भारतीय महिलांसमोर आज इंग्लंडचे खडतर आव्हान
वृत्तसंस्था/ मुंबई
तीन सामन्यांच्या मालिकेतील आव्हान जिवंत ठेवण्याच्या दृष्टीने भारत आज शनिवारी येथे होणार असलेल्या दुसऱ्या महिला टी-20 सामन्यात इंग्लंडविऊद्ध लढताना, विशेषत: गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण विभागात सुधारित कामगिरी करून दाखविण्याची अपेक्षा बाळगेल. इंग्लंडने पहिल्या सामन्यात भारताविऊद्ध 38 धावांनी विजय मिळवून तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. भारताविऊद्धच्या 28 टी-20 सामन्यांमधला हा इंग्लंडचा 21 वा आणि देशातील 10 सामन्यांमधला आठवा विजय होता.
पहिल्या सामन्यात भारतीय संघ परिस्थितीचा योग्यरीत्या फायदा उठविण्यात अयशस्वी ठरून त्यांनी स्पष्ट चुका केल्या होत्या. त्यामुळे सामना एकतर्फी ठरला होता. पाटा खेळपट्टीवर भारताने चार वेगवेगळ्या फिरकीपटूंचा वापर केला, ज्यात कनिका आहुजाचाही समावेश होता. पण इंग्लंडने त्यांच्याविरुद्ध जोरदार फटकेबाजी करून त्यांच्या 12 षटकांत तीन गड्यांच्या मोबदल्यात 121 धावा काढल्या. भारतातर्फे श्रेयांका पाटील (2/44) आणि सायका इशाक (1/38) या दोन डावखुऱ्या फिरकीपटूंनी पदार्पण केले, परंतु दोन्ही खेळाडू महागड्या ठरल्या. तर वरिष्ष्ठ फिरकीपटू दीप्ती शर्मा (0/28) हिच्यावर तिच्या षटकांचा कोटा पूर्ण करण्याइतपतही विश्वास दाखवला गेला नाही.
भारतीय फिरकीपटूंनी टप्पा बरोबर राखला नाही आणि फुलटॉसची खैरात केली. शिवाय क्षेत्ररक्षकांचाही त्यांना पुरेसा पाठिंबा मिळाला नाही. डॅनी व्याट आणि नॅट सिव्हर-ब्रंट या दोघांनाही जीवदान देण्यात आले, जे महागडे ठरले. भारताच्या गोलंदाजीतील एकमेव चमकलेली खेळाडू ही वेगवान गोलंदाज रेणुका सिंह ठाकूर राहिली. तिने सामन्याच्या सुऊवातीच्याच षटकात इंग्लंडची स्थिती 2 बाद 2 धावा अशी करून सोडली. पण त्यानंतर भारताने इंग्लंडला पुनरागमन करण्याची संधी दिली.
याउलट इंग्लंडच्या सोफी एक्लेस्टोन (4-0-15-3) आणि सारा ग्लेन (1/25) या फिरकी जोडीने भारताच्या फलंदाजांना मोकळीक दिली नाही. त्यामुळे सलामीवीर शेफाली वर्माने दर्जेदार अर्धशतक (52) फटकावूनही आणि हरमनप्रीत कौरने (26) बऱ्यापैकी खेळी करूनही फलंदाजांना 198 धावांचे लक्ष्य गाठता आले नाही. स्मृती मानधना आणि जेमिमा रॉड्रिग्स यांनाही फलंदाजीस पोषक खेळपट्टीवर छाप पाडता आली नाही. इंग्लंडला आव्हान द्यायचे असेल, तर भारताला अल्पावधीत लक्षणीय सुधारणा कराव्या लागतील. जर भारताला मालिका पराभव टाळायचा असेल, तर त्यांना पुनरागमन करण्यासाठी आणि पुढील दोन सामने जिंकण्यासाठी खास प्रयत्न करावे लागतील.
संघ: भारत-हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), जेमिमा रॉड्रिग्स, शेफाली वर्मा, दीप्ती शर्मा, यास्तिका भाटिया, रिचा घोष, अमनज्योत कौर, श्रेयांका पाटील, मन्नत कश्यप, सायका इशाक, रेणुका सिंह ठाकूर, तीतास साधू, पूजा वस्त्रकार, कनिका आहुजा, मिन्नू मणी.
इंग्लंड-हीदर नाईट (कर्णधार), लॉरेन बेल, माइया बाउचियर, अॅलिस कॅप्सी, चार्ली डीन, सोफिया डंकले, सोफी एक्लेस्टोन, माहिका गौर, डॅनियल गिब्सन, सारा ग्लेन, बेस हीथ, अॅमी जोन्स, फ्रेया केम्प, नॅट सिव्हर-ब्रंट, डॅनियल व्याट.
वेळ-संध्याकाळी 7 वा., थेट प्रक्षेपण : जिओ सिनो, स्पोर्ट्स 18.