इंग्लचा पाकिस्तावर 7 गड्यानी विजय
वर्ल्डकपआधीच इंग्लंडचे जोरदार सेलिब्रेशन : पाकिस्तानविरुद्ध मिळवला टी 20 मालिकाविजय
वृत्तसंस्था/ लंडन
चार सामन्यांच्या टी 20 मालिकेतील गुरुवारी रात्री झालेल्या चौथ्या टी 20 सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानचा 7 गडी राखून पराभव केला. या विजयासह इंग्लंडने मालिका 2-0 अशा फरकाने जिंकली. या मालिकेत दोन सामने खेळता आले तर दोन सामने पावसामुळे रद्द झाले. पाकने प्रथम फलंदाजी करताना सर्वबाद 157 धावा केल्या. यानंतर इंग्लंडने विजयी आव्हान 15.3 षटकांत तीन गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. सामन्यात 2 बळी व 2 झेल घेणाऱ्या इंग्लंडच्या आदील रशीदला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. विशेष म्हणजे, वर्ल्डकपसाठी केवळ दोन दिवसांचा कालावधी राहिला असताना इंग्लंडने टी 20 मालिका जिंकत वर्ल्डकपसाठी आपली दावेदारी भक्कम केली आहे.
इंग्लंडने नाणेफेक जिंकून पाकिस्तानला फलंदाजीसाठी पाचारण केले. मोहम्मद रिझवान आणि बाबर आझम यांनी दमदार सुरुवात करताना पॉवरप्लेमध्ये 59 धावा केल्या. मात्र पॉवरप्लेच्या शेवटच्या चेंडूवर बाबर आझम 36 धावा काढून बाद झाला. जोफ्रा आर्चरने त्याची विकेट घेतली. यानंतर पाठोपाठ रिझवानही 23 धावांवर बाद झाला. उस्मान खानने 21 चेंडूत 38 धावा जोडल्या पण त्याला इतर फलंदाजांची अपेक्षित साथ मिळाली नाही. ठराविक अंतराने गडी बाद होत गेल्याने पाक संघ अडचणीत सापडला होता. यावेळी इफ्तिकार अहमदने 21 तर नसीम शाहने 16 धावा जोडल्या. ही जोडी बाद झाल्यानंतर पाकचा डाव 19.5 ष्घ्टकांत 157 धावांवर आटोपला.
धावांचा पाठलाग करताना सलामीवीर फिल साल्टने 24 चेंडूत 45 धावांची आक्रमक खेळी खेळली. कर्णधार जोस बटलरने त्याला साथ देताना 21 चेंडूत 39 धावांच योगदान दिले. कर्णधार जोस बटलर आणि फिल साल्ट या दोघांनी पहिल्या विकेट्ससाठी 6.6 षटकात 82 धावांची भागीदारी केली. यानंतर जॉनी बेअरस्टो 16 चेंडूत 28 धावा तर विल जॅक्स 18 चेंडू 20 धावा आणि हॅरी ब्रूक 14 चेंडू 17 धावा करत संघाला 15.3 षटकांत विजय मिळवून दिला.
संक्षिप्त धावफलक
पाकिस्तान 19.5 षटकांत सर्वबाद 157 (बाबर आझम 36, उस्मान खान 38, रिझवान 23, अहमद 21, मार्क वूड, आदिल रशीद, लिव्हिंगस्टोन प्रत्येकी दोन बळी)
इंग्लंड 15.3 षटकांत 3 बाद 158 (फिल सॉल्ट 45, बटलर 39, जॅक्स 20, ब्रुक नाबाद 17, हॅरिस रौफ 3 बळी).