इंग्लंडचा आज नामिबियाशी मुकाबला
नामिबिया/ वृत्तसंस्था
नॉर्थ साउंड (अँटिगा)
गतविजेता इंग्लंड आज शनिवारी येथे नामिबियाला पूर्णपणे चिरडून टी-20 विश्वचषकाच्या सुपर एट टप्प्यात प्रवेश करण्यासाठी लागलेल्या शर्यतीत शाबूत राहण्यास उत्सुक असेल. स्कॉटलंडविऊद्धचा सामना पावसात वाहून गेल्यानंतर आणि ऑस्ट्रेलियाविऊद्धच्या पराभवानंतर इंग्लंडचा संघ काठावर उभा होता. परंतु जोस बटलरच्या नेतृत्वाखालील संघाने ओमानवर आठ गड्यांनी विजय मिळवून चित्र बदलून टाकले.
या निकालाने इंग्लंडच्या धावसरासरीमध्ये आश्चर्यकारक बदल घडविला आहे, जो त्यांच्या आणि स्कॉटलंडच्या बाबतीत महत्त्वाचा घटक ठरणार आहे. इंग्लंडने स्कॉटलंडच्या 2.16 धावसरासरीला मागे टाकताना उणे 1.8 वरून 3.08 वर झेप घेतली आहे. मात्र इंग्लंडच्या तीन गुणांच्या तुलनेत स्कॉटलंडचे पाच गुण झाले आहेत. त्यामुळे, इंग्लंडला स्कॉटलंडशी बरोबरी साधण्यासाठी नामिबियाला पराभूत करावे लागेल आणि नंतर स्कॉटलंड ऑस्ट्रेलियाकडून पराभूत होईल अशी आशा बाळगावी लागेल. तशा परिस्थितीत इंग्लंड चांगल्या धावसरासरीसह सुपर एटमध्ये प्रवेश करेल, परंतु स्कॉटलंडने ऑस्ट्रेलियावर विजय मिळविला किंवा सामना पावसात वाहून गेला, तर बटलरच्या संघाची मोहीम संपुष्टात येईल.
सामन्याची वेळ : रात्री 10.30 वा. (भारतीय वेळेनुसार)
न्यूझीलंडची गाठ युगांडाशी
तौराबा येथे वेगवान गोलंदाजीस पोषक खेळपट्टीवर आज न्यूझीलंडचा संघ युगांडाविऊद्ध खेळणार आहे. अफगाणिस्तानच्या पापुआ न्यू गिनीविऊद्धच्या विजयानंतर किवी संघ ‘क’ गटातील सुपर एटच्या शर्यतीतून बाहेर फेकला गेला आहे. याचा अर्थ ते मागील एका दशकात प्रथमच एकदिवसीय आणि टी-20 वर्ल्ड कपमध्ये साखळी फेरी ओलांडण्यात अपयशी ठरले आहेत. आता नवोदित युगांडा आणि पापुआ न्यू गिनीवर विजय मिळवून मायदेशी परतण्याची आशा त्यांना असेल. त्यांच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केलेली असली, तरी वय वाढलेले फलंदाज पूर्णपणे सूर हरपल्याच्या स्थितीत दिसलेले आहेत.
सामन्याची वेळ : सकाळी 6 वा. (भारतीय वेळेनुसार)
दक्षिण आफ्रिकेचा नेपाळशी सामना
दक्षिण आफ्रिकेने सुपर एटमध्ये आधीच प्रवेश केल्यामुळे किंग्सटाउन येथे आज होणार असलेल्या त्यांच्या नेपाळविरुद्धच्या सामन्याला फारसे महत्त्व नाही. आठ बळी घेतलेला एन्रिक नॉर्टजे शानदार फॉर्ममध्ये आहे आणि तो नेपाळच्या फलंदाजांना खेळपट्टीवर टिकणे कठीण करण्याचा प्रयत्न करेल. क्विंटन डी कॉक, रीझा हेंड्रिक्स, कर्णधार एडन मार्करम आणि ट्रिस्टन स्टब्स हे सुपर एटच्या आधी सूर मिळविण्याची आशा संघ व्यवस्थापनाला असेल.
सामन्याची वेळ : पहाटे 5 वा. (भारतीय वेळेनुसार)