For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

इंग्लंडची मालिकेत विजयी आघाडी

06:23 AM Jul 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
इंग्लंडची मालिकेत विजयी आघाडी
Advertisement

वृत्तसंस्था/कॅन्टरबेरी

Advertisement

यजमान इंग्लंड आणि न्यूझीलंड महिला क्रिकेट संघामध्ये सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत इंग्लंडने न्यूझीलंडवर 3-0 अशी विजयी आघाडी मिळविली आहे. या मालिकेतील खेळविण्यात आलेल्या तिसऱ्या सामन्यात इंग्लंडने न्यूझीलंडचा 4 चेंडू बाकी ठेवून 6 गड्यांनी पराभव केला. इंग्लंडच्या अॅलीस कॅप्सेला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.

या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून न्यूझीलंडला प्रथम फलंदाजी दिली. न्यूझीलंडने 20 षटकात 8 बाद 141 धावा जमविल्या. त्यानंतर इंग्लंडने 19.2 षटकात 4 बाद 142 धावा जमवीत आपला विजय नोंदविला.

Advertisement

न्यूझीलंडच्या डावामध्ये सलामीच्या बेटस्ने 27 चेंडूत 8 चौकारांसह 38, कर्णधार सोफी डिव्हाईनने 42 चेंडूत 2 षटकार आणि 7 चौकारांसह नाबाद 58, अॅमेलिया केरने 18 चेंडूत 5 चौकारांसह 23 धावा जमविल्या. बेटस् आणि केअर यांनी दुसऱ्या गड्यासाठी 52 धावांची भागिदारी केली. न्यूझीलंडने पॉवरप्ले दरम्यानच्या 6 षटकात 47 धावा जमविताना 1 गडी गमविला. न्यूझीलंडचे अर्धशतक 37 चेंडूत, शतक 101 चेंडूत फलकावर लागले. डिव्हाईनने 40 चेंडूत 2 षटकार आणि 5 चौकारांसह अर्धशतक पूर्ण केले. न्यूझीलंडच्या डावामध्ये 2 षटकार आणि 21 चौकार नोंदविले गेले. इंग्लंडतर्फे इक्लेस्टोनने 25 धावांत 4 तर फिलेरने 17 धावांत 2 गडी बाद केले. केम्प आणि ग्लेन यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

प्रत्युत्तरादाखल खेळताना इंग्लंडच्या डावात अॅलीस कॅप्सेने 60 चेंडूत 1 षटकार आणि 6 चौकारांसह नाबाद 67 तर डंकलेने 26 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारांसह 35 धावा जमविल्या. या जोडीने दुसऱ्या गड्यासाठी 66 धावांची भागिदारी केली. तत्पूर्वी सलामीची फलंदाज बाऊचर पहिल्याच चेंडूवर खाते उघड्यापूर्वी पायचित झाली. कर्णधार नॅट सिव्हेर ब्रंटला आपले खाते उघडता आले नाही. जोन्सने 20 चेंडूत 1 षटकारासह 19 तर केम्पने 8 चेंडूत 3 चौकारांसह नाबाद 16 धावा जमविल्या. इंग्लंडच्या डावात 3 षटकार आणि 13 चौकार नोंदविले गेले. इंग्लंडने पॉवरप्लेच्या 6 षटकात 50 धावा जमविताना एक गडी गमविला. इंग्लंडचे अर्धशतक 36 चेंडूत तर शतक 87 चेंडूत फलकावर लागले. कॅप्सेने 50 चेंडूत 5 चौकारांसह अर्धशतक पूर्ण केले. न्युझीलंडतर्फे जोनासने 2 तर रोव्हेने 1 गडी बाद केला.

संक्षिप्त धावफलक: न्युझीलंड 20 षटकात 8 बाद 141 (बेटस् 38, केर 23, डिव्हाईन नाबाद 58, इक्लेस्टोन 4-25, फिलेर 2-17, केम्प, ग्लेन प्रत्येकी 1 बळी), इंग्लंड 19.2 षटकात 4 बाद 142 (कॅप्से नाबाद 67, डंकले 35, जोन्स 19, केम्प नाबाद 16, जोनास 2-23, रोवे 1-16)

Advertisement

.