इंग्लंडचा मालिकेतील सलग तिसरा विजय
लंका पराभूत, सामनावीर ब्रंटचे शतक, इक्लेस्टोनचे 4 बळी
वृत्तसंस्था / कोलंबो
आयसीसीच्या महिलांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील शनिवारी येथे खेळविण्यात आलेल्या 12 व्या सामन्यात कर्णधार आणि ‘सामनावीर’ नॅट सिव्हर ब्रंटचे शानदार शतक आणि इक्लेस्टोच्या 4 बळींच्या जोरावर इंग्लंडने यजमान लंकेचा 89 धावांनी पराभव करत आपला सलग तिसरा विजय नोंदविला. या विजयामुळे इंग्लंडचा संघ गुणतक्त्यात सहा गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलिया 5 गुणांसह दुसऱ्या तर भारत 4 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे.
या सामन्यात लंकेने नाणेफेक जिंकून इंग्लंडला प्रथम फलंदाजी दिली. लंकेच्या अचूक गोलंदाजीसमोर कर्णधार नॅट सिव्हर ब्रंट वगळता इंग्लंडचे इतर फलंदाज धावा जमू शकल्या नाहीत. कर्णधार ब्रंटने 117 चेंडूत 2 षटकार आणि 9 चौकारांसह 117 धावा झोडपल्या. सलामीची अॅमी जोन्स चौथ्या षटकात पायचीत झाली. तिने 1 चौकारासह 11 धावा केल्या. त्यानंतर सुगंधा कुमारीने बेमॉन्टला झेलबाद केले. तिने 6 चौकारांसह 32 धावा जमविल्या. नाईट आणि कर्णधार ब्रंट यांनी तिसऱ्या गड्यासाठी 60 धावांची भागिदारी केली. नाईटने 47 चेंडूत 2 चौकारांसह 29 धावा जमविल्या. डंक्लेने 18, लॅम्बने 2 चौकारांसह 13, डीनने 1 चौकारासह 19 धावा जमविल्या. कॅप्सेला खाते उघडता आले नाही. इक्लेस्टोनने केवळ 3 धावा केल्या. नॅट सिव्हर ब्रंटने 57 चेंडूत 1 षटकार आण 3 चौकारांसह अर्धशतक तर 110 चेंडूत 2 षटकार आणि 5 चौकारांसह शतक झळकविले. इंग्लंडने पहिल्या पॉवरप्ले दरम्यान 10 षटकात 50 धावा जमविताना 2 गडी गमविले. लंकेतर्फे इनोका रणवीरा यशस्वी गोलंदाज ठरली. तिने 33 धावांत 3 गडी बाद केले. प्रभोदिनी आणि सुगंधीका कुमारी यांनी प्रत्येकी 2 तर दिलहारीने 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना इंग्लंडच्या शिस्तबद्ध आणि अचूक गोलंदाजी समोर लंकेचा डाव 45.4 षटकात 164 धावांत आटोपला. सलामीच्या परेराने 3 चौकारांसह 35 तर समरविक्रमाने 5 चौकारांसह 33, सिल्वाने 2 चौकारांसह 23 तसेच गुणरत्ने आणि संजीवनी यांनी प्रत्येकी 10 धावा जमविल्या. अट्टापटूने 2 चौकारांसह 15 धावा केल्या. मात्र लंकेला अवांतराच्या रुपात 24 धावा मिळाल्या. इंग्लंडतर्फे इक्लेस्टोनने 17 धावांत 4 गडी बाद केले. तर कर्णधार ब्रंट आणि डीन यांनी प्रत्येकी 2 तर स्मिथ आणि कॅप्से यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. या सामन्यात कर्णधार ब्रंटने फलंदाजी करताना शानदार शतक तसेच गोलंदाजीत तिने 25 धावांत 2 गडी बाद केल्याने तिची सामनावीर म्हणून निवड करण्यात आली.
संक्षिप्त धावफलक: इंग्लंड 50 षटकात 9 बाद 253 (नॅट सिव्हर ब्रंट 117, बिमॉन्ट 32, नाईट 29, डंक्ले 18, डीन 19, रणवीरा 3-33, प्रबोदिनी व सुगंधीका कुमारी प्रत्येकी 2 बळी, दिलहारी 1-34), लंका 45.4 षटकांत सर्वबाद 164 (परेरा 35, अट्टापटू 15, गुणरत्ने 10, समरविक्रमा 33, सिल्वा 23, संजीवनी 10, अवांतर 24, इक्लेस्टोन 4-17, ब्रंट आणि डीन प्रत्येकी 2 बळी, स्मिथ व कॅप्से प्रत्येकी 1 बळी)