For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

इंग्लंडकडून ऑस्ट्रेलियाचा पराभव

06:56 AM Dec 08, 2025 IST | Tarun Bharat Portal
इंग्लंडकडून ऑस्ट्रेलियाचा पराभव
Advertisement

वृत्तसंस्था/ चेन्नई

Advertisement

आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या येथे सुरु असलेल्या कनिष्ठ पुरुषांच्या विश्वचषक हॉकी स्पर्धेत 9 व्या ते 12 व्या स्थानासाठी खेळविण्यात आलेल्या सामन्यात माजी विजेत्या ऑस्ट्रेलियन संघाला इंग्लंडने पराभूत केले. इंग्लंडने हा सामना 3-1 अशा फरकाने जिंकला. या स्पर्धेतील अन्य स्थानासाठी झालेल्या सामन्यामध्ये मलेशियाने स्विसचा तर बांगलादेशने कोरियाचा, ऑस्ट्रीयाने चीनचा तसेच कॅनडाने नामिबियाचा पराभव केला.

अलिकडेच मलेशियात झालेल्या सुल्तान जोहोर चषक हॉकी स्पर्धेत ऑस्ट्रेलियन हॉकी संघाची कामगिरी दर्जेदार झाली होती. त्यामुळे कनिष्ठ पुरुषांच्या येथे सुरु असलेल्या विश्वचषक हॉकी स्पर्धेत ऑस्ट्रेलियाकडून दर्जेदार कामगिरीची अपेक्षा बाळगली जात होती. पण त्यांनी या स्पर्धेत साफ निराशा केली. 1997 साली इंग्लंडमध्ये झालेल्या कनिष्ठ पुरुषांच्या विश्वचषक हॉकी स्पर्धेत विजेतेपद मिळविले होते.

Advertisement

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील झालेल्या या सामन्यात 8 व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर कॅडेन ड्रेसेने इंग्लंडचे खाते उघडले. 46 व्या मिनिटाला मिचेल रॉयडेनने तर 60 व्या मिनिटाला टेड ग्रेव्हिसने मैदानी गोल केले. ऑस्ट्रेलियातर्फे एकमेव गोल कॅडे लीने 43 व्या मिनिटाला नोंदविला.

13 ते 16 स्थानासाठी झालेल्या सामन्यामध्ये मलेशियाने स्विसचा 7-3 अशा गोलफरकाने पराभव केला. मलेशियातर्फे अकिल मॅटने 5 व्या आणि 43 व्या मिनिटाला असे दोन गोल नोंदविले. तर 6 व्या मिनिटाला हेदीने, 19 व्या मिनिटाला हॅरिस उस्मानने, 21 व्या मिनिटाला एम. राहुलने, 37 व्या मिनिटाला अजिमुद्दीन कमरुद्दीनने आणि 46 व्या मिनिटाला दानिश खेरीलने मलेशियातर्फे गोल केले. स्विसतर्फे मॅक्स फिशबॅचने 13 व्या मिनिटाला, लिनॉर्ग क्रेकस्नेरने 32 व्या मिनिटाला, यानिक हगने 53 व्या मिनिटाला गोल नोंदविले. दुसऱ्या एका सामन्यात जपानने चिलीचा 3-1 असा पराभव केला. 9 व्या ते 12 व्या स्थनासाठी खेळविण्यात आलेल्या प्ले ऑफ सामन्यात आयर्लंडने दक्षिण आफ्रिकेचा 4-2 असा पराभव केला. आता या स्पर्धेतील 9 व्या स्थानासाठी आयर्लंड आणि इंग्लंड यांच्यात सामना होईल.

मदुराईमध्ये या स्पर्धेतील 17 व्या ते 20 व्या स्थानासाठी खेळविण्यात आलेल्या सामन्यात बांगलादेशने कोरियाचा 5-3 असा पराभव केला. बांगलादेशतर्फे आघाडी फळीतील अमिरुल इस्लामने 21 व्या, 24 व्या आणि 35 व्या मिनिटाला असे 3 गोल करुन हॅट्ट्रीक साधली. इस्लामने 2 गोल पेनल्टी कॉर्नरवर तर एक गोल पेनल्टी स्ट्रोकवर केला. बांगलादेशतर्फे ओबीदुल जॉयने 52 व्या मिनिटाला तर रकिबुल हसनने 60 व्या मिनिटाला मैदानी गोल नोंदविला. कोरियातर्फे मिनयॉक लीने 10 व्या, 20 व्या आणि 53 व्या मिनिटाला असे 3 गोल नोंदवून हॅट्ट्रीक साधली. अन्य एका सामन्यात ऑस्ट्रीयाने चीनचा पेनल्टी शूटआऊटमध्ये 3-1 अशा गोलफरकाने पराभव केला. या सामन्यात निर्धारित वेळेत दोन्ही संघ 1-1 असे बरोबरीत होते. 21 ते 24 व्या स्थानासाठी खेळविण्यात आलेल्या सामन्यात इजिप्तने ओमानचा 8-2 तर कॅनडाने नामिबियाचा 3-1 असा पराभव केला.

Advertisement
Tags :

.