इंग्लंडचा श्रीलंकेवर दणदणीत विजय
पहिली कसोटी जिंकत साहेबांची मालिकेत आघाडी : लंकन खेळाडूंची सपशेल निराशा : , जेमी स्मिथ सामनावीर
वृत्तसंस्था/ मँचेस्टर
ओली पोपच्या नेतृत्वाखालील इंग्लंडने पहिल्या कसोटीत श्रीलंकेवर 5 गडी राखून दणदणीत विजय मिळवला. मँचेस्टर येथील पहिली कसोटी जिंकत इंग्लंडने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. श्रीलंकेने इंग्लंडला विजयासाठी 205 धावांचे टार्गेट दिले होते, यजमान संघाने चौथ्या दिवशी 5 गडी गमावत पूर्ण केले व पहिल्या कसोटीत शानदार विजय मिळवला. उभय संघातील दुसरी कसोटी दि. 29 ऑगस्टपासून लॉर्ड्स येथे खेळवण्यात येईल.
प्रारंभी, या सामन्यात लंकेचा पहिला डाव 236 धावांवर आटोपल्यानंतर इंग्लंडने पहिल्या डावात 358 धावा जमवित लंकेवर 122 धावांची आघाडी मिळविली. यानंतर लंकेने दुसऱ्या डावात दमदार फलंदाजी केली. 6 बाद 204 या धावसंख्येवरुन लंकेने चौथ्या दिवशीच्या खेळाला पुढे प्रारंभ केला आणि त्यांचा दुसरा डाव 89.3 षटकात 326 धावांत आटोपला कमिंदु मेंडीसच्या (183 चेंडूत 113 धावा) शतकामुळे लंकेला 326 धावांपर्यंत मजल मारता आली. लंकेचा दुसरा डाव 326 धावांत आटोपल्यानंतर इंग्लंडला विजयासाठी 205 धावांचे लक्ष्य मिळाले.
जो रुटचे नाबाद अर्धशतक
दरम्यान, शनिवारी खेळाच्या चौथ्या दिवशी इंग्लंडने विजयासाठीचे 205 धावांचे टार्गेट 57.2 षटकांत 5 गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. विजयी आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीर बेन डकेट स्वस्तात बाद झाला. लॉरेन्स व कर्णधार ओली पोप यांनाही फारशी चमक दाखवता आली नाही. पण, अनुभवी जो रुटने मात्र शानदार अर्धशतकी खेळी साकारत संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले. रुटने 2 चौकारासह नाबाद 62 धावा फटकावल्या. त्याला हॅरी ब्रुक (32) व जेमी स्मिथ (39) धावा करत चांगली साथ दिली. श्रीलंकेकडून असिथा फर्नांडो व जयसुर्या यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. मिलन रथनायकेने एक विकेट घेतली.
संक्षिप्त धावफलक
श्रीलंका पहिला डाव 236 व दुसरा डाव 326
इंग्लंड पहिला डाव 358 व दुसरा डाव 57.2 षटकांत 5 बाद 205 (डकेट 11, लॉरेन्स 34, रुट नाबाद 62, ब्रुक 32, स्मिथ 39, ख्रिस वोक्स नाबाद 8, फर्नांडो व जयसुर्या प्रत्येकी 2 बळी).
जो रुटचा अनोखा विक्रम, सर्वाधिक अर्धशतके करणारा तिसरा फलंदाज
श्रीलंकेविरुद्ध कसोटीत दुसऱ्या डावात जो रुटने आपल्या अर्धशतकी खेळीसह एक विशेष विक्रम आपल्या नावे केला आहे. आता तो कसोटीत सर्वाधिक अर्धशतके करणारा तिसरा फलंदाज बनला आहे. रुटचे हे कसोटी फॉरमॅटमधील 64 वे अर्धशतक होते. आता या फॉरमॅटमध्ये सर्वाधिक अर्धशतक ठोकण्याच्या बाबतीत तो तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. ही कामगिरी करताना रुटने भारताचा राहुल द्रविड आणि ऑस्ट्रेलियाच्या अॅलन बॉर्डरला मागे टाकले आहे. द्रविड आणि बॉर्डरने कसोटी कारकिर्दीत प्रत्येकी 63अर्धशतके झळकावली आहेत. दरम्यान, रुटने कसोटी क्रिकेटमध्ये 64 अर्धशतके झळकावली आहेत. सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडण्यापासून तो फक्त 4 अर्धशतक दूर आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक अर्धशतक करणारे फलंदाज
- सचिन तेंडुलकर - 68 अर्धशतके
- शिवनारायण चंदरपॉल - 66 अर्धशतके
- जो रुट - 64 अर्धशतके
- अॅलन बॉर्डर - 63 अर्धशतके
- राहुल द्रविड - 63 अर्धशतके.
भारत अव्वलस्थानी कायम, इंग्लंडची चौथ्या स्थानी झेप, पाकची घसरण
इंग्लंडने श्रीलंकेविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात विजय मिळवत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत मोठी झेप घेतली आहे. दरम्यान, इंग्लंडचा 14 कसोटी सामन्यांमधील हा सातवा विजय आहे. यासह त्याचे गुण 69 इतके वाढले असून गुणांची टक्केवारी 41.07 झाली आहे. लंकेला नमवत त्यांनी सहाव्या स्थानावरुन चौथ्या स्थानी झेप घेतली आहे. दुसरीकडे, बांगलादेशविरुद्ध पराभवानंतर पाकिस्तानची आठव्या स्थानावर घसरण झाली आहे. त्यांचे आता 22 गुण आहेत आणि गुणांची टक्केवारी 30.56 आहे. बांगलादेशचा संघ गुणतालिकेत सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. त्यांच्या गुणांची टक्केवारी 40 वर पोहोचली आहे आणि बांगलादेशचे खात्यात 24 अंक आहेत. भारत व ऑस्ट्रेलिया पहिल्या व दुसऱ्या स्थानी असून न्यूझीलंड तिसऱ्या स्थानावर आहे.