इंग्लंड आज भिडणार पारंपरिक प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलियाशी
वृत्तसंस्था/ लाहोर
इंग्लंड आणि दुखापतींमुळे त्रस्त ऑस्ट्रेलिया हे अॅशेसचे प्रतिस्पर्धी आज शनिवारी होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीतीली गट ‘ब’च्या सामन्यात आमनेसामने येणार असून यावेळी विजयी सुऊवात करण्यास ते उत्सुक असतील. दोन्ही संघांना अलीकडेच एकदिवसीय स्वरूपात संघर्ष करावा लागला आहे. गेल्या दोन मालिकांत विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाला श्रीलंकेकडून (0-2) आणि पाकिस्तानकडून (1-2) पराभव पत्करावा लागला आहे.
आता सर्व प्रकारच्या सामन्यांमध्ये ब्रेंडन मॅक्युलम हा प्रशिक्षक म्हणून लाभलेल्या इंग्लंडने 2023 च्या विश्वचषक मोहिमेनंतर एकही एकदिवसीय मालिका जिंकलेली नाही. जोस बटलरच्या नेतृत्वाखालील संघाने भारताकडून 0-3 असा पराभव पत्करला. भारतात ते पूर्णपणे अपयशी ठरले आणि यजमान संघाशी सामना करू शकले नाहीत. त्यामुळे आयसीसीच्या या स्पर्धेत दोन्ही संघ आपली छाप पाडण्यास उत्सुक असतील. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये इंग्लंडमध्ये झालेल्या पाच सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाने इंग्लंडवर 3-2 अशी मात केली होती. तथापि तेव्हापासून बरेच काही बदलले आहे, कारण विश्वविजेत्यांनी त्यांचे पाच प्रमुख खेळाडू गमावले आहेत.
यामुळे त्यांच्या वेगवान माऱ्यावर विशेषत: परिणाम होईल. कारण ते त्यांच्या प्रसिद्ध त्रिकुटाशिवाय खेळतील. पॅट कमिन्स, जोश हेझलवूड आणि मिशेल स्टार्क हे सर्व या स्पर्धेतून बाहेर पडले आहेत. अष्टपैलू मिशेल मार्श (पाठीची दुखापत), कॅमेरॉन ग्रीन (दुखापत) आणि ज्याने स्पर्धेसाठीच्या सुऊवातीच्या संघात स्थान मिळवल्यानंतर अचानक निवृत्ती घेतली तो मार्कस स्टोइनिस यांचा देखील अभाव त्यांना जाणवेल. अशा परिस्थितीत प्रभारी कर्णधार स्टीव्ह स्मिथच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलिया ‘मिनी विश्वचषक’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या स्पर्धेत त्यांच्या मागील यशाची पुनरावृत्ती करू शकेल का हे पाहावे लागेल.
मार्श अनुपस्थित असल्याने स्मिथ तिसऱ्या क्रमांकावर येण्याची शक्यता आहे. सर्वांच्या नजरा स्फोटक सलामीवीर ट्रॅव्हिस हेडवर असतील, ज्याने 2022 च्या मालिकेत याच ठिकाणी 101 आणि 89 धावा केल्या होत्या. रणनीती म्हणून इंग्लंडने जोफ्रा आर्चरसह मार्क वूड आणि ब्रायडन कार्स अशा तीन वेगवान गोलंदाजांची निवड केली आहे. आदिल रशीदची फिरकी गोलंदाजी त्यांना साथ देईल.
इंग्लंडने उदयोन्मुख यष्टिरक्षक-फलंदाज जेमी स्मिथलाही संघात स्थान दिले आहे, जो तिस्रया क्रमांकावर फलंदाजी करण्याची शक्यता आहे. भारताविऊद्ध फॉर्ममध्ये दिसलेला बेन डकेट हा मजबूत सुऊवात देण्याचा प्रयत्न करेल, तर ज्यो रूट फलंदाजीचा आधार असेल. भारताविरुद्धच्या मालिकेत डकेटनंतर इंग्लंडचा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरलेला रूट येथे प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करेल. चॅम्पियन्स ट्रॉफीचे पहिल्यांदाच जेतेपद मिळविण्याच्या प्रयत्नात असलेला इंग्लंड भारतात अलीकडे काय घडले त्यावर लक्ष न देता पुढे जाऊ पाहत आहे.
संघ : ऑस्ट्रेलिया: स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), शॉन अॅबॉट, अॅलेक्स केरी, बेन द्वारशुइस, नॅथन एलिस, जेक फ्रेझर-मॅकगर्क, आरोन हार्डी, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, स्पेन्सर जॉन्सन, मार्नस लाबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, तन्वीर संघा, मॅथ्यू शॉर्ट, अॅडम झॅम्पा, राखीव : कूपर कॉनोली.
इंग्लंड: जोस बटलर (कर्णधार), फिल सॉल्ट, बेन डकेट, जेमी स्मिथ, ज्यो रूट, हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर, आदिल रशिद, मार्क वूड.
सामन्याची वेळ : दुपारी 2.30 वा.