इंग्लंड महिला संघाची विजयी सलामी
द.आफ्रिकेचा 10 गड्यांनी दणदणीत पराभव, लिन्सी स्मिथ सामनावीर
वृत्तसंस्था / गुवाहाटी
आयसीसीच्या महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत शुक्रवारी येथे खेळविण्यात आलेल्या सामन्यात इंग्लंडने भेदक फिरकीच्या जोरावर द. आफ्रिकेचा 10 गड्यांनी दणदणीत पराभव करत आपल्या मोहिमेला दणकेबाज प्रारंभ केला. या सामन्यात इंग्लंडची सामनावीर फिरकी गोलंदाज लिन्सी स्मिथने 7 धावांत 3 गडी बाद केले.
या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून द. आफ्रिकेला प्रथम फलंदाजी दिली. इंग्लंडच्या शिस्तबद्ध आणि अचूक गोलंदाजीसमोर द. आफ्रिकेचा डाव केवळ 20.4 षटकात 69 धावांत आटोपला. द. आफ्रिका संघातील सिनालो जाप्टाने 36 चेंडूत 3 चौकारांसह 22 ही दुहेरी धावसंख्या गाठली. इतर फलंदाजांना दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. द. आफ्रिकेने पहिल्या पॉवरप्ले दरम्यानच्या 10 षटकात 38 धावांत 5 गडी गमविले. द. आफ्रिकेचे अर्धशतक 87 चेंडूत फलकावर लागले तर 15 षटकाअखेर त्यांची स्थिती 7 बाद 54 अशी होती. गुवाहाटीची खेळपट्टी फिरकीला अनुकूल असल्याने इंग्लंडच्या कर्णधाराने फिरकी गोलंदाजांच्या हाती लवकरच चेंडू सोपविला. स्मिथने आपल्या दुसऱ्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर द. आफ्रिकेची कर्णधार वूलव्हार्टला टिपले. तिने 5 धावा जमविल्या. त्यानंतर स्मिथने ब्रिट्सचा 5 धावांवर त्रिफळा उडविला. इंग्लंड संघातील वेगवान गोलंदाज बेलने सुने लूसचा 2 धावांवर त्रिफळा उडविला. स्मिथने द.आफ्रिकेला आणखी एक धक्का देताना कॅपला 4 धावांवर त्रिफळाचीत केले. पहिल्या 6 षटकातच द.आफ्रिकेची स्थिती 4 बाद 19 अशी केविलवाणी झाल्यानंतर हा संघ शेवटी स्वत:ला सावरु शकला नाही. इंग्लंडच्या नॅट सिव्हर ब्रंटने बॉशला 6 धावांवर पायचीत केले. ब्रंटने द.आफ्रिकेला आणखी एक धक्का देताना ट्रायॉनला 2 धावांवर तंबूचा रस्ता दाखविला. इक्लेस्टोनने डी क्लर्कला 3 धावांवर झेलबाद केले. डीनने क्लासचा 3 धावांवर त्रिफळा उडविला. इक्लेस्टोनने जाप्टाला 18 व्या षटकात बाद केले. डीनने म्लाबाचा त्रिफळा उडवून द.आफ्रिकेला 20.3 षटकात 69 धावांत रोखले. इंग्लंडतर्फे स्मिथने 7 धावांत 3 तर नॅट सिव्हर ब्रंट, इक्लेस्टोन आणि डीन यांनी प्रत्येकी 2 तसेच बेलने 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना इंग्लंडने 14.1 षटकात बिनबाद 73 धावा जमवित हा सामना 10 गड्यांनी एकतर्फी जिंकला. ब्यूमॉन्टने 35 चेंडूत 3 चौकारांसह नाबाद 21 तर अॅमी जोन्सने 50 चेंडूत 6 चौकारांसह नाबाद 40 धावा झोडपल्या. आयसीसीच्या महिलांच्या स्पर्धेमध्ये द.आफ्रिकेची ही निचांकी धावसंख्या आहे. पण या स्पर्धेत 51 ही सर्वात निचांकी धावसंख्या नोंदविली गेली होती. त्यामुळे द.आफ्रिकेची ही दुसऱ्या क्रमांकाची निचांकी धावसंख्या आहे.
संक्षिप्त धावफलक : द. आफ्रिका 20.4 षटकात सर्वबाद 69 (जाप्टा 22, अवांतर 8, स्मिथ 3-7, नॅट सिव्हर ब्रंट, इक्लेस्टोन, डीन प्रत्येकी 2 बळी, बेल 1-24), इंग्लंड 14.1 षटकात बिनबाद 73 (ब्यूमॉन्ट नाबाद 21, जोन्स नाबाद 40, अवांतर 12)