इंग्लंडचा बेअरस्टो संपूर्ण ‘आयपीएल’साठी उपलब्ध
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
इंग्लंडचा फलंदाज जॉनी बेअरस्टो भारताच्या दीर्घ कसोटी दौऱ्यानंतर नुकताच मायदेशी परतला असला, तरी 22 मार्चपासून सुरू होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगच्या संपूर्ण कालावधीसाठी तो उपलब्ध राहणार आहे. धरमशाला कसोटीच्या वेळी बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांची ‘आयपीएल’मधील त्याच्या उपलब्धतेबद्दल इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा चालली होती. बेअरस्टो व संजय बांगर हे पंजाब किंग्सचे प्रतिनिधित्व करीत आहेत.
मागील रविवारी धरमशाला येथे संपलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेनंतर कर्णधार बेन स्टोक्स, ज्यो रूट आणि मार्क वूडसारख्या कसोटीतील नियमित खेळाडूंनी ‘ईसीबी’च्या कामाच्या ताणाच्या व्यवस्थापनाचा एक भाग म्हणून ‘आयपीएल’साठी आधीच आपली अनुपलब्धता जाहीर केली आहे. बेअरस्टो 18 किंवा 19 मार्च रोजी भारतात येण्याची अपेक्षा आहे आणि 23 मार्च रोजी होणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सविऊद्धच्या संघाच्या पहिल्या सामन्यासाठी तो उपलब्ध असेल, असे आयपीएलच्या सूत्रांनी सांगितले.
संजय बांगरकडे दुहेरी जबाबदारी
धरमशाला येथे आपली 100 वी कसोटी खेळलेल्या बेअरस्टोची भारतात फलंदाजीतील कामगिरी निराशाजनक राहिली आणि तो आयपीएलमधून तो पुन्हा फॉर्मात येण्याची अपेक्षा बाळगून असेल. दुसरीकडे ‘पंजाब किंग्ज’च्या क्रिकेट संचालकपदी नियुक्त झालेले संजय बांगर हे संघाचे फलंदाजी प्रशिक्षक म्हणूनही दुहेरी जबाबदारी सांभाळणार आहेत. बांगर यापूर्वी आरसीबीमध्ये होते आणि ते भारताचे फलंदाजी प्रशिक्षकही होते. पंजाब किंग्जने गेल्या मोसमात संघाचा फलंदाजी सल्लागार राहिलेल्या वसीम जाफरशी फारकत घेतली आहे.