सिराज-कृष्णाच्या माऱ्यापुढे इंग्लंडचीही दाणादाण
इंग्लंडचेही 247 धावांत पॅकअप : सिराज-कृष्णाचे प्रत्येकी चार बळी : दुसऱ्या डावात टीम इंडियाच्या 2 बाद 75 धावा
वृत्तसंस्था / मँचेस्टर
ओव्हल कसोटीत जसप्रीत बुमराह भारतीय संघात नाही, पण दुसऱ्या दिवशी मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा या भारतीय जोडीसमोर इंग्रज नतमस्तक झाले. इंग्लंडने पहिल्या डावात 247 धावा केल्या आणि टीम इंडियावर 23 धावांची आघाडी घेतली. भारताने पहिल्या डावात 224 धावा केल्या होत्या. यानंतर दुसऱ्या डावात खेळताना दुसऱ्या दिवसअखेरीस 18 षटकांत 2 गडी गमावत 75 धावा केल्या. जैस्वाल 51 तर आकाशदीप 4 धावांवर खेळत होता. टीम इंडियाकडे आता 52 धावांची आघाडी आहे.
भारताने 6 बाद 204 या धावसंख्येवरुन दुसऱ्या दिवशीच्या खेळाला पुढे प्रारंभ केला. पण पहिल्या अर्ध्या तासाच्या कालावधीतच भारताचे 4 गडी केवळ 20 धावांची भर घालत तंबूत परतले. करुण नायरने 109 चेंडूत 8 चौकारांसह 57 धावा जमविल्या तर वॉशिंग्टन सुंदरने 26 धावा केल्या. करुण नायरला टंगने पायचीत केले. त्यानंतर वॉशिंग्टन सुंदर अॅटकिन्सनच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. मोहम्मद सिराजला तसेच प्रसिध कृष्णाला आपले खातेही उघडता आले नाही. अॅटकिन्सनने सिराजचा त्रिफळा उडविला तर त्यानंतर प्रसिध कृष्णाला स्मिथकरवी झेलबाद केले. 69.4 षटकात भारताचा पहिला डाव 224 धावांवर आटोपला.
इंग्लंडची आक्रमक सुरुवात
क्रॉली आणि डकेट या सलामीच्या जोडीने इंग्लंडच्या डावाला आक्रमक सुरूवात करुन दिली. भारताच्या वेगवान गोलंदाजीसमोर या सलामीच्या जोडीने जोरदार फटकेबाजी करीत 77 चेंडूत 92 धावांची भागिदारी केली. उपाहारापूर्वी भारतीय गोलंदाजांना ही जोडी फोडण्यात यश मिळाले. आकाश दीपच्या गोलंदाजीवर रिव्हर्स हिट मारताना डकेट यष्टीरक्षक जुरेलकरवी झेलबाद झाला. त्याने 38 चेंडूत 2 षटकार आणि 5 चौकारांसह 43 धावा जमविल्या. क्रॉलीने या कालावधीत आपले अर्धशतक 42 चेंडूत 12 चौकारांच्या मदतीने पूर्ण केले.
मोहम्मद सिराज प्रभावी
उपाहारानंतरच्या दुसऱ्या सत्रामध्ये भारतीय वेगवान गोलंदाजांनी इंग्लंडच्या फलंदाजांना चांगलेच दमवित चहापानापर्यंतच्या दुसऱ्या सत्रामध्ये इंग्लंडचे आणखी सहा गडी टिपले. 106 धावांची भर घालत चहापानवेळी इंग्लंडने 42.5 षटकात 7 बाद 215 धावा जमविल्या होत्या. क्रॉली आणि पोप या जोडीने सावध फलंदाजी केली. पण प्रसिध कृष्णाच्या गोलंदाजीवर रवींद्र जडेजाने क्रॉलीचा झेल टिपला. त्याने 57 चेंडूत 14 चौकारांसह 64 धावा जमविल्या. क्रॉली बाद झाल्यानंतर पोपला अनुभवी रूटकडून चांगली साथ मिळेल, असे वाटत असताना सिराजच्या एका अप्रतिम चेंडूवर कर्णधार पोप पायचीत झाला. त्याने 22 धावा केल्या. दुसऱ्या सत्रामध्ये प्रसिध कृष्णा आणि जो रुट यांच्यात शाब्दीक चकमक झाल्याचे दिसून आले. सिराजने इंग्लंडला आणखी एक धक्का देताना चिवट फलंदाजी करणाऱ्या रूटला पायचीत केले. रूटने 6 चौकारांसह 29 धावा जमविल्या. बेथेलने मात्र निराशा केली. प्रसिध कृष्णाने जेमी स्मिथला स्लिपमध्ये राहुलकरवी झेलबाद केले. स्मिथने 8 धावा केल्या. प्रसिध कृष्णाने आपल्या याच षटकातील पाचव्या चेंडूवर ओव्हरटनला खाते उघडण्यापूर्वी पायचीत केले. यानंतर काही वेळातच इंग्लंडचा पहिला डाव 247 धावांत आटोपला. भारताकडून सिराज आणि कृष्णाने प्रत्येकी चार गडी बाद केले.
टीम इंडियाकडे 52 धावांची आघाडी
दुसऱ्या डावात खेळताना 46 धावांवर भारतीय संघाला पहिला धक्का बसला. केएल राहुल 7 धावा काढून माघारी परतला. यानंतर साई सुदर्शनही फार काळ टिकला नाही. 11 धावांवर त्याला अॅटकिन्सनने माघारी पाठवले. दुसरीकडे, यशस्वी जैस्वालने मात्र नाबाद अर्धशतक झळकावताना 49 चेंडूत 7 चौकार व 2 चौकारांसह 51 धावा फटकावल्या. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा जैस्वाल 51 तर आकाशदीप 4 धावांवर खेळत होते. भारतीय संघाकडे 52 धावांची आघाडी असून आज सामन्याचा तिसरा दिवस महत्वपूर्ण असणार आहे.
संक्षिप्त धावफलक : भारत प. डाव 69.4 षटकात सर्वबाद 224 (करुण नायर 57, वॉशिंग्टन सुंदर 26, साई सुदर्शन 38, गिल 21, केएल राहुल 14, जुरेल 19, जडेजा 9,अॅटकिन्सन 5-33, टंग 3-57, वोक्स 1-46),
इंग्लंड प. डाव 51.2 षटकात सर्वबाद 247 : क्रॉले 64, डकेट 43, पोप 22, रूट 29, ब्रुक 53, बेथेल 6, स्मिथ 8, ओव्हरटन 0, अॅटकिन्सन 11, मोहम्मद सिराज 4-86, प्रसिध कृष्णा 4-62, आकाश दीप 1-80)
भारत दुसरा डाव 18 षटकांत 2 बाद 75 (जैस्वाल खेळत आहे 51, केएल राहुल 7, साई सुदर्शन 11, आकाशदीप खेळत आहे 4, अॅटकिन्सन, टंग प्रत्येकी 1 बळी).
सिराज नाबाद 200
इंग्लंडविरुद्ध पाचव्या कसोटीत त्याने सिराजने चार बळी घेतले. यासह सिराजने आंतराराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 200 गडी बाद करण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. ओली पोप हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील त्याचा 200 वा बळी ठरला आहे. तिन्ही फॉरमॅटमध्ये भारतीय संघाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या सिराजने कसोटी क्रिकेटमध्ये 115 गडी बाद केले आहेत. वनडे क्रिकेटमध्ये गोलंदाजी करताना त्याने 71 गडी तर टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 14 गडी बाद केले आहेत. यासह त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 200 गडी बाद केले आहेत.विशेष म्हणजे, आंतराराष्टीय क्रिकेटमध्ये 200 बळी घेणारा तो भारताचा 25 वा गोलंदाज ठरला आहे.