इंग्लंडचा महिला वनडे संघ जाहीर
वृत्तसंस्था/ लंडन
चालू महिन्याच्या अखेरीस इंग्लंड आणि भारत यांच्यात होणाऱ्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाने मंगळवारी 15 सदस्यांचा संघ जाहीर केला असून यामध्ये सोफी इक्लेस्टोन आणि माईया बाऊचर यांचा समावेश करण्यात आला आहे.
या मालिकेतील सामने 16, 19 आणि 22 जुलै रोजी खेळविले जाणार आहेत. विंडीज विरुद्धची वनडे मालिका इक्लेस्टोनला हुकली होती. आता तिचे भारता विरुद्धच्या मालिकेसाठी संघात पुनरागमन झाले आहे. इंग्लंडची कर्णधार नॅट सिव्हेर ब्रंट हिला दुखापतीमुळे पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील शेवटच्या तीन सामन्यात खेळता न आल्याने तिच्या जागी बाऊचरला संधी देण्यात आली होती. मात्र भारताविरुद्धच्या आगामी वनडे मालिकेसाठी कर्णधार ब्रंट पूर्णपणे तंदुरूस्त झाल्याचे सांगण्यात आले. सध्या सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत भारताने इंग्लंडवर 2-1 अशी आघाडी मिळविली आहे.
इंग्लंड वनडे संघ - नॅट स्किव्हेर ब्रंट (कर्णधार), आर्लोट, डंक्ले, लँब, बिमाँट, अॅमी जोन्स, बाऊचर, कॅप्से, केटी क्रॉस, अॅलीसी रिचर्डस्, चार्ली डीन, इक्लेस्टोन, फिलेर, स्मिथ आणि बेल.