इंग्लंड महिला संघ उपांत्य फेरीत
भारताचा सलग तिसरा पराभव : सामनावीर नाईटचे शतक
वृत्तसंस्था/ इंदूर
आयसीसी महिलांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत येथे रविवारी झालेल्या चुरशीच्या सामन्यात इंग्लंडने यजमान भारताचा 4 धावांनी पराभव करत या स्पर्धेत आपली विजय घौडदौड कायम राखली आहे. इंग्लंडच्या नाईटने शानदार शतक (109) तर जोन्सने अर्धशतक झळकविले. नाईटला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. या स्पर्धेत विद्यमान विजेता ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रीका आणि इंग्लंड यांनी उपांत्य फेरीतील आपले स्थान निश्चित केले आहे. तर चौथ्या संघासाठी भारत आणि न्यूझीलंड यांच्यात चुरस सुरू राहील. गुरुवारी भारत व न्यूझीलंड यांची लढत होणार आहे.
भारतीय संघाचा हा सलग तिसरा पराभव आहे. आता या स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी भारतीय संघाला उर्वरीत दोन सामने जिंकावेच लागतील. स्पर्धेच्या गुणत्तक्यात ऑस्ट्रेलिया 9 गुणासह पहिल्या, इंग्लंड 9 गुणासह दुसऱ्या, द. आफ्रिका 8 गुणासह तिसऱ्या स्थानावर आहेत. भारत आणि न्यूझीलंड यांनी समान 4 गुण मिळविले असले तरी सरस धावगतीवर भारत चौथ्या तर न्यूझीलंड पाचव्या स्थानावर आहे.
रविवारच्या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडने 50 षटकात 8 बाद 288 धावा जमविल्या. त्यानंतर भारताने 50 षटकात 6 बाद 284 धावपर्यंत मजल मारली.
इंग्लंडच्या डावामध्ये बिमाँट आणि जोन्स यांनी सुरूवातीपासूनच धावांची गती चांगलीच राखली. या जोडीने 16 षटकात 73 धावांची भागीदारी केली. दिप्ती शर्माने बिमॉन्टचा त्रिफळा उडविला. तिने दोन चौकारांसह 22 धावा केल्या. अॅमि जोन्सने 68 चेंडूत 8 चौकारांसह 56 धावा झळकविल्या. दिप्ती शर्माने तिला झेलबाद केले. कर्णधार नॅट सिव्हेर ब्रन्ट आणि नाईट यानी संघाला भक्कम स्थितीत नेताना तिसऱ्या गड्यासाठी 113 धावांची शतकी भागीदारी केली. ब्रन्टने 4 चौकारांसह 38 धावा जमविल्या. नाईटने 91 चेंडूत 1 षटकार आणि 15 चौकारांसह 109 धावा झळकविल्या. नाईटचा हा 300 वा आंतरराष्ट्रीय सामना असून तिने वनडे क्रिकेटमधील आपले तिसरे शतक झळकविले. डंक्लेने 1 चौकारासह 15, लॅम्बने 1 चौकारासह 11, कॅप्सेने 2, चार्ली डीनने 2 चौकारासह नाबाद 19, तर इक्लेस्टोनने 3 धावा जमविल्या. इंग्लंडने आपले शेवटचे 5 फलंदाज 39 धावात गमविले. भारतातर्फे दिप्ती शर्माने 51 धावात 4 तर चरणीने 2 गडीबाद केले. इंग्लंडचे दोन फलंदाज धावचित झाले. दिप्ती शर्माने वनडे क्रिकेटमध्ये इंग्लंडच्या बिमॉन्टला बाद करून आपला 150 वा बळी नोंदविला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना भारताच्या डावाला चांगली सुरूवात झाली नाही. सलामीची रावल तिसऱ्या षटकात केवळ 6 धावावर बाद झाली. त्यानंतर देओल 10 व्या षटकात तंबुत परतली. देओलने 31 चेंडूत 5 चौकारांसह 24 धावा जमविल्या. स्मृती मानधना आणि कर्णधार हरमनप्रित कौर यानी तिसऱ्या गड्यासाठी 125 धावांची भागीदारी केली. हरमनप्रित कौरने 70 चेंडूत 10 चौकारांसह 70 धावा झळकविल्या. ती 31 व्या षटकात बाद झाली. एका बाजुने स्मृती मानधनाने चिवट फलंदाजी करताना धावफलक हलता ठेवला. मानधनाला दिप्ती शर्माकडून चांगली साथ मिळाली. या जोडीने चौथ्या गड्यासाठी 67 धावांची भागीदारी केली. मानधनाने 94 चेंडूत 8 चौकारांसह 88, तर दिप्ती शर्माने 57 चेंडूत 5 चैकारांसह 50 धावा झळकविल्या. मात्र रिचा घोषकडून निराशा झाली. ती केवळ 8 धावांवर बाद झाली. दिप्ती शर्मा 47 व्या षटकात तंबुत परतली. त्यावेळी भारताला विजयासाठी 19 चेंडूत 27 धावांची जरूरी होती. पण इंग्लंडच्या गोलंदाजांनी शेवटच्या 3 षटकात भारताला विजयापासून रोखण्यात यश मिळविले. अमनज्योत कौरने 2 चौकारासह नाबाद 18, तर स्नेह राणाने 1 चौकारासह नाबाद 10 धावा केल्या. भारताने 50 षटकात 6 बाद 284 धावा जमविल्याने त्यांना हा सामना 4 धावांनी गमवावा लागला.
संक्षिप्त धावफलक : इंग्लंड- 50 षटकात 8 बाद 288 (नाईट 109, जोन्स 56, बिमॉन्ट 22, नॅट सिव्हेर ब्रन्ट 38, डंक्ले 15, लॅम्ब 11, डीन नाबाद 19, अवांतर 13, दीप्ती शर्मा 4-51, श्रीचरणी 2-68), भारत-50 षटकात 6 बाद 284 (स्मृती मानधना 88, हरमनप्रित कौर 70, देओल 24, दिप्ती शर्मा 50, अमनजोत कौर नाबाद 18, स्नेह राणा नाबाद 10, रिचा घोष 8, अवांतर 10, नॅट सिव्हेर ब्रन्ट 2-47, बेल, स्मिथ, डीन, इक्लेस्टोन प्रत्येकी 1 बळी).