इंग्लंड महिलांचा दुसरा विजय
द.आफ्रिकेवर 7 गड्यांनी मात, सामनावीर एक्लेस्टोनचे 2 बळी
वृत्तसंस्था/ शारजाह
इंग्लंड महिला संघाने अष्टपैलू खेळाचे प्रदर्शन करीत महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेतील सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 7 गड्यांनी पराभव करून सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली. 15 धावांत 2 बळी टिपणाऱ्या सोफी एक्लेस्टोननला सामनावीराचा बहुमान मिळाला.
इंग्लंडच्या फिरकी चौकडीने दक्षिण आफ्रिकन महिला संघाला जखडून ठेवत फारशी फटकेबाजी करण्याची संधी दिली नाही. डेथ ओव्हर्समध्ये अचूक मारा करीत त्यांनी द.आफ्रिकेला निर्धारित 20 षटकांत 6 बाद 124 धावांवर रोखले. त्यानंतर इंग्लंडने पहिल्या 9 षटकांत दोन बळी गमविले असले तरी डॅनी वॅट हॉज (43 चेंडूत 43) व नॅट सिव्हर ब्रंट (36 चेंडूत नाबाद 48) यांनी पूर्ण नियंत्रण मिळवित इंग्लंडला चार चेंडू बाकी ठेवून विजय मिळवून दिला. या दोघींनी चौथ्या गड्यासाठी 55 चेंडूत 64 धावांची निर्णायक भागीदारी केली. वॅट हॉज बाद झाली त्यावेळी इंग्लंडला 12 चेंडूत 11 धावांची गरज होती. आयाबोंगा खाकाच्या शेवटच्या षटकात सिव्हर ब्रंटने आवश्यक धावा काढून विजय साकार केला.
द.आफ्रिकेच्या डावात कर्णधार लॉरा वुलव्हार्टने 42, अॅनेरी डर्कसेनने नाबाद 20, मारिझेन कॅपने 26 धावा केल्या तर इंग्लंडच्या डावात अॅलीस कॅप्सेने 19 धावा केल्या.
संक्षिप्त धावफलक : द.आफ्रिका महिला 20 षटकांत 6 बा 124 : वुलव्हार्ट 42, डर्कसेन नाबाद 20, कॅप 26, एक्लेस्टोन 2-15, सारा ग्लेन 1-18. इंग्लंड महिला 19.2 षटकांत 3 बाद 125 : सिव्हर ब्रंट नाबाद 48, वॅट हॉज 43, कॅप्से 19, कॅप 1-17, म्लाबा 1-22.