इंग्लंडसमोर विजयासाठी 371 धावांचे टार्गेट
टीम इंडियाच्या दुसऱ्या डावात 364 धावा : केएल राहुल, पंतची शतके : चौथ्या दिवशी इंग्लंडच्या बिनबाद 21 धावा
वृत्तसंस्था/ लंडन
पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडसमोर 371 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. पहिल्या डावात 6 धावांची आघाडी मिळाल्याने टीम इंडियाने दुसऱ्या डावात 364 धावा केल्या, त्यामुळे इंग्लंडला आता पहिला कसोटी सामना जिंकण्यासाठी 371 धावा कराव्या लागतील. विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडने सावध सुरुवात करताना बिनबाद 21 धावा केल्या आहेत. आज शेवटच्या दिवशी इंग्लंडला विजयासाठी 350 धावा कराव्या लागतील.
लीड्समधील हेडिंग्ले क्रिकेट स्टेडियमवर भारताने आपला दुसरा डाव 2 बाद 90 या धावसंख्येवरून पुढे सुरु केला. पण, दिवसातील पहिल्याच षटकांत कर्णधार शुभमन गिलला कार्सेने बाद करत इंग्लंडला मोठे यश मिळवून दिले. पहिल्या डावात शतकी खेळी साकारणाऱ्या गिलला दुसऱ्या डावात 8 धावा करता आल्या. यानंतर मात्र केएल राहुल व ऋषभ पंतने संघाचा डाव सावरला.
पंत, केएलची दमदार शतके
भारतासाठी संकटमोचक ठरलेल्या केएल राहुल आणि ऋषभ पंतने चौथ्या गड्यासाठी 195 धावांची भागीदारी करत संघाला त्रिशतकी मजल मारुन दिली. या जोडीने इंग्लिश गोलंदाजांचा यशस्वी सामना करताना एकेरी-दुहेरी धावांवर भर दिला. यादरम्यान, राहुलने कसोटीतील 9 वे तर इंग्लंडमधील तिसरे शतक साजरे केले. चहापानावेळी त्याने 227 चेंडूचा सामना करताना 15 चौकारासह नाबाद 120 धावांची खेळी साकारली होती. केएलचे कसोटी क्रिकेटमध्ये 2023 नंतर पहिले शतक ठरले. याआधी दक्षिण आफ्रिकेतील सेंच्युरियनमध्ये त्याने शतक केले होते. दरम्यान, पंतने लागोपाठ दुसरे शतक झळकावताना 140 चेंडूत 15 चौकार व 3 षटकारासह 118 धावा केल्या. पंतने लीड्स कसोटीच्या पहिल्या डावात 134 धावांची झुंजार खेळी केली, तर दुसऱ्या डावातही त्याने जबरदस्त शतक ठोकले. इंग्लंडमधील हे त्याचे एकूण चौथे कसोटी शतक ठरले आहे. शतकानंतर पंत बशीरच्या गोलंदाजीवर बाद झाला.
चहापानानंतर केएलने अवघ्या 17 धावांची भर घातली अन् तो 137 धावांवर कार्सेच्या गोलंदाजीवर बाद झाला. यानंतर करुण नायरने 3 चौकारासह 20 तर जडेजाने नाबाद 25 धावांचे योगदान दिले. इतर भारतीय फलंदाज मात्र फ्लॉप ठरले. खेळाच्या शेवटच्या सत्रात टीम इंडियाचा दुसरा डाव 96 षटकांत 364 धावांत आटोपला. भारताचा डाव आटोपल्यानंत इंग्लंडला विजयासाठी 371 धावांचे टार्गेट मिळाले. इंग्लंडकडून कार्से व टंग यांनी प्र्रत्येकी तीन बळी घेतले.
इंग्लंडची सावध सुरुवात
टीम इंडियाने विजयासाठी दिलेल्या 371 धावांचा पाठलाग करताना इंग्लंडने चौथ्या दिवसअखेरस 6 षटकांत बिनबाद 21 धावा केल्या आहेत. जॅकी क्रॉली 12 डकेट 9 धावांवर खेळत होते. दरम्यान, खेळपट्टीचे स्वरुप पाहता आज शेवटच्या दिवशी सामन्यात कोण बाजी मारणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
संक्षिप्त धावफलक
भारत पहिला डाव 471. इंग्लंड पहिला डाव 465, भारत दुसरा डाव 96 षटकांत सर्वबाद 364 (यशस्वी जैस्वाल 4, केएल राहुल 137, साई सुदर्शन 30, शुभमन गिल 8, ऋषभ पंत 118, करुण नायर 20, जडेजा नाबाद 25, शार्दुल ठाकूर 4, कार्से व जोश टंग प्रत्येकी 3 बळी, बेन शोएब बशीर 2 बळी). इंग्लंड दुसरा डाव 6 षटकांत बिनबाद 21 (जॅक क्रॉली खेळत आहे 12, बेन डकेट खेळत आहे 9).
केएल राहुलची क्लास खेळी
इंग्लंडविरुद्ध पहिल्या कसोटीत केएलने कसोटी कारकिर्दीतील नववे शतक झळकावले. भारतीय संघ अडचणीत असताना राहुलने शानदार खेळी साकारली. या शतकी खेळीसह त्याने अनोखा विक्रमही केला आहे. इंग्लंडमध्ये सलामीवीर फलंदाज म्हणून 3 शतके झळकावणारा तो पहिलाच भारतीय सलामीवीर फलंदाज ठरला आहे. या रेकॉर्डमध्ये त्याने सुनील गावसकर, राहुल द्रविड, विजय मर्चंट आणि रवी शास्त्राr या दिग्गज खेळाडूंचा रेकॉर्ड मोडून काढला आहे. या दिग्गजांच्या नावे इंग्लंडमध्ये कसोटी क्रिकेटमध्ये सलामीवीर फलंदाज म्हणून 2 शतकं झळकावण्याची नोंद आहे.
पंतचा शतकी धमाका, लागोपाठ दुसऱ्या शतकासह अनोखा विक्रम
भारताच्या दुसऱ्या डावात केएल राहुलच्या पाठोपाठ पंतनेही शतक ठोकले आहे. त्याचे हे या सामन्यातील दुसरे शतक आहे. पंतचे हे कसोटी क्रिकेटमधील 8 वे शतक आहे. विशेष म्हणजे त्याने यापैकी 6 शतके भारताबाहेर झळकावली आहेत. तो 8 शतके करणारा भारताचा पहिलाच यष्टीरक्षक फलंदाज आहे. त्याच्यापाठोपाठ 6 शतकांसह एमएस धोनी आहे. याशिवाय, पंत एकाच कसोटी सामन्यात दोन्ही डावात शतक करणारा भारताचा पहिला, तर जगातील दुसराच यष्टीरक्षक फलंदाज ठरला आहे. याआधी असा कारनामा केवळ झिम्बाब्वेच्या अँडी फ्लॉवर यांनी केला होता. तसेच विशेष म्हणजे, कसोटी सामन्याच्या दोन्ही डावात शतक झळकावणारा पंत सातवा भारतीय फलंदाज बनला आहे. याआधी सुनील गावसकर (3 वेळा), राहुल द्रविड (2 वेळा), विजय हजारे, विराट कोहली, अजिंक्य रहाणे आणि रोहित शर्मा यांनीही हे यश मिळवलं आहे.