इंग्लंड, नेदरलँड्सची नजर आज चॅम्पियन्स ट्रॉफीतील स्थानावर
वृत्तसंस्था/ पुणे
इंग्लंड आपले जेतेपद राखण्याचे उद्ध्वस्त झालेले स्वप्न बाजूला सारून आज बुधवारी येथे विश्वचषक स्पर्धेत नेदरलँड्सचा सामना करेल तेव्हा आपली पत काही प्रमाणात सावरण्याचा आणि 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये स्थान मिळविण्याचा त्यांचा प्रयत्न राहील. इंग्लंडने खेदजनक कामगिरी केलेली असून विश्वचषकातील सात सामन्यांमधून फक्त एक विजय त्यांना मिळविता आलेला आहे. 10 संघांच्या गुणतालिकेत ते तळाशी घसरले आहेत. नेदरलँड्स दोन विजय आणि चार गुणांसह नवव्या स्थानावर आहे.
दोन्ही संघ उपांत्य फेरीसाठीच्या शर्यतीतून बाहेर फेकले गेले आहेत. शनिवारी कट्टर प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलियाकडून 33 धावांनी झालेला पराभव हा इंग्लंडचे आव्हान संपले असल्यावर शिक्कामोर्तब करून गेला आहे. डच संघ देखील अधिकृतपणे शर्यतीतून बाहेर पडलेला आहे. पण ‘आयसीसीने अव्वल सात संघ आणि यजमान पाकिस्तान 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पात्र ठरेल असे जाहीर केल्याने काही स्थानांसाठी संघर्ष सुरू झाला आहे. चार वर्षांपूर्वी विजेते झालेल्या इंग्लंडची या स्पर्धेत न भूतो अशी खराब कामगिरी झालेली आहे. विश्वचषकाच्या इतिहासात सहभागी झालेल्या इंग्लंडच्या कोणत्याही संघाने इतके सामने गमावलेले नाहीत. या परिस्थितीत नेदरलँड्सविरुद्धचा सामना गमावणे इंग्लंडला परवडणारे नाही. चॅम्पियन्स ट्रॉफीतील स्थान गमावण्याची नामुष्की टाळण्यासाठी इंग्लंडने नेदरलँड्स व पाकिस्तान यांच्याविरुद्धचे उर्वरित दोन सामने जिंकणे आवश्यक आहे.
परंतु आत्मविश्वास आणि फॉर्म या दोन्ही गोष्टी इंग्लंडच्या संघाला सोडून गेलेल्या आहेत. त्यांचा फलंदाजी विभाग पूर्ण अपयशी ठरलेला आहे. सलामीवीर जॉनी बेअरस्टो आणि डेव्हिड मलान त्यांना अपेक्षित सुऊवात करून देऊ शकलेले नाहीत, तर ज्यो रूट सातत्य दाखवू शकलेला नाही. कर्णधार जॉस बटलर आणि लियाम लिंगस्टोन हे देखील फॉर्मात नाहीत. इंग्लंडच्या गोलंदाजीने तुलनेने चांगली कामगिरी केलेली असली, तरी त्यात विविधता नाही. इंग्लिश गोलंदाजी सातत्य दाखवू शकलेली नसून भारतीय परिस्थितीत त्यांना संघर्ष करावा लागला आहे. बेन स्टोक्स हा फक्त फलंदाज म्हणून खेळत असून तो गोलंदाजी करू शकत नसल्याने त्यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत.
स्टोक्सच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया होणार आहे आणि डेव्हिड विलीने या स्पर्धेनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घोष्घ्ति केली आहे. त्यामुळे हॅरी ब्रूक व सॅम करन या युवा खेळाडूंना अधिक खेळू द्यावे, असे मत व्यक्त होत आहे. डच संघ इंग्लंडच्या कमजोरीचा फायदा उठविण्यास उत्सुक असेल. नेदरलँड्ससाठी चॅम्पियन्स ट्रॉफीतील स्थानावर दावा करण्याच्या दृष्टीने ही सुवर्णसंधी आहे. ’ऑरेंज आर्मी’ने या विश्वचषकात दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश यांच्यावर विजय मिळविलेला आहे. अष्टपैलू खेळाडूंनी भरलेल्या नेदरलँड्सने दाखवून दिले आहे की, ते जिंकण्याची ताकद बाळगतात. मात्र त्यांची फलंदाजीतील वरची फळी आणि गोलंदाजी विभाग अधिक सातत्यपूर्ण असणे आवश्यक आहे.
संघ-इंग्लंड : जोस बटलर (कर्णधार), मोईन अली, गस अॅटकिन्सन, जॉनी बेअरस्टो, सॅम करन, लियाम लिव्हिंगस्टोन, डेविड मलान, आदिल रशिद, ज्यो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स, ब्रायडन कारसे, डेव्हिड विली, मार्क वूड, ख्रिस व्होक्स.
नेदरलँड्स : स्कॉट एडवर्ड्स (कर्णधार), कॉलिन अकरमन, वेस्ली बॅरेसी, बास डी लीडे, आर्यन दत्त, सायब्रँड एंजेलब्रेक्ट, रायन क्लेन, तेजा निदामनुऊ, मॅक्स ओ’डॉड, साकिब झुल्फिकार, शरिझ अहमद, लोगन व्हॅन बीक, रोलोफ व्हॅन डर मर्वे, पॉल व्हॅन मीकरेन आणि विक्रमजित सिंग.
सामन्याची वेळ : दुपारी 2 वा.