For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

इंग्लंडचा विंडीजवर डावाने मोठा विजय

06:58 AM Jul 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
इंग्लंडचा विंडीजवर डावाने मोठा विजय
Advertisement

सामनावीर अॅटकिनसनचे 12 बळी, अँडरसनचा कसोटी क्रिकेटला निरोप

Advertisement

वृत्तसंस्था/लंडन

‘सामनावीर’ गस अॅटकिनसनच्या सामन्यातील 12 बळींच्या जोरावर यजमान इंग्लंडने लॉर्डस् मैदानावर पहिल्या क्रिकेट कसोटीत खेळाच्या तिसऱ्या दिवशी विंडीजचा एक डाव आणि 114 धावांनी दणदणीत पराभव केला. कसोटी क्रिकेटमध्ये 704 बळी मिळविणाऱ्या इंग्लंडच्या वेगवान गोलंदाज जिमी अँडरसनने कसोटी क्रिकेटला निरोप दिला. तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत इंग्लंडने विंडीजवर 1-0 अशी आघाडी मिळविली आहे.

Advertisement

या पहिल्या कसोटीत विंडीजचा पहिला डाव 121 धावांत आटोपल्यानंतर इंग्लंडने पहिल्या डावात 371 धावा जमवित 250 धावांची भक्कम आघाडी मिळविली. इंग्लंडच्या अॅटकिनसनने पहिल्या डावात 45 धावांत 7 गडी बाद केले. 250 धावांनी पिछाडीवर असलेल्या विंडीजला दुसऱ्या डावातही 150 धावांचा टप्पा ओलांडताना आला नाही. त्यांचा दुसरा डाव 47 षटकात 136 धावांत आटोपला. विंडीजच्या दुसऱ्या डावामध्ये मोतीने सर्वाधिक म्हणजे पाच चौकारांसह नाबाद 31, होल्डरने 2 चौकारासह 20, अथांझेने 47 चेंडूत 4 चौकारांसह 22 आणि लुईसने 2 चौकारांसह 14 धावा जमविल्या. इंग्लंडतर्फे अॅटकिनसनने 61 धावांत 5 तर अँडरसनने 32 धावांत 3 तसेच स्टोक्सने 25 धावांत 2 गडी बाद केले. या सामन्यात अॅटकिनसनने 106 धावांत 12 गडी बाद केले.

विंडीजने 6 बाद 79 या धावसंख्येवरुन आपल्या दुसऱ्या डावाला पुढे सुरूवात केली. आणि त्यांचे उर्वरित 4 गडी 57 धावांची भर घालत तंबुत परतले. या पहिल्या कसोटीत यजमान इंग्लंडची विंडीजच्या तुलनेत सर्वच विभागातील कामगिरी दर्जेदार झाल्याने ही कसोटी केवळ तीन दिवसांत समाप्त झाली. अॅटकिनसनने आपल्या कसोटी पदार्पणातच ही सर्वोत्तम कामगिरी केली आहे. 1946 नंतर प्रथमच कसोटीमध्ये मायदेशात कसोटी पदार्पणात अॅलेक बेडसरनंतर 10 गडी बाद करणारा अॅटकिनसन हा पहिला इंग्लिश गोलंदाज आहे.

संक्षिप्त धावफलक : विंडीज प. डाव 41.4 षटकात सर्व बाद 121 (लुईस 27, अथांझे 23, हॉज 24, मोती नाबाद 34, जोसेफ 17, अॅटकिनसन 7-45, अँडरसन, स्टोक्स्, वोक्स प्रत्येकी 1 बळी), इंग्लंड प. डाव 90 षटकात सर्व बाद 371 (क्रॉले 76, पॉप 57, रुट 68, ब्रुक 50, स्मित 70, वोक्स 23, अवांतर 20, सिलेस 4-77, होल्डर 2-58, मोती 2-41, जोसेफ 1-106), विंडीज दु. डाव 47 षटकात सर्व बाद 136 (अथांझे 22, होल्डर 20, मोती नाबाद 31, अवांतर 13, अॅटकिनसन 5-61, अँडरसन 3-32, स्टोक्स 2-25).

अँडरसनचा कसोटीला निरोप

इंग्लंडचा वेगवान गोलंदाज 41 वर्षीय जिमी अँडरसनने लॉर्डस् मैदानावर शुक्रवारी कसोटी क्रिकेटला निरोप दिला. इंग्लंड संघाने अँडरसनला त्याच्या शेवटच्या कसोटीत विजयाच्या रुपाने अनमोल भेट दिली. अँडरसनची ही 188 वी कसोटी आहे. या शेवटच्या कसोटीत त्याने 32 धावांत 3 गडी बाद केले. अँडरसन डिसील्वाला स्मितकरवी झेलबाद केले. तत्पूर्वी अथांझेला झेलबाद केले होते. विंडीजच्या दुसऱ्या डावात त्याने कर्णधार ब्रेथवेटचा त्रिफळा उडविला. अँडरसनने स्वत:च्याच गोलंदाजीवर मोतीचा सोपा झेल सोडला. यावेळी इंग्लंडला या सामन्यातील विजयासाठी आणखी एक गडी बाद करणे जरुरीचे होते. विंडीजचा शेवटचा फलंदाज सिलेस बाद झाल्यानंतर अँडरसनला उपस्थितीत क्रिकेट शौकिनांनी उभे राहून मानवंदना दिली. या सामन्यावेळी जिमीचे आई-वडिल तसेच पत्नी आणि मुले खास उपस्थित होते. विंडीज विरुध्दच्या या पहिल्या कसोटीत अँडरसनने 4 गडी बाद केले. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी मिळविणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत अँडरसन तिसऱ्या स्थानावर आहे. अँडरसनने आपल्या 21 वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीला निरोप दिला. इंग्लंड संघाला अॅटकिनसनच्या रुपात नवा युवा वेगवान गोलंदाज मिळाला असून भविष्य काळात तो इंग्लंडचा प्रमुख भेदक गोलंदाज ठरेल, असे मत अँडरसनने व्यक्त केले.

कसोटी क्रिकेटमधील गोलंदाज

1)मुथय्या मुरलीधरन-श्रीलंका-800 बळी

2) शेन वॉर्न-ऑस्ट्रेलिया-708 बळी

3) जेम्स अँडरसन-इंग्लंड- 704 बळी

4) अनिल कुंबळे-भारत- 619 बळी

5) स्टुअर्ट ब्रॉड-इंग्लंड- 604 बळी

6) ग्लेन मॅकग्रा-ऑस्टेलिया-563 बळी

7) नाथन् लेयॉन-ऑस्ट्रेलिया-530 बळी

8) कोर्टनी वॉल्श-विंडीज-519 बळी

9) रविचंद्रन आश्विन-भारत-516 बळी

10) डेल स्टिन-द. आफ्रिका-439 बळी

Advertisement
Tags :

.