इंग्लंडचा जोरदार पलटवार, क्रॉली, डकेटची शतके हुकली
चौथी कसोटी : दुसऱ्या दिवशी 2 बाद 225 धावा : भारतीय गोलंदाजांचा विकेटसाठी संघर्ष : टीम इंडियाच्या 358 धावा
वृत्तसंस्था/मँचेस्टर
ओल्ड ट्रॅफर्ड येथे सुरु असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात झॅक क्रॉली आणि बेन डकेट यांच्या धमाकेदार खेळीच्या जोरावर इंग्लंडने जोरदार पलटवार करताना दुसऱ्या दिवशी 2 बाद 225 धावा केल्या. भारतीय वेगवान गोलंदाजांनी स्वैर गोलंदाजी केल्याचे दिसले, याचा फायदा इंग्लंडच्या सलामीवीरांनी घेतला. तत्पूर्वी, टीम इंडियाने पहिल्या डावात 358 धावा केल्या. दुसऱ्या दिवशी खेळ थांबला तेव्हा ओली पोप 20 तर जो रुट 11 धावांवर खेळत होते. टीम इंडियाकडे अद्याप 133 धावांची आघाडी कायम आहे.
चौथ्या कसोटीत नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करणाऱ्या टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली. केएल राहुल आणि यशस्वी जैस्वाल यांनी पहिल्या विकेटसाठी 94 धावांची भागीदारी केली. 46 धावा काढल्यानंतर केएल राहुल बाद झाला. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या साई सुदर्शननेही अर्धशतक झळकावले तर यशस्वी जैस्वालनेही अर्धशतकी खेळी साकारली. जैस्वालने 107 चेंडूत 58 धावांची खेळी केली. साई सुदर्शनने 151 चेंडूत 7 चौकारांसह 61 धावा केल्या. हे त्याचे कसोटी क्रिकेटमधील पहिले अर्धशतक होते. दुसरीकडे, कर्णधार शुभमन गिलची (12) बॅट शांत राहिली.
गुरुवारी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी 84 व्या षटकापासून आणि 4 बाद 264 धावसंख्येवरुन भारतीय संघाने पुढे खेळ सुरु केला. रविंद्र जडेजा दिवसातील पहिला बळी ठरला. त्याला 20 धावांवर आर्चरने बाद केले. यानंतर शार्दूल ठाकुरने 88 चेंडूत 41 धावांची चिवट खेळी केली. शार्दुलनंतर भारताचा जखमी वाघ ऋषभ पंत मैदानात आला. चाहत्यांनी पंतचे टाळ्या आणि शिट्ट्यांनी स्वागत केले. पंतने एकेरी-दुहेरी धाव घेत धावफलक हलता ठेवला. सामन्यातील पहिल्या दिवशी पंतच्या पायाला दुखापत झाली होती. तो मैदानावर येण्याची शक्यता खूप कमी होती. पण तरीदेखील तो फलंदाजीला आला आणि 70 चेंडूंचा सामना करत आपलं अर्धशतक पूर्ण केले.
जोफ्रा आर्चरने पंतला क्लिन बोल्ड केले. पंतने 75 बॉलमध्ये 3 चौकार आणि 2 षटकारासह 54 धावा केल्या. यासह पंतच्या झुंजार खेळीचा शेवट झाला. इंग्लंडने या दरम्यान झटके देणे सुरुच ठेवले. वॉशिंग्टन सुंदर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात कॅच आऊट झाला. वॉशिंग्टनने 27 धावा केल्या. पदार्पणवीर अंशुल कंबोजला भोपळाही फोडता आला नाही. पंतनंतर जसप्रीत बुमराह आऊट झाला आणि भारताचा डाव 358 धावांत आटोपला. बुमराहने 4 धावा केल्या. तर मोहम्मद सिराज 5 धावांवर नाबाद राहिला. इंग्लंडसाठी कर्णधार बेन स्टोक्सने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. जोफ्रा आर्चरने तिघांना बाद केले.
भारतीय संघाचा पहिला डाव संपल्यानंतर इंग्लंडने मात्र जोरदार सुरुवात केली. सलामीवीर क्रॉली आण डकेटने 166 धावांची भागीदारी साकारली. या दोघांनी भारतीय गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. शतकाच्या उंबरठ्यावर असताना मात्र क्रॉलीला जडेजाने बाद केले. त्याने 113 चेंडूत 84 धावा केल्या. तर डकेटचा अडथळा अंशुल कंबोजने दूर केला. त्याने 13 चौकारासह 94 धावा फटकावल्या. ही जोडी बाद झाल्यानंतर दिवसअखेरीस ओली पोप व जो रुटने आणखी पडझड होऊ दिली नाही. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडने 46 षटकांत 2 बाद 225 धावा केल्या होत्या. पोप 3 चौकारासह 20 तर रुट 2 चौकारांसह 11 धावांवर खेळत होते.
संक्षिप्त धावफलक
भारत पहिला डाव 114.1 षटकांत सर्वबाद 358 (यशस्वी जैस्वाल 58, केएल राहुल 46, साई सुदर्शन 61, ऋषभ पंत 54, शार्दुल ठाकूर 41, जडेजा 20, वॉशिंग्टन सुंदर 27, बेन स्टोक्स 72 धावांत 5 बळी, जोफ्रा आर्चर 3 बळी, ख्रिस वोक्स आणि डॉसन प्रत्येकी 1 बळी) इंग्लंड पहिला डाव 46 षटकांत 2 बाद 225 (झॅक क्रॉली 84, बेन डकेट 94, पोप खेळत आहे 20, रुट खेळत आहे 11, कंबोज आणि जडेजा प्रत्येकी 1 बळी). .
विषय गंभीर, पण पंत खंबीर!
- इंग्लंडविरुद्ध चौथ्या कसोटीत पहिल्या डावात दुखापतग्रस्त होऊन मैदानाबाहेर गेलेला पंत दुसऱ्या दिवशी फलंदाजीसाठी मैदानात आला आणि त्याने अर्धशतक झळकावून इतिहास रचला आहे. अर्धशतकी खेळीसह पंत जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत भारताकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. त्याने भारताचा दिग्गज फलंदाज रोहित शर्माचा 2716 धावांचा विक्रम मोडीत काढला.
- याशिवाय, सध्या सुरु असलेल्या इंग्लंडविरुद्ध मालिकेत त्याने पाचवे कसोटी अर्धशतक झळकावले. यामुळे एकाच कसोटी मालिकेत 5 अर्धशतके करणारा तो भारताचा पहिलाच यष्टीरक्षक ठरला आहे. यापूर्वी 1972-73 मध्ये फारुख इंजिनियर तर महेंद्रसिंग धोनीने 2008-09, 2014 च्या मालिकेत 4 अर्धशतके झळकावली होती.
- पंतने आपल्या 54 धावांच्या खेळीत 2 षटकार लगावले. यासह कसोटीत सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रोहित शर्माला मागे टाकत त्याने पहिला क्रमांक पटकावला आहे. कसोटीत आता पंतने 90 षटकार लगावले आहेत. दुसऱ्या स्थानी असणाऱ्या वीरेंद्र सेहवागने 90 तर तिसऱ्या स्थानी असणाऱ्या रोहित शर्माने 88 षटकार लगावले आहेत.
जखमी ऋषभ पंत मालिकेबाहेर
मँचेस्टर कसोटीत यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतच्या उजव्या पायाला दुखापत झाली असून, स्कॅनमध्ये फ्रॅक्चर असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे पंत फक्त सध्या सुरू असलेली कसोटीच नाही, तर 31 जुलैपासून लंडनच्या ओव्हलवर होणाऱ्या अखेरच्या कसोटीतूनही बाहेर गेला. विशेष म्हणजे, पंतची दुखापत गंभीर असून डॉक्टरांनी त्याला किमान सहा आठवडे विश्रांतीचा सल्ला दिला आहे. आता, पंतच्या अनुपस्थितीत ईशान किशन टीम इंडियात परत येण्याची शक्यता आहे. मुख्य निवडकर्ते अजित आगरकर यांनी पंतच्या दुखापतीमुळे ईशान किशनशी संपर्क साधल्याचे समजते.