इंग्लंडचा दक्षिण अफ्रिकेवर विजय
वनडे मालिका, चार्ली डीन सामनावीर
वृत्तसंस्था/ दर्बान
इंग्लंडचा महिला संघ सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर वनडे मालिका खेळत आहे. या मालिकेतील रविवारी येथे झालेल्या सामन्यात इंग्लंडने यजमान दक्षिण आफ्रिकेचा 6 गड्यांनी पराभव करत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. इंग्लंडच्या चार्ली डीनला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.
या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेला प्रथम फलंदाजी दिली. दक्षिण आफ्रिकेचा डाव 31.3 षटकात 135 धावांत आटोपला. त्यानंतर इंग्लंडने 24 षटकात 4 बाद 137 धावा जमवित हा सामना 6 गड्यांनी जिंकत मालिकेत बरोबरी साधली. या मालिकेतील पहिला सामना दक्षिण आफ्रिकेने जिंकला होता.
दक्षिण आफ्रिकेच्या डावात सलामीच्या कर्णधार वुलव्हर्टने 50 चेंडूत 5 चौकारांसह 35, ट्रायॉनने 49 चेंडूत 8 चौकारांसह 45 तर डर्कसनने 44 चेंडूत 4 चौकारांसह 29 धावा जमविल्या. दक्षिण आफ्रिकेच्या इतर फलंदाजांना दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. इंग्लंडतर्फे चार्ली डीनने 45 धावांत 3 तर फिलेरने 32 धावांत 3 तसेच इक्लेस्टोनने 27 धावांत 3 गडी बाद केले. दक्षिण आफ्रिकेच्या डावात 20 चौकार नोंदविले गेले.
प्रत्युत्तरादाखल खेळताना इंग्लंडच्या डावात सलामीच्या बिमाँटने 52 चेंडूत 5 चौकारांसह 34, माईया बाऊचरने 36 चेंडूत 6 चौकारांसह 33, कर्णधार नाईटने 7, नॅट सिव्हेर ब्रंटने 19 चेंडूत 3 चौकारांसह 20 डॅनी हॉजने 2 चौकारांसह नाबाद 25 तर अॅमी जोन्सने 2 चौकारांसह नाबाद 8 धावा जमविल्या. इंग्लंडच्या डावात 18 चौकार नोंदविले गेले. दक्षिण आफ्रिकेतर्फे डर्कसनने 22 धावांत 2 तर कॅप आणि डी. क्लर्क यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक - द. आफ्रिका 31.3 षटकात सर्वबाद 135 (वुलव्हर्ट 35, डर्कसन 29, ट्रायॉन 45, चार्ली डिल 4-45, इक्लेस्टोन 3-27, फिलेर 3-32), इंग्लंड 24 षटकात 4 बाद 137 (बिमाँट 34, बाऊचर 31, नॅट सिव्हेर ब्रंट 20, डॅनी हॉज नाबाद 25, जोन्स नाबाद 8, अवांतर 10, डर्कसन 2-22, कॅप आणि डी. क्लर्क प्रत्येकी 1 बळी).