इंग्लंडचे घरच्या मैदानावर लोटांगण
पहिल्या वनडेत दक्षिण आफ्रिकेचा 7 विकेट्स आणि 175 चेंडू राखून विजय
वृत्तसंस्था/ लीड्स
बुधवारी खेळवल्या गेलेल्या पहिल्याच वनडे सामन्यात दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडचा दारुण पराभव केला. इंग्लंडने आफ्रिकेसमोर 132 धावांचे टार्गेट ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना आफ्रिकेने 20.5 षटकांत म्हणजेच 125 चेंडूत आणि 3 विकेट्स गमावत हा सामना जिंकला. या विजयासह त्यांनी तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. उभय संघातील दुसरा सामना दि. 4 रोजी लॉर्ड्सवर खेळवण्यात येईल. विशेष म्हणजे, फिरकीपटू केशव महाराजने 22 धावांत 4 गडी बाद करत विजयात मोलाचे योगदान दिले.
हेडिंग्ले येथे झालेल्या या सामन्यात आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. इंग्लंडची फलंदाज मात्र घरच्या मैदानावर लोटांगण घालताना दिसले. केवळ 24.3 षटकांत इंग्लंडची संपूर्ण संघ 131 धावांवर ऑलआऊट झाला. जेमी स्मिथने सर्वाधिक 48 चेंडूत 10 चौकारासह 54 धावा केल्या, मात्र त्याला कोणीच साथ देऊ शकले नाही. स्मिथ वगळता एकही फलंदाज 15 धावांचाही टप्पा ओलांडू शकला नाही. कर्णधार हॅरी ब्रूक (12), जोस बटलर (15) आणि जो रुट (14) हे त्रिकूटही सपशेल फ्लॉप ठरले. केशव महाराजने इंग्लंडच्या फलंदाजांना फिरकीच्या जाळ्यात अडकवले. त्याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. वियान मुल्डरने तिघांना बाद केले. याशिवाय, नांद्रे बर्गर आणि लुंगी एन्गिडी या दोघांनी 1-1 विकेट घेतली.
आफ्रिकेचा शानदार विजय
132 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या आफ्रिकेला मार्करम आणि रिकेल्टन या दोघांनी आक्रमक सुरुवात करुन दिली. या दोघांनी इंग्लिश गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेताना चौफेर फटकेबाजी केली. मार्करमने अवघ्या 55 चेंडूत 86 धावांची झंझावाती खेळी केली. त्याच्या खेळीत 13 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता. तर रियान रिकल्टनने संयमी खेळ करत 59 चेंडूत नाबाद 31 धावा केल्या. आफ्रिकेने हे लक्ष्य केवळ 20.5 षटकांत तीन गडी गमावून सहज गाठले. शतकाच्या उंबरठ्यावर असताना मार्करमला रशीदने बाद केले. यानंतर कर्णधार बवुमा आणि ट्रिस्टन स्टब्ज स्वस्तात परतले. यानंतर रिकेल्टनने युवा फलंदाज ब्रेविसला सोबत घेत संघाला विजय मिळवून दिला. इंग्लंडकडून आदिल रशीदने 3 गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक
इंग्लंड 24.3 षटकांत सर्वबाद 131 (जेमी स्मिथ 54, जो रुट 14, हॅरी ब्रूक 12, केशव महाराज 4 तर मुल्डर 3 बळी)
दक्षिण आफ्रिका 20.5 षटकांत 3 बाद 137 (मार्करम 86, रिकेल्टन नाबाद 31,. ब्रेविस नाबाद 6, आदिल रशीद 3 बळी).
आफ्रिकेचा इंग्लंडवर दुसरा जलद विजय
आफ्रिकेने 2007 मध्ये इंग्लंडवर सर्वात जलद पहिला विजय मिळवला होता. तेव्हा आफ्रिकेने केवळ 19.2 षटकांत लक्ष्याचा पाठलाग केला. यावेळीही संघाला 19 षटकांत 132 धावांचे लक्ष्य गाठून नवा विक्रम करण्याची संधी होती, पण त्यांनी तो हुकवला. पण त्यानंतर गुरुवारी दुसरा सर्वात जलद विजय त्यांनी मिळवला आहे.