इंग्लंड महिला संघाला दंड
वृत्तसंस्था/ नॉटिंगहॅम
पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील येथे शनिवारी खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाला षटकांची गती राखता न आल्याने त्यांना आयसीसीने दंड ठोठावला आहे. या संघाला मिळणाऱ्या मानधन रकमेतील 10 टक्के रक्कम दंड म्हणून द्यावी लागणार आहे.
आयसीसीच्या सामनाधिकारी पॅनलच्या हेलन पॅकने ही घोषणा केली. या पहिल्या सामन्यात भारतीय महिला संघाने इंग्लंडचा 97 धावांनी पराभव करुन विजयी सलामी दिली आहे. इंग्लंड महिला संघाला निर्धारित वेळेत षटके पूर्ण करता आली नाहीत. त्यामुळे या संघाची कर्णधार नॅट सिव्हेर ब्रंटला दोषी ठरविण्यात आले असून तिने आपला गुन्हा मान्य केला असल्याने आता या प्रकरणाची आयसीसीच्या शिस्तपालन समितीसमोर सुनावणीची गरज भासणार नाही. या सामन्यात भारताची सलामीची फलंदाज आणि हंगामी कर्णधार स्मृती मानधनाने दमदार शतक झळकविले होते.