इंग्लंडची लंकेवर 402 धावांची भक्कम आघाडी
लंका प. डाव सर्वबाद 196, इंग्लंड दु. डाव 5 बाद 171
वृत्तसंस्था /लंडन
लॉर्डस् मैदानावर सुरू असलेल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटीत शनिवारी खेळाच्या तिसऱ्या दिवशी उपाहारापर्यंत यजमान इंग्लंडने दुसऱ्या डावात 5 बाद 171 धावा जमवित लंकेवर एकूण 402 धावांची भक्कम आघाडी मिळविली आहे. या कसोटीत इंग्लंडचा संघ मोठ्या विजयाच्या दिशेने वाटचाल करीत आहे.
या मालिकेतील पहिल्या कसोटीत इंग्लंडने लंकेचा पराभव करुन आघाडी मिळविली आहे. या दुसऱ्या कसोटीत इंग्लंडने पहिल्या डावात 427 धावांचा डोंगर उभा केला. रुट आणि अॅटकिनसन यांनी दमदार शतके झळकविली. लंकेच्या असिता फर्नांडोने 5 बळी घेतले. त्यानंतर इंग्लंडच्या शिस्तबध्द आणि भेदक गोलंदाजीसमोर लंकेचा पहिला डाव 55.3 षटकात 196 धावांत आटोपला. लंकेतर्फे कमिंदु मेंडीसने एकाकी लढत देत 120 चेंडूत 3 षटकार आणि 8 चौकारांसह 74 धावा झोडपल्या. चंडीमलने 3 चौकारांसह 23, मॅथ्युजने 3 चौकारांसह 22 आणि रत्ननायकेने 4 चौकारांसह 19 धावा जमविल्या. इंग्लंडतर्फे वोक्स, अॅटकिनसन, स्टोन, पॉट्स यांनी प्रत्येकी 2 गडी तर बशीरने 1 गडी बाद केला. इंग्लंडने पहिल्या डावात लंकेवर 231 धावांची आघाडी घेतली. त्यांना फॉलोऑन उपलब्ध असतानाही त्यांनी लंकेला तो दिला नाही. आपल्या दुसऱ्या डावाला इंग्लंडने सुरूवात केली.
इंग्लंडने 1 बाद 25 या धावसंख्येवरुन शनिवारी तिसऱ्या दिवशीच्या खेळाला पुढे प्रारंभ केला. उपाहारापर्यंत इंग्लंडने 4 बाद 159 धावांपर्यंत मजल मारली. शेवटची बातमी हाती आली त्यावेळी इंग्लंडने दुसऱ्या डावात 5 बाद 171 धावा जमवित लंकेवर 402 धावांची आघाडी मिळविली आहे. इंग्लंडच्या दुसऱ्या डावात पुन्हा रुटने चिवट फलंदाजी केली. तो 5 चौकारांसह 54 धावांवर खेळत आहे. डकेटने 2 चौकारांसह 24, कर्णधार पॉपने 1 चौकारासह 17, ब्रुकने 1 षटकार आणि 4 चौकारांसह 37 तर स्मितने 3 चौकारांसह 26 धावा जमविल्या. लंकेतर्फे प्रभात जयसुर्याने 64 धावांत 2 तर असिता फर्नांडो, कुमारा आणि रत्ननायके यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. या कसोटीतील खेळाचे दोन दिवस बाकी असून लंकेचा संघ मोठ्या पराभवाच्या छायेत वावरत आहे.
संक्षिप्त धावफलक: इंग्लंड प. डाव 102 षटकात सर्वबाद 427, लंका प. डाव 55.3 षटकात सर्वबाद 196 (कमिंदु मेंडीस 74, चंडीमल 23, मॅथ्युज 22, रत्ननायके 19, अवांतर 23, वोक्स, अॅटकिनसन, स्टोन, पॉटस् प्रत्येकी 2 बळी), इंग्लंड दु. डाव 37 षटकात 5 बाद 171 (रुट खेळत आहे 54, डकेट 24, ब्रुक 37, स्मित 26, पॉप 17, जयसुर्या 2-64, असिता फर्नांडो, कुमारा, रत्ननायके प्रत्येकी 1 बळी)
धावफलक अपूर्ण