महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

दीप्तीच्या भेदक माऱ्यासमोर इंग्लंडचे सपशेल लोटांगण

06:58 AM Dec 16, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

भारत वि इंग्लंड महिला कसोटी, दुसरा दिवस : इंग्लंडचा 136 धावांत धुव्वा : दीप्तीचे अवघ्या 7 धावांत 5 बळी

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी मुंबई

Advertisement

येथील डी. वाय. पाटील स्टेडियमवर सुरु असलेल्या एकमेव कसोटीवर भारतीय महिला संघाने मजबूत पकड मिळविली आहे. शुक्रवारी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारताचा पहिला डाव 428 धावांवर संपुष्टात आला. इंग्लंडसारख्या तगड्या संघाला पहिल्या डावात 136 धावात गुंडाळत भारताने पहिल्या डावात 292 धावांची भक्कम आघाडी घेतली. तरीही इंग्लंडला फॉलोऑन दिला नाही. भारताकडून दीप्ती शर्माने 5.3 षटकांत 7 धावा देत पाच बळी घेण्याची किमया केली. यानंतर दुसऱ्या डावात खेळताना टीम इंडियाने दिवसअखेरीस 42 षटकांत 6 गडी गमावत 186 धावा केल्या आहेत. भारताकडे आता 478 धावांची आघाडी असून कर्णधार हरमनप्रीत कौर 44 तर पूजा वस्त्रकार 17 धावांवर खेळत होत्या. दुसरा दिवस गोलंदाजांनी गाजविला, त्यातही स्पिनर्सनी वर्चस्व गाजविले. 19 पैकी 10 फलंदाज स्पिनर्सनी मिळविले.

प्रारंभी, भारताने 7 बाद 410 धावसंख्येवरुन दुसऱ्या दिवशीच्या खेळाला सुरुवात केली. पण अवघ्या 18 धावांची भर घातल्यानंतर टीम इंडियाचा पहिला डाव 428 धावांवर संपुष्टात आला. दीप्ती शर्मा (67) आणि जेमिमा रॉड्रिग्जसह चार खेळाडूंनी अर्धशतके झळकावली. हरमनप्रीत कौरचे अर्धशतक हुकले. ती 49 धावांवर बाद झाली. इंग्लंडकडून लॉरेन बेल आणि सोफी एक्लेस्टोनने प्रत्येकी 3 बळी घेतले.

इंग्लिश महिला संघ 136 धावांवर ऑलआऊट

इंग्लंडच्या पहिल्या डावाची सुरुवात चांगली झाली नाही. सोफिया डंकले आणि कर्णधार हीदर नाईट दोघीही प्रत्येकी 11 धावा करून बाद झाल्या. डंकलेला रेणुकाने त्रिफळाचीत केले. तसेच, हीदर पूजा वस्त्रकारच्या चेंडूवर पायचीत झाली. त्यानंतर टॅमी ब्यूमाँट आणि नॅट सायव्हर-ब्रंट यांनी तिसऱ्या विकेटसाठी 51 धावांची भागीदारी रचली. ही जोडी जमलेली असताना ब्यूमाँट 10 धावा करून बाद झाली. पुढे दीप्ती शर्माने डॅनियल वॅटला 19 धावांवर झेलबाद केले. तसेच, दीप्तीने इंग्लंडच्या डावातील 30 व्या षटकात 2 विकेट्स घेतल्या. तिने चौथ्या चेंडूवर एमी जोन्सला शेफाली वर्माच्या हातून झेलबाद केले. जोन्स 12 धावाच करू शकली. त्यानंतर अखेरच्या चेंडूवर सोफी एक्लेस्टोनच्या यष्ट्या उडवल्या. तिला खातेही खोलता आले नाही. नॅट सायव्हरने चांगली फलंदाजी करत अर्धशतक झळकावले. तिने 70 चेंडूंचा सामना करत 10 चौकारासह 59 धावा केल्या. यानंतर तळाच्या फलंदाजांनी केवळ हजेरी लावल्याने इंग्लिश महिला संघाचा पहिला डाव 35.3 षटकांत 136 धावांवर आटोपला भारताकडून दीप्ती शर्माने 5, स्नेह राणाने 2 बळी मिळवले. इंग्लंडची स्थिती 3 बाद 108 अशी असताना दीप्तीच्या भेदक ऑफस्पिन माऱ्यापुढे त्यांचा डाव कोसळला आणि केवळ 10 धावांत त्यांनी 6 गडी गमविले.

टीम इंडियाची कसोटीवर मजबूत पकड

भारताने पहिल्या डावात 292 धावांची दमदार आघाडी घेतल्यानंतर आपला दुसरा डाव सुरु केला. बिनबाद 61 धावा केल्यानंतर भारताला तीन धक्के बसले. स्मृती मानधना 26, शेफाली वर्मा 33 आणि यास्तिका भाटिया 9 धावा करून बाद झाल्या. यानंतर जेमिमा रॉड्रिग्ज 5 चौकारासह 27 तर दीप्ती शर्माने 3 चौकारासह 20 धावा केल्या. स्नेह राणाला मात्र भोपळाही फोडता आला नाही. दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा टीम इंडियाने 6 गडी गमावत 186 धावा केल्या होत्या. कर्णधार हरमनप्रीत 44 व पूजा वस्त्रकार 17 धावांवर खेळत होत्या. भारताकडे आता 478 धावांची आघाडी आहे. इंग्लंडकडून चार्ली डीनने सर्वाधिक चार बळी घेतले.

संक्षिप्त धावफलक : भारत प.डाव 428 व दुसरा डाव 42 षटकांत 6 बाद 186 (शेफाली वर्मा 33, स्मृती मानधना 26, जेमिमा रॉड्रिग्ज 27, हरमनप्रीत खेळत आहे 44, पूजा वस्त्राकार खेळत आहे 17, चार्ली डीन 68 धावांत 4 बळी). इंग्लंड प.डाव 35.3 षटकांत सर्वबाद 136 (नॅट सायव्हर 59, डॅनी वेट 19, सोफी डंकले 11, दीप्ती शर्मा 5 तर स्नेह राणा 2 बळी).

दीप्ती शर्माची कमाल, 38 वर्षापूर्वीच्या विक्रमाशी केली बरोबरी

भारताची स्टार गोलंदाज दीप्ती शर्माच्या भेदक गोलंदजीसमोर इंग्लंडच्या महिलांची पळताभुई थोडी झाली. दीप्तीने अवघे 5.3 षटके गोलंदाजी करताना 7 धावा देत 5 विकेट्स घेतल्या. तिने डॅनिएल वॅट, एमी जोन्स, सोफी इक्लेस्टोन, केट क्रॉस आणि लॉरेन फिलर यांना बाद केले. या कामगिरीसह तिने अनोख्या विक्रमाला गवसणी घातली. महिलांच्या कसोटीमध्ये 50 पेक्षा जास्त धावांची खेळी आणि एका डावात 5 किंवा त्यापेक्षा जास्त विकेट्स घेणारी दीप्ती दुसरीच भारतीय गोलंदाज ठरली आहे. यापूर्वी शुभांगी कुलकर्णी यांनी 1985 साली न्यूझीलंड महिला संघाविरुद्ध अहमदाबादला झालेल्या कसोटी सामन्यात 79 धावांची खेळी केली होती आणि 6 विकेट्सही घेतल्या होत्या. तब्बल 38 वर्षानंतर दीप्ती शर्माने या विक्रमाशी बरोबरी साधली आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article