मॅकस्विनीला डच्चू दिल्याने क्लार्कची निवड समितीवर टीका
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकेल क्लार्कने भारताविऊद्धच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या चौथ्या कसोटीसाठी संघ निवडताना नॅथन मॅकस्विनीला डच्चू दिल्याबद्दल राष्ट्रीय निवड समितीवर टीका केली आहे. तीन कसोटींमध्ये उस्मान ख्वाजासोबत सलामीला आलेल्या मॅकस्विनीला वगळण्यात आल्याने पुढील आठवड्यात मेलबर्नमध्ये होणाऱ्या बॉक्सिंग डे सामन्यात खेळण्याच्या दृष्टीने 19 वर्षीय सॅम कोन्स्टासचा मार्ग मोकळा झाला आहे.
25 वर्षीय मॅकस्विनीला आपल्या पदार्पणाच्या मालिकेत छाप पाडता न येऊन त्याने 14.40 च्या सरासरीने फक्त 72 धावा जमवल्या. तथापि क्लार्कने सध्याच्या संघातील तऊणाईची कमतरता आणि खेळाडूंचे वाढलेले वयोमान या घटकांवर बोट ठेवून मॅकस्विनीची वकालत केली आहे. ‘नॅथन मॅकस्विनीच्या व्यतिरिक्त प्रत्येकाचे वय 30 वर्षांपेक्षा जास्त आहे. आम्ही काय करणार आहोत ? एखाद्या तऊणाला दोन-तीन सामन्यांपुरते खेळवायचे, नंतर त्याला डच्चू द्यायचा, मग इतर कोणाला तरी वापरून पाहायचे आणि या वय वाढलेल्या खेळाडूंना मात्र ठेवायचे असेच करणार आहोत का ?, असे क्लार्कने ‘बियाँड 23 क्रिकेट पॉडकास्ट’वर सांगितल्याचे वृत्त दि सिडनी मॉर्निंग हेराल्डने दिले आहे.