाठी 104 धावांचे टार्गेट

न्यूझीलंडला 254 धावांत ऑलआऊट केल्यानंतर इंग्लंडला केवळ 104 धावांचे लक्ष्य मिळाले. जे त्यांनी दोन गड्यांच्या मोबदल्यात आरामात गाठले. सलामीवीर जॅक क्रॉली दुसऱ्याच षटकात स्वस्तात बाद झाला. मात्र बेन डकेट व जेकब बेथेल यांनी आक्रमक खेळताना 55 धावांची भागीदारी केली. डकेट 18 चेंडूत 27 धावा काढून पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर बेथल आणि रुट या जोडीने इंग्लंडला विजयापर्यंत पोहचवले. बेथलने 37 चेंडूमध्ये नाबाद अर्धशतक केले तर जो रुटने 15 बॉलमध्ये 23 रन्स केल्या. इंग्लंडने अशाप्रकारे 12.4 ओव्हरमध्येच हा सामना जिंकला. बेथेल 8 चौकार व 1 षटकारासह 50 धावावर नाबाद राहिला.

संक्षिप्त धावफलक

न्यूझीलंड पहिला डाव 348 व दुसरा डाव 254

इंग्लंड पहिला डाव 499 व दुसरा डाव 12.4 षटकांत 2 बाद 104 (क्रॉली 1, डकेट 27, बेथेल नाबाद 50, रुट नाबाद 27, मॅट हेन्री व ओरुरके प्रत्येकी एक बळी).

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत मोठा फेरबदल

टीम इंडियाला घरच्या मैदानावर पराभूत करून 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेत क्लीन स्वीप करणाऱ्या न्यूझीलंडला इंग्लंडविरुद्ध दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. तीन सामन्यांच्या कसोटीतील पहिल्या सामन्यात इंग्लिश संघाने 8 गडी राखून मोठा विजय मिळवला. त्यामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्याचा न्यूझीलंडचा मार्ग कठीण झाला आहे. दुसरीकडे, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात आफ्रिकेने श्रीलंकेचा 233 धावांनी पराभव केला. परिणामी गुणतालिकेत आफ्रिकेने मोठी झेप घेतली आहे. या सामन्यापूर्वी संघ पाचव्या स्थानावर होता. मात्र आता संघ ऑस्ट्रेलिया, श्रीलंका आणि न्यूझीलंडला मागे टाकत दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे.

न्यूझीलंडसाठी कठीण परीक्षा

इंग्लंडविरुद्धच्या पराभवानंतर फायनलची समीकरणे बदलली आहेत. आता न्यूझीलंडला अंतिम फेरीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी इंग्लंडविरुद्धचे शेवटचे दोन कसोटी सामने जिंकावे लागतील. याशिवाय, भारत-ऑस्ट्रेलिया, द.आफ्रिका-श्रीलंका कसोटी मालिकांच्या निकालावरही अवलंबून रहावे लागले. दुसरीकडे, विजयानंतरही इंग्लंडचा संघ गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहे. पण ते फायनलच्या शर्यतीतून याआधीच बाहेर पडले आहेत.

अंतिम फेरीच्या शर्यतीत चार संघ

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप टेबलमध्ये भारतीय संघ सध्या अव्वल स्थानावर कायम आहे. श्रीलंकेचा पराभव करून दक्षिण आफ्रिकेने दुसरे स्थान पटकावले आहे, तर ऑस्ट्रेलियन संघ तिसऱ्या स्थानावर घसरला आहे. न्यूझीलंडचा संघ सध्या चौथ्या स्थानावर असला तरी जर-तर यावर त्यांचे भवितव्य अवलंबून असेल. श्रीलंकन संघासाठी अजूनही फायनलची आशा आहे. त्यांचे अजून 3 सामने बाकी आहेत आणि सर्व सामने जिंकून तो फायनलसाठी दावा ठोकू शकतो. विशेष म्हणजे, आफ्रिकेला अजून तीन सामने खेळायचे आहेत. ज्यात एक सामना श्रीलंकेविरुद्ध तर दोन सामने पाकिस्तानविरुद्ध खेळवले जाणार आहेत. जर त्यांच्या संघाने तिन्ही सामने जिंकले तर भारत आणि ऑस्ट्रेलिया यापैकी एकच संघ अंतिम फेरीत जाऊ शकेल. अशा समीकरणामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी मोठी चुरस निर्माण झाली आहे.

Advertisement
Tags :

.