For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

इंग्लंडचा 160 धावांनी विजय

06:58 AM Nov 09, 2023 IST | Tarun Bharat Portal
इंग्लंडचा 160 धावांनी विजय
Advertisement

सामनावीर स्टोक्सचे शतक, मलान, वोक्स यांची अर्धशतके, मोईन-आदिल रशिदचे प्रत्येकी 3 बळी

Advertisement

वृत्तसंस्था/ पुणे

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळवल्या गेलेल्या विश्वचषकातील सामन्यात इंग्लंडला उशिरा सुर गवसला आणि नेदरलँड्सवर 160 धावांनी विजय मिळवित चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत स्थान मिळविण्याच्या आशा जिवंत राखल्या. 84 चेंडूत 108 धावांची खेळी करणाऱ्या बेन स्टोक्सला सामनावीराचा पुरस्कार मिळाला.

Advertisement

इंग्लंडने नेदरलँड्ससमोर विजयासाठी 340 धावांचे कठीण आव्हान ठेवले होते. इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. स्टोक्सने शानदार शतक झळकावत संघाला 300 पार धावसंख्या उभारण्यात मदत केली. इंग्लंड आणि नेदरलँड्सचे संघ आधीच या विश्वचषकातून बाहेर पडले होते.  चॅम्पियन्स करंडक स्पर्धेसाठी पात्रता मिळविण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू होता. कठीण आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या नेदरलँड्सचा डाव 37.2 षटकांत  179 धावांत गुंडाळून इंग्लंडने या स्पर्धेतील दुसरा विजय मिळविला. मोईन अली व आदिल रशिद यांनी भेदक फिरकी मारा करीत प्रत्येकी 3 बळी मिळविले तर विलीने 2, वोक्सने एक बळी टिपला. नेदरलँड्सच्या डावात तेजा निदामनुरूने 34 चेंडूत नाबाद 41 धावा फटकावल्या. वेस्ली बॅरेसी (37), सायब्रांड एंगेलब्रेच (33), कर्णधार स्कॉट एडवर्ड्स (42 चेंडूत 38) यांनी चांगली सुरुवात केली, पण त्यांना त्याचे मोठ्या खेळीत रूपांतर करता आले नाही. शनिवारी इंग्लंडचा शेवटचा सामना पाकिस्तानविरुद्ध तर नेदरलँड्सचा शेवटचा सामना भारताविरुद्ध रविवारी होणार आहे. भारत-नेदरलँड्स हा प्राथमिक फेरीतील शेवटचा सामना असेल. त्यानंतर उपांत्य लढती होतील.

मलानचे अर्धशतक

दोन्ही संघांमधील हा सामना गुणतालिकेच्या दृष्टीने फारसा महत्त्वाचा नव्हता. या सामन्यात इंग्लंड संघाला प्रथम फलंदाजी करण्याची संधी मिळाली. सलामीवीर जॉनी बेअरस्टो केवळ 15 धावांमध्ये माघारी परतल्यानंतर जो रुट व डेव्हिड मलान यांनी संघाचा डाव सावरला. या जोडीने 85 धावांची भागीदारी साकारली. यामध्ये मलानने अवघ्या 74 चेंडूत 10 चौकार व 2 षटकारासह 87 धावा फटकावल्या तर रुटने 1 चौकारासह 28 धावांचे योगदान दिले. ही जोडी लागोपाठ बाद झाल्याने इंग्लंडची स्थिती 3 बाद 139 अशी झाली होती.

बेन स्टोक्सचे शतक

 

यानंतर हॅरी ब्रुक, कर्णधार जोस बटलर व मोईन अली स्वस्तात परतले. त्यांना फारसा चमत्कार दाखवता आला नाही. यामुळे बेन स्टोक्स व ख्रिस वोक्स यांनी सावध पवित्रा घेतला. त्यांनी हळूहळू डाव पुढे नेला. खराब चेंडूंचा समाचार घेत स्टोक्सने स्पर्धेतील आपले दुसरे अर्धशतक झळकावले. त्याने केवळ 78 चेंडूंमध्ये विश्वचषकातील आपले पहिले शतक पूर्ण केले. दुसऱ्या बाजूने वोक्सने देखील अर्धशतक करत संघाला 300 पार नेले. स्टोक्सने बाद होण्यापूर्वी 6 चौकार व 6 षटकारांच्या मदतीने 108 धावा केल्या. वोक्सनेही 45 चेंडूत 5 चौकार व 1 षटकारासह 51 धावांचे योगदान दिले. यामुळे इंग्लंडला 50 षटकांत 9 बाद 339 धावांपर्यंत मजल मारता आली. स्टोक्स शेवटच्या षटकात बाद झाला. डेव्हिड विली 6 धावा काढून बाद झाला तर आदिल रशीद 1 व अॅटकिन्सन 2 धावावर नाबाद राहिले. नेदरलँड्सकडून बास डी लीडेने 3 आणि आर्यन दत्त व लोगान बीक यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले.

संक्षिप्त धावफलक : इंग्लंड 50 षटकांत 9 बाद 339 (डेव्हिड मलान 87, जो रुट 28, बेन स्टोक्स 108, ख्रिस वोक्स 51, डी लीडे 74 धावांत 3 बळी, आर्यन दत्त व लोगान बीक प्रत्येकी दोन बळी).

नेदरलँड्स 37.2 षटकांत सर्व बाद 179 : बॅरेसी 37, एंगेलब्रेच 49 चेंडूत 33, एडवर्ड्स 42 चेंडूत 38, बास डी लीडे 10, तेजा 34 चेंडूत 2 चौकार, 3 षटकारांसह नाबाद 41. गोलंदाजी : मोईन अली 3-42, आदिल रशिद 3-54, विली 2-19, वोक्स 1-19

   यंदाच्या वर्ल्डकपमध्ये 500 षटकारांचा अनोखा विक्रम

यंदाची विश्वचषक स्पर्धा जसजशी पुढे जात आहे, तसतसा स्पर्धेचा रोमांचही वाढत आहे. एकापेक्षा एक असे अनोखे विक्रम रचले जात आहेत. बुधवारी पुण्यातील गहुंजे स्टेडियमवर इंग्लंड व नेदरलँड्स यांच्यात सामना खेळवला गेला. या सामन्यात दोन षटकार लगावताच नव्या विक्रमाची नोंद झाली. इंग्लंडच्या डावात डेव्हिड मलानने 17 व 19 व्या षटकात दोन षटकार लगावले. त्याने हे दोन षटकार मारताच यंदाच्या विश्वचषक स्पर्धेतील एकूण षटकारांची संख्या 500 झाली. आयसीसीच्या वनडे वर्ल्डकपमध्ये प्रथमच 500 षटकार खेचले गेले आहेत. 48 वर्षांच्या वनडे विश्वचषक इतिहासात कोणत्याच हंगामात 500 षटकार मारण्याचा विक्रम घडला नव्हता. विशेष म्हणजे, यंदाच्या वर्ल्डकपमध्ये 500 षटकार हे अवघ्या 40 सामन्यात नोंदवले गेले. स्पर्धेतील अजून 8 सामने बाकी आहेत. त्यापूर्वीच ही कामगिरी झाली आहे. यापूर्वी विश्वचषकाच्या एका हंगामात सर्वाधिक षटकार 2015 मध्ये मारले गेले होते. त्या हंगामात 49 सामन्यांमध्ये 463 षटकारांची बरसात झाली होती. 2007 मध्ये 51 सामन्यात 373 षटकार मारले गेले होते. तर चौथ्या स्थानी 2019 चा हंगाम असून या हंगामातील 48 सामन्यात 357 षटकारांचा पाऊस पडला होता.

विश्वचषकाच्या एका हंगामात सर्वाधिक षटकार

2023 - 500 षटकार (40 सामने)

2019 - 357 षटकार (48 सामने)

2015 - 463 षटकार (49 सामने)

2011 -  258 षटकार

2007 - 373 षटकार (51 सामने)

2003 - 266 षटकार

1999 - 153 षटकार

Advertisement
Tags :

.