इंग्लंड महिला संघाचा मालिका विजय
इंग्लंडची बेमाँट ‘सामनावीर’तर चार्ली डीन ‘मालिकावीर’
वृत्तसंस्था/पोश्चेस्ट्रूम (द.आफ्रिका)
तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाने शेवटच्या सामन्यात यजमान द. आफ्रिकेचा डकवर्थ-लेव्हीस नियमाच्या आधारे 24 चेंडू बाकी असताना 6 गड्यांनी पराभव केला. या विजयामुळे इंग्लंडने ही मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली. इंग्लंडच्या बेमाँटला ‘सामनावीर’ तर चार्ली डीनला ‘मालिकावीर’ म्हणून जाहीर करण्यात आले. या मालिकेत या शेवटच्या सामन्यापूर्वी दोन्ही संघ 1-1 असे बरोबरीत होते. त्यामुळे या शेवटच्या निर्णायक सामन्याला विशेष महत्त्व निर्माण झाले होते. इंग्लंडने या सामन्यात नाणेफेक जिंकून द. आफ्रिकेला प्रथम फलंदाजी दिली. द. आफ्रिकेने 50 षटकात 8 बाद 233 धावा जमवित इंग्लंडला विजयासाठी 234 धावांचे आव्हान दिले. त्यानंतर पावसाच्या अडथळ्यामुळे बराच वेळ खेळ थांबवावा लागला. पाऊस थांबल्यानंतर पंचांनी मैदान आणि खेळपट्टीची पाहणी करुन खेळ पुढे सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि इंग्लंडला निर्णायक विजयासाठी 23 षटकात 152 धावांचे नवे उद्दिष्ट दिले. इंग्लंडने 19 षटकात 4 बाद 153 धावा जमवित हा सामना आणि मालिका जिंकली.
द. आफ्रिकेच्या डावामध्ये सलामीच्या वूलव्हर्टने 68 चेंडूत 9 चौकारांसह 61, गुडॉलने 29 चेंडूत 3 चौकारांसह 17, बॉश्चने 36 चेंडूत 3 चौकारांसह 19, डी. क्लर्कने 2 चौकारांसह 14, कॅपने 54 चेंडूत 4 चौकारांसह 38, डर्कसनने 2 चौकारांसह 13, ट्रायॉनने 2 चौकारांसह 20 आणि डीरिडेरने 1 चौकारासह नाबाद 19 व मलाबाने 3 चौकारांसह नाबाद 16 धावा जमविल्या. द. आफ्रिकेच्या डावात 29 चौकार नोंदविले गेले. इंग्लंडतर्फे कॅप्से, चार्ली डीन आणि इक्लेस्टोन यांनी प्रत्येकी 2 तर बेलने 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना इंग्लंडच्या डावामध्ये बेमाँटने 46 चेंडूत 10 चौकारांसह 65, बाऊचरने 1 चौकारासह 4, कर्णधार नाईटने 1 चौकारासह 6, डॅनी वेट हॉजने 16 चेंडूत 4 चौकारांसह 22 आणि अॅमि जोन्सने 36 चेंडूत 6 चौकारांसह नाबाद 49 धावा झळकविल्या. बिमाँट आणि जोन्स यांनी पाचव्या गड्यासाठी अभेद्य 90 धावांची भागिदारी करत विजयाचे सोपस्कार पूर्ण केले. इंग्लंडच्या डावात 22 चौकार नोंदविले गेले. द. आफ्रिकेतर्फे कॅपने 24 धावांत 3 तर ट्रायॉनने 26 धावांत 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक :
द. आफ्रिका 50 षटकात 8 बाद 233 (वूलव्हर्ट 61, कॅप 38, ट्रायॉन 20, डीरिडेर 19, गुडॉल 17, बॉश्च 19, मलाबा नाबाद 16, अवांतर 16, कॅप्से, चार्ली डीन इक्लेस्टोन प्रत्येकी 2 बळी, बेल 1-46), इंग्लंड (23 षटकात 153 धावांचे नवे उद्दिष्ट), 19 षटकात 4 बाद 153 (बिमाँट नाबाद 65, जोन्स नाबाद 49, हॉज 22, नाईट 6, बाऊचर 4, अवांतर 7, कॅप 3-24, ट्रायॉन 1-26)