इंग्लंडची कसोटी मालिकेत विजयी आघाडी
दुसऱ्या कसोटीत लंका 190 धावांनी पराभूत, गस अॅटकिनसन ‘सामनावीर’
वृत्तसंस्था/लंडन
तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत यजमान इंग्लंडने लंकेवर 2-0 अशी विजयी आघाडी मिळविली आहे. लॉर्डस् मैदानावर झालेल्या दुसऱ्या सामन्यात इंग्लंडने खेळाच्या चौथ्याच दिवशी लंकेवर 190 धावांनी दणदणीत विजय मिळविला. या सामन्यात शतक झळकविणारा तसेच गोलंदाजीत 7 गडी बाद करणाऱ्या गस अॅटकिनसनला ‘सामनावीर’ म्हणून घोषित करण्यात आले.
या दुसऱ्या सामन्यात इंग्लंडचा पहिला डाव 427 धावांवर आटोपल्यानंतर लंकेचा पहिला डाव 196 धावांत आटोपला. इंग्लंडने 231 धावांची भक्कम आघाडी घेतल्यानंतर इंग्लंडने दुसऱ्या डावात 251 धावा जमवित लंकेला निर्णायक विजयासाठी 483 धावांचे कठीण आव्हान दिले. लंकेच्या दुसऱ्या डावात करुणारत्ने, कर्णधार डिसिल्वा आणि चंडीमल यांनी अर्धशतके झळकविली. पण त्यांना आपल्या संघाला पराभवापासून रोखता आले नाही. लंकेच्या दुसऱ्या डावात चंडीमलने 11 चौकारांसह 58, कर्णधार डिसिल्वाने 7 चौकारांसह 50, करुणारत्नेने 7 चौकारांसह 55 धावा जमविल्या. रत्ननायकेने 7 चौकारांसह 43 धावा जमविल्या. 86.4 षटकात लंकेचा दुसरा डाव 292 धावांवर आटोपला. इंग्लंडतर्फे गस अॅटकिनसन 62 धावांत 5 तर वोक्स आणि स्टोन यांनी प्रत्येकी 2 तसेच शोएब बशीरने 1 गडी बाद केला.
लॉर्डस् मैदानावरील इंग्लंडचा हा विक्रमी विजयी आहे. या सामन्यात अॅटकिनसनची अष्टपैलु कामगिरी महत्वाची ठरली. तसेच इंग्लंड संघातील रुटने दोन्ही डावात शतके झळकविली. तसेच त्याने इंग्लंडतर्फे कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके नेंदविण्याचा विक्रम करताना माजी कर्णधार अलिस्टर कुकचा विक्रम मोडीत काढला. 2024 च्या क्रिकेट हंगामात इंग्लंड संघाचा मायदेशातील हा सलग पाचवा विजय आहे. 2004 साली मायकेल वॉनच्या नेतृत्वाखाली इंग्लंडने न्यूझीलंडचा 3-0 तर त्यानंतर विंडीजचा 4-0 अशा फरकाने पराभव केला होता.
अॅटकिनसनचा विक्रम
इंग्लंडचा वेगवान गोलंदाज गस अॅटकिनसनने कसोटी क्रिकेटमधील पहिल्या पाच सामन्यात इंग्लंडतर्फे सर्वाधिक बळी घेण्याचा पराक्रम केला आहे. या दुसऱ्या सामन्यात अॅटकिनसनने गोलंदाजीप्रमाणेच फलंदाजीतही दमदार कामगिरी करत शतक झळकविले. कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्या पाच सामन्यात सर्वाधिक बळी घेणाऱ्या इंग्लंडच्या गोलंदाजीच्या यादीत चौथ्यावर स्थानावर आहे. 26 वर्षीय अॅटकिनसनने 2024 साली विंडीज विरुद्ध आपले कसोटी पदार्पण केले. त्यानंतर त्याने गेल्या पाच कसोटी सामन्यात 4.07 धावांच्या सरासरीने 33 गडी बाद केले आहेत. इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू कुकने पहिल्या पाच कसोटी सामन्यात 34 गडी बाद करत या यादीत पहिले स्थान मिळविले असून आता फ्रेड ट्रुमन दुसऱ्या, थॉमस रिचर्डसन तिसऱ्या आणि अॅटकिनसन चौथ्या स्थानावर आहे.
संक्षिप्त धावफलक: इंग्लंड प. डाव 427, लंका प. डाव 196, इंग्लंड दु. डाव 54.3 षटकात सर्वबाद 251, लंका दु. डाव 86.4 षटकात सर्वबाद 292 (करुणारत्ने 55, मॅथ्युज 36, चंडीमल 58, धनंजय डिसिल्वा 50, रत्नायके 43, अटकिनसन 5-62, वोक्स 2-46, स्टोन 2-56, शोएब बशिर 1-78)