इंग्लंडला विजयासाठी 205 धावांची गरज
कमिंदु मेंडीसचे शतक, वोक्स, पॉटस्, अॅटकिनसन प्रभावी
वृत्तसंस्था /मॅचेंस्टर
येथे सुरू असलेल्या पहिल्या क्रिकेट कसोटीत शनिवारी खेळाच्या चौथ्या दिवशी लंकेने यजमान इंग्लंडला निर्णायक विजयासाठी 205 धावांचे आव्हान दिले.
या सामन्यात लंकेचा पहिला डाव 236 धावांवर आटोपल्यानंतर इंग्लंडने पहिल्या डावात 358 धावा जमवित लंकेवर 122 धावांची आघाडी मिळविली. त्यानंतर लंकेने दुसऱ्या डावात दमदार फलंदाजी केली. 6 बाद 204 या धावसंख्येवरुन लंकेने चौथ्या दिवशीच्या खेळाला पुढे प्रारंभ केला आणि त्यांचा दुसरा डाव 89.3 षटकात 326 धावांत आटोपला. लंकेच्या उर्वरित चार फलंदाजांनी 122 धावांची भर घातली. कमिंदु मेंडीसच्या समयोचित शतकामुळे लंकेला 326 धावांपर्यंत मजल मारता आली. कमिंदु मेंडीसने 183 चेंडूत 1 षटकार आणि 15 चौकारांसह 113 धावा जमविल्या. अँजेलो मॅथ्युजने 1 षटकार आणि 2 चौकारांसह 65, चंडीमलने 7 चौकारांसह 79, करुणारत्नेने 4 चौकारांसह 27, धनंजय डिसिल्वाने 11 तर रत्ननायकेने 10 धावा जमविल्या. शनिवारी उपाहारापूर्वी किरकोळ पावसाच्या सरी आल्याने खेळ थांबविण्यात आला होता. इंग्लंडने दुसरा नवा चेंडू घेतला. कमिंदु मेंडीसने आपले शतक 167 चेंडूत 1 षटकार आणि 12 चौकारांच्या मदतीने झळकविले. तसेच त्याने चंडीमल समवेत शतकी भागिदारी 149 चेंडूत नोंदविली. उपाहारावेळी लंकेची स्थिती 82 षटकात 6 बाद 291 अशी होती. खेळाच्या दुसऱ्या सत्राला प्रारंभ झाल्यानंतर लंकेचे त्रिशतक फलकावर लागले. कमिंदु मेंडीस सातव्या गड्याच्या रुपात बाद झाल्यानंतर लंकेचे शेवटचे तीन गडी केवळ 19 धावांत बाद झाले. इंग्लंडतर्फे वोक्स आणि पॉटस् यांनी प्रत्येकी 3 तर अॅटकिनसनने 2, वूड आणि रुट यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
इंग्लंड 3 बाद 82
येथे सुरु असलेल्या पहिल्या क्रिकेट कसोटीतील शनिवारी खेळाच्या चौथ्या दिवशी चहापानापर्यंत इंग्लंडने दुसऱ्या डावात 22 षटकात 3 बाद 82 धावा जमविल्या. लंकेने इंग्लंडला विजयासाठी 205 धावांचे आव्हान दिले आहे.
इंग्लंडच्या दुसऱ्या डावात डकेटने 1 चौकारासह 14, लॉरेन्सने 1 षटकार आणि 2 चौकारांसह 34, पॉपने 6 धावा जमविल्या. रुट 13 तर ब्रुक 6 धावांवर चहापानावेळी खेळत होते. लंकेतर्फे आसिता फर्नांडो, प्रभात जयसूर्या आणि रत्न नायके यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. इंग्लंडला आता निर्णायक विजयासाठी 123 धावांची गरज असून त्यांचे 7 गडी खेळावयाचे आहेत.
संक्षिप्त धावफलक: लंका प. डाव 236, इंग्लंड प. डाव 358, लंका दु. डाव 89.3 षटकात सर्वबाद 326 (कमिंदु मेंडीस 113, चंडीमल 79, मॅथ्युज 65, करुणारत्ने 27, डिसिल्वा 11, रत्ननायके 10, अवांतर 16, पॉटस् 3-47, वोक्स 3-58, अॅटकिनसन 2-89, वूड 1-36, रुट 1-5)