अॅशेस मालिकेसाठी इंग्लड संघ जाहीर
वृत्तसंस्था / ► लंडन
ऑस्ट्रेलियात होणाऱ्या अॅशेस मालिकेसाठी इंग्लंडने सोळा सदस्यीय संघ जाहीर केला असून या मालिकेच्या सुरुवातीपर्यंत कर्णधार बेन स्टोक्स पूर्ण तंदुरुस्त होण्याची अपेक्षा आहे. या मालिकेसाठी हॅरी ब्रुकला उपकर्णधार म्हणून निवडण्यात आले आहे.
खांद्याला दुखापत झाल्याने भारताविरुद्धच्या मालिकेतील शेवटच्या कसोटीत स्टोक्स खेळू शकला नव्हता. अॅशेस मालिकेतील पहिली कसोटी पर्थमध्ये 21 नोव्हेंबरपासून सुरू होणार असून त्यावेळी स्टोक्स उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे. अलीकडेच व्हाईटबॉल क्रिकेटसाठी नियुक्त करण्यात आलेला कर्णधार हॅरी ब्रुककडे अॅशेससाठी उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्याआधी ही जबाबदारी ऑली पोपकडे होती. वेगवान गोलंदाजांत मार्क वूड व मॅथ्यू पॉट्स यांना निवडण्यात आले आहे. वूड दुखापतीतून बरा झाला आहे तर गेल्या डिसेंबरनंतर पॉट्सला संधी देण्यात आली आहे. बोटाला झालेल्या दुखापतीतून शोएब बशिरही पूर्ण बरा झाला असून या संघातील तो एकमेव स्पेशालिस्ट स्पिनर आहे. विल जॅक्सलाही डिसेंबरनंतर पुनरागमनाची संधी देण्यात आली आहे.
अॅशेस मालिकेसाठी निवडण्यात आलेला इंग्लंड संघ : बेन स्टोक्स (कर्णधार), जोफ्रा आर्चर, गस अॅटकिन्सन, शोएब बशिर, जेकब बेथेल, हॅरी ब्रुक, ब्रायडन कार्से, झॅक क्रॉली, बेन डकेट, विल जॅक्स, ऑली पोप, मॅथ्यू पॉट्स, जो रूट, जेमी स्मिथ, जोश टंग, मार्क वूड.