इंग्लंडचा भारतावर विजय
वृत्तसंस्था/ अहमदाबाद
मंगळवारी येथे खेळविण्यात आलेल्या दिव्यांग क्रिकेट स्पर्धेतील पाचव्या आणि शेवटच्या टी-20 सामन्यात इंग्लंडने यजमान भारताचा 22 धावांनी पराभव केला. पण 5 सामन्यांची ही मालिका यजमान भारताने 3-2 अशा फरकाने जिंकली.
या शेवटच्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने 20 षटकात 6 बाद 152 धावा जमविल्या. फ्लेनने 43 चेंडूत 53 तर ओब्रायनने 28 चेंडूत 45 धावा केल्या. भारतातर्फे रविंद्र सांतेने 2 गडी बाद केले. त्यानंतर भारताने 20 षटकात 7 बाद 130 धावा जमविल्याने त्यांना हा सामना 22 धावांनी गमवावा लागला. कर्णधार विक्रांत केणीने 49 चेंडूत 45 धावा केल्या. इंग्लंडतर्फे हॅमने 3 तर फ्लिनने 2 गडी बाद केले. इंग्लंडच्या फ्लिनला सामनावीर व मालिकावीर म्हणून घोषित करण्यात आले असून त्याला एकूण दीड लाख रुपयांचे बक्षीस देण्यात आले. कर्णधार विक्रांत केणीला सर्वोत्तम फलंदाज म्हणून घोषित करण्यात आले असून त्याला 25 हजार रुपयांचे बक्षीस त्याचप्रमाणे सर्वोत्तम गोलंदाज सनीला 25 हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आले.