इंग्लंडला लंकेवर 97 धावांची आघाडी
वृत्तसंस्था/ ओव्हल (लंडन)
येथे सुरु असलेल्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटच्या सामन्यात रविवारी खेळाच्या तिसऱ्या दिवशी इंग्लंडने शेवटची बातमी हाती आली त्यावेळी 2 बाद 35 धावा जमवित लंकेवर 97 धावांची आघाडी मिळवली.
यजमान इंग्लंडने या मालिकेत पहिले सलग दोन सामने जिंकून विजयी आघाडी मिळवली आहे. या शेवटच्या सामन्यात इंग्लंडचा पहिला डाव 325 धावांवर आटोपला. कर्णधार पोपने दीडशतकी खेळी (154) तर डकेटने अर्धशतक (86) झळकाविले. त्यानंतर लंकेने 5 बाद 211 या धावसंख्येवरुन तिसऱ्या दिवशीच्या खेळाला पुढे प्रारंभ केला. लंकेचे शेवटचे 5 फलंदाज 42 धावांची भर घालत तंबूत परतले. लंकेचा पहिला डाव 61.2 षटकात 263 धावांवर आटोपला. इंग्लंडला 62 धावांची आघाडी मिळाली. लंकेच्या पहिल्या डावात कर्णधार धनंजय डिसिल्व्हाने 11 चौकारांसह 69 तर कमिंदू मेंडीसने 7 चौकारांसह 64 धावा जमविल्या. या जोडीने सहाव्या गड्यासाठी 107 धावांची शतकी भागिदारी केली. इंग्लंडतर्फे स्टोन आणि हुल यांनी प्रत्येकी 3, वोक्सने 2, बशीरने 1 गडी बाद केला. 62 धावांची आघाडी घेतल्यानंतर इंग्लंडने उपाहारापर्यंत 8 षटकात दुसऱ्या डावात 2 बाद 35 धावा जमविल्या. डकेट 7 तर कर्णधार पोप 7 धावांवर बाद झाले. लॉरेन्स 2 चौकारांसह 20 धावांवर खेळत आहे. लंकेतर्फे असिता फर्नांडो आणि कुमारा यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक - इंग्लंड प. डाव 69.1 षटकात सर्व बाद 325 (पॉप 154, डकेट 86, विश्वा फर्नांडो, कुमारा, धनंजय डिसिल्व्हा प्रत्येकी 2 बळी, रत्ननायके 3-56, असिथा फर्नांडो 1-88), लंका प. डाव 61.2 षटकात सर्व बाद 263 (डिसिल्व्हा 69, कमिंदू मेंडीस 64, निशांका 64, हुल, स्टोन प्रत्येकी 3 बळी, वोक्स 2 बळी, बशीर 1-37), इंग्लंड दु. डाव 8 षटकात 2 बाद 35 (लॉरेन्स खेळत आहे 20, डकेट 7, पोप 7, असिता फर्नांडो व कुमारा प्रत्येकी 1 बळी).
धावफलक उपाहारापर्यंत.