इंग्लंड महिला क्रिकेट संघाचा मालिका विजय
► वृत्तसंस्था/ हॅमिल्टन
इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाने यजमान न्यूझीलंडचा तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत 2-1 अशा फरकाने पराभव केला. या मालिकेतील खेळवण्यात आलेल्या रविवारच्या तिसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने इंग्लंडचा 7 गड्यांनी पराभव केला आहे. न्यूझीलंडच्या सोफी डिव्हाइनला ‘सामनावीर’ तर इंग्लंडच्या अॅमी जोन्सला ‘मालिकावीर’ म्हणून घोषित करण्यात आले.
या मालिकेतील रविवारी झालेल्या शेवटच्या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. इंग्लंडचा डाव 46.3 षटकात 194 धावात आटोपला. त्यानंतर न्यूझीलंडने 39 षटकात 3 बाद 195 धावा जमवित विजय नोंदविला.
इंग्लंडच्या डावामध्ये अॅमी जोन्सने 52 चेंडूत 6 चौकारांसह 50, चार्ली डीनने 64 चेंडूत 3 चौकारांसह 38, नॅट सिव्हर ब्रंटने 41 चेंडूत 3 चौकारांसह 27, कर्णधार नाईटने 50 चेंडूत 3 चौकारांसह 31, बाऊचरने 17 चेंडूत 3 चौकारांसह 19 धावा जमविल्या. इंग्लंडच्या डावामध्ये 21 चौकार नोंदविले गेले. न्यूझीलंडतर्फे जेस केर आणि रो यांनी प्रत्येकी 3 तर अॅमेलिया केरने 2 व बेट्सने 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना न्यूझीलंडच्या डावामध्ये कर्णधार सोफी डिव्हाइनने नाबाद शतक झळकवले. तिने 93 चेंडूत 4 षटकात आणि 11 चौकारांसह नाबाद 100 धावा झळकवल्या. अॅमेलिया केरने 60 चेंडूत 4 चौकारांसह 31 तर ग्रीनने 54 चेंडूत 3 चौकारांसह नाबाद 38 धावा जमविल्या. बेट्स 6 धावावर तर प्लिमेर 4 धावावर बाद झाले. इंग्लंडतर्फे क्रॉस, नॅट सिव्हर ब्रंट आणि इक्लेस्टोन यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. न्यूझीलंडच्या डावात 4 षटकार आणि 19 चौकार नोंदविले गेले.
संक्षिप्त धावफलक - इंग्लंड - 46.3 षटकात सर्वबाद 194 (जोन्स 50, डीन 38, बाऊचर 19, नाईक 31, नॅट सिव्हर ब्रंट 27. अवांतर 14, जेस केर 3-39, रो 3-42, अॅमेलिया केर 2-46, बेट्स 1-12), न्यूझीलंड 39 षटकात 3 बाद 195 (सोफी डिव्हाइन नाबाद 100, अॅमेलिया केर 31, बेट्स 6, प्लिमेर 4, ग्रीन नाबाद 38, अवांतर 16, क्रॉस, नॅट सिव्हर ब्रंट, इक्लेस्टोन प्रत्येकी 1 बळी).
......