भारताच्या फिरकीसमोर इंग्लंडची गिरकी
पहिली कसोटी : इंग्लंडचा डाव 246 धावांवर गडगडला : अश्विन-जडेजाचे प्रत्येकी तीन बळी : जैस्वालचे अर्धशतक, टीम इंडिया 1 बाद 119
वृत्तसंस्था /हैदराबाद
येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर आर अश्विन, रविंद्र जडेजा आणि अक्षर पटेल यांच्या फिरकीसमोर इंग्लंडची दाणादाण उडाली. भारतीय त्रिकुटाच्या भेदक माऱ्यासमोर इंग्लंडचा पहिला डाव 246 धावांवर गडगडला. मालिका सुरु होण्याआधी बड्या बड्या बाता करणाऱ्या इंग्लंडच्या फलंदाजांची भारतीय गोलंदाजांनी हवा काढून घेतली. इंग्लंडला पहिल्या डावात 246 धावांमध्ये रोखल्यानंतर यशस्वी जैस्वालने भारताला दमदार सुरुवात करून दिली. त्याने 70 चेंडूत नाबाद 76 धावा केल्या. पहिल्या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी टीम इंडियाने 23 षटकांत 1 बाद 119 धावा केल्या होत्या. जैस्वाल 76 तर शुभमन गिल 14 धावा करून नाबाद राहिला. फिरकीला अनुकूल असणाऱ्या हैदराबादच्या या खेळपट्टीवर इंग्लिश संघ तीन सत्रही मैदानावर टिकला नाही. प्रारंभी, नाणेफेक जिंकत इंग्लंडने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. झॅक क्रॉली आणि बेन डकेट यांनी सावध सुरुवात केली. मात्र अश्विनने डकेटला पायचित करुन भारताला 55 धावांवर पहिले यश मिळवून दिलं. डकेटने 39 चेंडूत 35 धावा केल्या. यानंतर मग लगेचच जडेजाने ओली पोपला 1 धावेवर बाद केले तर अश्विनने दुसरा सलामीवीर क्रॉलीला (20 धावा) तंबूचा रस्ता दाखवला.
बेन स्टोक्सच्या सर्वाधिक धावा
सलामीचे तीन फलंदाज झटपट बाद झाल्यानंतर अनुभवी जो रुट व जॉनी बेअरस्टो यांनी संघाचा डाव सावरला. या जोडीने एकेरी दुहेरी धावांवर भर देत संघाचे शतक फलकावर लावले. ही जोडी मैदानावर जमली आहे असे वाटत असतानाच बेअरस्टोला 37 धावांवर अक्षर पटेलने बाद केले. बेअरस्टो पाठोपाठ जडेजाने रुटलाही (29 धावा) माघारी धाडले. बेन फोक्सही (4 धावा) फार काळ मैदानावर टिकला नाही. अक्षर पटेलनेच त्याचा अडथळा दूर केला. इंग्लंड संघाला 155 धावांवर सातवा धक्का बसला होता. त्यानंतर भारताला फक्त 3 विकेटची गरज होती, पण इंग्लंडच्या शेवटच्या फलंदाजांनी कर्णधारासोबत बॅझबॉल क्रिकेट खेळली आणि जवळपास 100 धावा जोडल्या आणि इंग्लंडची लाज वाचवली. भारताच्या फिरकी तिकडीसमोर इंग्लंडचे फलंदाज ढेपाळत असताना कर्णधार बेन स्टोक्सने मात्र एकहाती किल्ला लढवला. त्याने 88 चेंडूत 6 चौकार व 3 षटकारासह सर्वाधिक 70 धावा काढल्या. अखेर 64 व्या षटकात बुमराहने बेन स्टोक्सची दांडी उडवून इंग्लंडची शेवटची विकेट मिळवली व साहेबांचा डाव 64.3 षटकांत 246 धावांवर संपुष्टात आला. पदार्पणवीर टॉम हार्टलने 23, मार्क वूडने 11 धावा केल्या. भारताकडून जडेजा आणि आर अश्विन यांनी सर्वाधिक 3-3 विकेट घेतल्या तर अक्षर पटेल आणि जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.
यशस्वी जैस्वालचे नाबाद अर्धशतक
भारतीय फिरकी गोलंदाजांनी इंग्लंडला 246 धावांत गुंडाळल्यानंतर टीम इंडियाचा सलामीवीर यशस्वी जैस्वालने इंग्लंडच्या गोलंदाजांना भारतीय बॅझबॉलची चुणूक दाखवली. जैस्वालने मालिकेतील पहिल्याच कसोटीत 108 च्या स्ट्राईक रेटने धावा ठोकत भारताला 1 बाद 119 धावांपर्यंत पोहचवले. त्याने अवघ्या 47 चेंडूत अर्धशतक ठोकले. पहिल्या दिवसअखेरीस जैस्वाल 70 चेंडूत नाबाद 76 धावांवर खेळत होता. कर्णधार रोहित शर्मा 24 धावा करुन बाद झाला. शुभमन गिल 14 धावांवर खेळत होता. टीम इंडिया अद्याप 127 धावांनी पिछाडीवर असून आज सामन्याच्या दुसऱ्या दिवशी मोठी आघाडी घेण्याचा प्रयत्न असेल.
संक्षिप्त धावफलक
- इंग्लंड पहिला डाव 64.3 षटकांत सर्वबाद 246 (झॅक क्रॉली 20, बेन डकेट 35, जो रुट 29, बेअरस्टो 37, बेन स्टोक्स 70, अश्विन व जडेजा प्रत्येकी तीन बळी, अक्षर पटेल व बुमराह प्रत्येकी दोन बळी)
- भारत पहिला डाव 23 षटकांत 1 बाद 119 (यशस्वी जैस्वाल खेळत आहे 76, रोहित शर्मा 24, शुभमन गिल खेळत आहे 14, जॅक लीच एक बळी).
अश्विन व जडेजाची जोडी कुंबळे-हरभजनवर ठरली भारी
इंग्लंडविरुद्ध पहिल्या कसोटीत रविंद्र जडेजा व आर अश्विन या फिरकी जोडगोळीने प्रत्येकी तीन बळी घेत अनोख्या विक्रमाला गवसणी घातली. अश्विन आणि जडेजा यांनी मिळून भारताकडून कसोटीत सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम केला आहे. यापूर्वी हा विक्रम दिग्गज अनिल कुंबळे आणि हरभजन सिंग यांच्या नावावर होता. अश्विन आणि जडेजा यांनी मिळून कसोटीत 504 विकेट घेतल्या आहेत. तर, कुंबळे आणि हरभजन सिंह यांच्या जोडीने 501 घेतल्या होत्या.
कसोटीत सर्वाधिक विकेट घेणाऱ्या भारतीय गोलंदाजांच्या जोड्या
- अश्विन/जडेजा- 504 विकेट
- कुंबळे/हरभजन- 501 विकेट
- झहीर/हरभजन- 474 विकेट
- अश्विन/उमेश- 431 विकेट
- कुंबळे/श्रीनाथ- 412 विकेट
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये अश्विनचे दीडशे बळी
2019 पासून सुरू झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये 150 विकेट्स पूर्ण करणारा अश्विन जगातील तिसरा आणि भारताचा पहिला गोलंदाज ठरला आहे. अश्विनच्या पुढे ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स आणि नॅथन लियॉन आहेत. या दोघांनी प्रत्येकी 169 विकेट घेतल्या आहेत.