इंग्लंड महिला संघाची घोषणा
► वृत्तसंस्था/लंडन
संयुक्त अरब अमिरातमध्ये ऑक्टोबर महिन्यात सुरू होणाऱ्या आयसीसीच्या टी-20 विश्वचषक महिलांच्या क्रिकेट स्पर्धेसाठी इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाने मंगळवारी 15 खेळाडूंचा संघ जाहीर केला. या महत्वाच्या स्पर्धेसाठी संघ निवड करताना अलिकडे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेतील खेळाडूंच्या कामगिरीचा आढावा घेण्यात आला. या संघात केटी क्रॉस आणि लॉरेन फिलेर यांना वगळण्यात आले आहे.
या स्पर्धेसाठी इंग्लंड महिला संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी हीदर नाईटकडे सोपविण्यात आली आहे. आयसीसीच्या या नवव्या महिलांच्या टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी पुन्हा नाईटची निवड सदस्यांनी केली आहे. इंग्लंडमध्ये नुकत्याच झालेल्या द हंड्रेड या स्पर्धेतील क्रिकेटपटूंच्या कामगिरीचा विचार निवडीसाठी करण्यात आला. या स्पर्धेमध्ये फिरकी गोलंदाज लिनसे स्मिथ, वेगवान गोलंदाज लॉरेन बेल, अष्टपैलु डॅनी गिब्सन आणि यष्टीरक्षक व फलंदाज बेस हिथ यांची कामगिरी दर्जेदार झाल्याने त्यांना संघात स्थान देण्यात आले आहे. दरम्यान सलामीची अनुभवी फलंदाज टॅमी ब्युमाँटला वगळून अनपेक्षित धक्का देण्यात आला आहे.
या स्पर्धेत इंग्लंड संघाचा ब गटात समावेश आहे. ब गटामध्ये बांगलादेश, स्कॉटलंड, द.आफ्रिका व विंडीज यांचा सहभाग राहिल. या स्पर्धेसाठी निवडण्यात आलेला इंग्लंडचा महिला क्रिकेट संघ समतोल असून हा संघ दर्जेदार कामगिरी करेल, असा विश्वास कर्णधार नाईटने व्यक्त केला आहे.
इंग्लंड महिला संघ: हीदर नाईट (कर्णधार), डॅनी वॅट, सोफिया डंकले, नॅट सिव्हर ब्रंट, अॅलिस कॅप्से, अॅमी जोन्स, सोफी इक्लेस्टोन, चार्ली डीन, सारा ग्लेन, लॉरेन बेल, माईया बाऊचर, लिन्से स्मिथ, फ्रेया केम्प, डॅनी गिब्सन आणि बेस हिथ.