इंग्लंडचा धुव्वा, विंडीजचा दणकेबाज विजय
एव्हिन लुईसची तुफानी खेळी, सामनावीर गुडाकेश मोतीचे 4 बळी
वृत्तसंस्था/ अँटिग्वा
वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना अँटिग्वा येथील सर विवियन रिचर्ड्स स्टेडियमवर खेळवण्यात आला. या सामन्यात यजमान संघाचा सलामीवीर एव्हिन लुईसने इंग्लिश गोलंदाजांची तुफान धुलाई केली. त्याच्या फलंदाजीच्या जोरावर वेस्ट इंडिजने इंग्लंडचा सहज पराभव केला. या विजयासह त्यांनी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. आता, उभय संघातील दुसरा सामना दि. 2 रोजी नॉर्थ साऊंड येथे होईल.
इंग्लंडने वेस्ट इंडिजसमोर विजयासाठी 210 धावांचे लक्ष्य ठेवले होते, पावसामुळे सामना थांबेपर्यंत एव्हिन लुईसच्या वादळी खेळीच्या जोरावर विंडीजने 25.5 षटकांत 2 गडी गमावून 157 धावा केल्या होत्या. हा सामना वेस्ट इंडिजने डीएलएस नियमाच्या आधारे 8 गडी राखून जिंकला. एव्हिन लुईसने 69 चेंडूत 8 षटकारांच्या मदतीने 94 धावांची तुफानी खेळी केली, तो अवघ्या 6 धावांनी शतकापासून वंचित राहिला.
तत्पूर्वी, या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या इंग्लंडने चांगली सुरुवात केली. टॉप ऑर्डरच्या फलंदाजांना सुरुवात मिळाली पण त्यांना या सुरुवातीचे रुपांतर मोठ्या डावात करता आले नाही. 100 धावांच्या आत 4 गडी गमावल्यानंतर कर्णधार लियाम लिव्हिंगस्टोन (48) आणि सॅम करन (37) यांनी काही काळ संघाची धुरा सांभाळली, पण ते बाद होताच संघ 209 धावांवर आटोपला. इंग्लंडचे फलंदाज पूर्ण 50 षटकेही टिकू शकले नाहीत. गुडाकेश मोतीने सर्वाधिक 4 गडी बाद केले. त्यालाच सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.