48 तासांत इंग्लंडला धक्का
स्लो ओव्हर रेटसाठी आयसीसीकडून कारवाई : 10 टक्के मॅच फीचा दंड आणि 2 गुण वजा
वृत्तसंस्था/ लंडन
इंग्लंडने लॉर्ड्स कसोटीत भारतावर 22 धावांनी विजय मिळवून 5 सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली. 14 जुलै रोजी कसोटीच्या पाचव्या दिवशी इंग्लंडने भारताला पराभवाचा धक्का दिला. मात्र या ऐतिहासिक विजयाला अवघे 48 तास उलटत नाहीत, तोच आयसीसीकडून इंग्लंडवर मोठी कारवाई झाली आहे. स्लो ओव्हर रेट म्हणजेच निर्धारित वेळेत पूर्ण षटके न टाकल्यामुळे इंग्लंडवर दंड ठोठावण्यात आला आहे. तसेच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप पॉइंट टेबलमधून इंग्लंडचे दोन गुण कापण्यात आले आहेत. यासोबत संघाला सामना शुल्काच्या 10 टक्के दंडही ठोठावण्यात आला आहे.
आयसीसीने इंग्लंडवर तिसऱ्या कसोटीत स्लो ओव्हर रेटसाठी त्यांच्या एकूण मॅच फीपैकी 10 टक्के दंड ठोठावला आहे. त्याचबरोबर, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेतून इंग्लंडचे दोन गुणही वजा करण्यात आले आहेत. या कारवाईनंतर इंग्लंडचे एकूण गुण 24 वरून 22 झाले असून, त्यांच्या पॉइंट्स परसेंटेजमध्येही घट झाली आहे, 66.67 वरुन थेट 61.11 टक्केवर आली आहे. आयसीसीच्या या कारवाईमुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपनच्या गुणतालिकेत इंग्लंडची दुसऱ्या स्थानावरुन तिसऱ्या स्थानी घसरण झाली आहे. याचाच त्यांना भविष्यात फटका बसण्याची शक्यता आहे.
प्रत्येक ओव्हरमागे 5 टक्के दंड
आयसीसी एलिट पॅनेल ऑफ मॅच रेफरीचे सदस्य रिची रिचर्डसन यांनी ही कारवाई केली. इंग्लंडने निर्धारित वेळेत दोन षटके कमी टाकल्याचे आढळून आले. आयसीसीच्या आचारसंहितेतील अनुच्छेद 2.22 नुसार, दर षटकामागे खेळाडूंच्या मॅच फीपैकी 5 टक्के दंड आकारला जातो. तसेच sंऊण् च्या नियमावलीतील अनुच्छेद 16.11.2 नुसार, प्रत्येक षटक कमी टाकल्यास संघाचे एक गुण कमी केला जातो.
बेन स्टोक्सकडून चूक कबूल
इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याने ही चूक मान्य केली असून, दंडाची कारवाई स्वीकारल्यामुळे अधिकृत सुनावणीची आवश्यकता भासली नाही. याआधीही इंग्लंडने मागील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (2021-23) फेरीत एकूण 26 गुण स्लो ओव्हर रेटमुळे गमावले होते. आता नव्या सत्रातही इंग्लंडने पुन्हा तीच चूक केल्यामुळे भविष्यात त्यांना मोठी किंमत चुकवावी लागू शकते. थोडक्यात इंग्लंडने सामन्यात जिंकून वर्चस्व प्रस्थापित केले असले तरी, आयसीसीच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे त्यांना विजयानंतर लगेचच मोठा झटका बसला आहे.