विंडीजच्या विजयाने इंग्लंड स्पर्धेबाहेर
कियाना जोसेफ सामनावीर, द.आफ्रिका, विंडीज, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया उपांत्य फेरीत
वृत्तसंस्था / दुबई
2024 च्या आयसीसी महिलांच्या विश्वचषक टी-20 क्रिकेट स्पर्धेत मंगळवारी येथे खेळविण्यात आलेल्या सामन्यात विंडीजने इंग्लंडचा 12 चेंडू बाकी ठेवून 6 गड्यांनी दणदणीत पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. या एकमेव पराभवामुळे इंग्लंडचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.
इंग्लंड, विंडीज व द.आफ्रिका यांचे प्रत्येकी 6 गुण झाले. पण नेट रनरेटमध्ये विंडीज व द.आफ्रिका यांनी इंग्लंडला मागे टाकले. आता ऑस्ट्रेलिया, द. आफ्रिका, विंडीज आणि न्यूझीलंड या चार संघांनी उपांत्य फेरी गाठली आहे. मंगळवारच्या सामन्यात 38 चेंडूत 2 षटकार आणि 6 चौकारांसह 52 धावा झळकविणाऱ्या विंडीजच्या कियाना जोसेफला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. मंगळवारच्या सामन्यात विंडीजने नाणेफेक जिंकून इंग्लंडला प्रथम फलंदाजी दिली. इंग्लंडने 20 षटकात 7 बाद 141 धावा जमविल्या. त्यानंतर विंडीजने 18 षटकात 4 बाद 144 धावा जमवित विजय नोंदविला.
इंग्लंडच्या डावामध्ये नॅट सिव्हर ब्रंटने शेवटपर्यंत खेळपट्टीवर राहून 50 चेंडूत 5 चौकारांसह नाबाद 57 धावा झळकविल्या. पण तिचे हे अर्धशतक वाया गेले. कर्णधार नाईटने 13 चेंडूत 3 चौकारांसह 21 धावा जमविल्या. दुखापतीमुळे ती निवृत्त झाली. डॅनी वॅट हॉजने 12 चेंडूत 1 चौकारासह 16 तर बाऊचरने 19 चेंडूत 1 चौकारासह 14 धावा जमविल्या. विंडीजतर्फे फ्लेचरने 21 धावांत 3 तर हेली मॅथ्युजने 35 धावांत 2 तसेच डॉटीनने 16 धावांत 1 गडी बाद केला. इंग्लंडच्या डावात 1 षटकार आणि 12 चौकार नोंदविले गेले. पॉवरप्लेच्या 6 षटकात इंग्लंडने 33 धावा जमविताना 2 गडी गमविले. इंग्लंडचे अर्धशतक 49 चेंडूत तर शतक 93 चेंडूत फलकावर लागले. नॅट सिव्हर ब्रंटने आपले अर्धशतक 45 चेंडूत 4 चौकारांच्या मदतीने पूर्ण केले.
प्रत्युत्तरादाखल खेळताना कर्णधार हेली मॅथ्युज आणि कियाना जोसेफ यांनी विंडीजच्या डावाला दमदार सुरुवात करुन देताना 74 चेंडूत 102 धावांची शतकी भागिदारी केली. नॅट सिव्हर ब्रंटने जोसेफला झेलबाद केले. त्यानंतर कर्णधार मॅथ्युज पाठोपाठ बाद झाली. ग्लेनने तिला झेलबाद केले. मॅथ्युजने 38 चेंडूत 1 षटकार आणि 7 चौकारासह 50 धावा जमविल्या. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीस आलेली कॅम्पबेल 5 धावावर धावचित झाली. डॉटीनने 19 चेंडूत 2 षटकार आणि 2 चौकारांसह 27 धावा जमविल्या. इक्लेस्टोनने तिचा त्रिफळा उडविला. हेन्री आणि अॅलेनी यांनी विजयाचे सोपस्कार पूर्ण केले. अॅलेनीने विजयी चौकार ठोकला. विंडीजच्या डावात 5 षटकार आणि 17 चौकार नोंदविले गेले. इंग्लंडतर्फे नॅट सिव्हर ब्रंट, इक्लेस्टोन आणि ग्लेन यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. विंडीजने पॉवरप्लेच्या 6 षटकात 67 धावा जमविल्या. विंडीजचे अर्धशतक 27 चेंडूत तर शतक 68 चेंडूत फलकावर लागले. मॅथ्युजने 37 चेंडूत 1 षटकार आणि 7 चौकारांसह तर जोसेफने 34 चेंडूत 2 षटकार आणि 6 चौकारांसह अर्धशतक झळकविले.
संक्षिप्त धावफलक: इंग्लंड 20 षटकात 7 बाद 141 (नॅट सिव्हर ब्रंट नाबाद 57, नाईट 21, बाऊचर 14, वॅट हॉज 16, अवांतर 5, मॅथ्युज 2-35, फ्लेचर 3-21, डॉटिन 1-16), विंडीज 18 षटकात 4 बाद 144 (मॅथ्युज 50, जोसेफ 52, डॉटीन 27, अॅलेनी नाबाद 8, अवांतर 2, नॅट सिव्हर ब्रंट, इक्लेस्टोन आणि ग्लेन प्रत्येकी 1 बळी)