194 धावांच्या आघाडीसह इंग्लंड सुस्थितीत
दुसरी कसोटी, ब्रुकचे दमदार शतक, न्यूझीलंड प. डाव 5 बाद 86
वृत्तसंस्था / वेलिंग्टन
शुक्रवारपासून येथे सुरू झालेल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटीत खेळाच्या पहिल्या दिवसाअखेर इंग्लंडने 194 धावांच्या आघाडीसह आपली स्थिती मजबूत करण्यास प्रारंभ केला आहे. मात्र यजमान न्यूझीलंडचा पहिला डाव गडगडला. दिवसअखेर त्यांनी पहिल्या डावात 5 बाद 86 धावा जमविल्या होत्या. तत्पूर्वी इंग्लंडचा पहिला डाव 280 धावांत आटोपला. इंग्लंडच्या हॅरी ब्रुकने दमदार शतक झळकविले.
या दुसऱ्या कसोटीत न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून इंग्लंडला प्रथम फलंदाजी दिली. वेलिंग्टनच्या वेगवान खेळपट्टीचा न्यूझीलंडच्या फलंदाजांनी सुरुवातीला चांगलाच फायदा उठविला. इंग्लंडचे पहिले चार फलंदाज केवळ 43 धावांत तंबूत परतले. त्यानंतर ब्रुक आणि पॉप या जोडीने इंग्लंडला सावरताना पाचव्या गड्यासाठी 174 धावांची दीड शतकी भागिदारी केली. चहापानानंतर सुमारे 45 मिनिटांत इंग्लंडचा पहिला डाव 54.4 षटकात 280 धावांत आटोपला.
इंग्लंडच्या डावाला प्रारंभ झाल्यानंतर न्यूझीलंडच्या हेंन्रीने डकेटला खाते उघडण्यापूर्वीच झेलबाद केले. त्यानंतर त्याने क्रॉलेचा त्रिफळा उडविला. क्रॉलेने 1 षटकार आणि 1 चौकारासह 17 धावा जमविल्या. नाथन स्मिथने इंग्लंडचे दोन गडी बाद केले. त्याने रुटला 3 धावांवर तर त्यानंतर बेथेलला 16 धावांवर बाद केले. इंग्लंडची यावेळी स्थिती 4 बाद 43 अशी होती. ब्रुकने 47 चेंडूत 2 षटकार आणि 5 चौकारांसह अर्धशतक नोंदविले.
ब्रुक आणि पॉप या जोडीने इंग्लंडचा डाव सावरला. ब्रुकने 115 चेंडूत 5 षटकार आणि 11 चौकारांसह 123 धावा झळकविल्या तर पॉपने 78 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारांसह 66 धावा जमविल्या. चहापानावेळी इंग्लंडची स्थिती 7 बाद 259 अशी होती. ओरुरकेने पॉपला झेलबाद केले. ओरुरकेने इंग्लंडला आणखी दोन धक्के दिले. कर्णधार स्टोक्स 2 धावांवर बाद झाला. एकेरी धाव घेण्याच्या नादात ब्रुक स्मिथच्या अचूक फेकीवर धावचित झाला. ओरुरकेने ओक्सला बाद केले. त्याने 3 चौकारांसह 18 धावा जमविल्या. अॅटकिनसन आणि कार्से हे अनुक्रमे 4 आणि 9 धावांवर बाद झाले. 54.4 षटकात इंग्लंडचा पहिला डाव खेळाच्या शेवटच्या सत्रात 280 धावांवर आटोपला. न्यूझीलंडतर्फे नाथन स्मिथने 86 धावांत 4 तर ओरुरकेने 49 धावांत 3 आणि हेंन्रीने 43 धावांत 2 गडी बाद केले.
न्यूझीलंडची घसरगुंडी
इंग्लंडच्या भेदक आणि शिस्तबद्ध माऱ्यासमोर न्यूझीलंडची फलंदाजी कोलमडली. शेवटच्या सत्राअखेर न्यूझीलंडने 26 षटकात 5 बाद 86 धावा जमविल्या. इंग्लंडच्या कार्से, वोक्स, अॅटकिनसन आणि स्टोक्स यांनी प्रभावी गोलंदाजी केली. कर्णधार लॅथमने 1 चौकारांसह 17, कॉन्वेने 2 चौकारांसह 11, केन विलियमसनने 56 चेंडूत 3 चौकारांसह 37, रचिन रविंद्रने 3, मिचेलने 6 धावा केल्या. ओरुरके आणि ब्लंडेल हे अनुक्रमे 0 आणि 7 धावांवर खेळत होते. कार्सेने 2 तर वोक्स, स्टोक्स आणि अॅटकिनसन यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत इंग्लंडने पहिली कसोटी जिंकून यापूर्वीच आघाडी घेतली आहे.
संक्षिप्त धावफलक: इंग्लंड प. डाव 54.4 षटकात सर्वबाद 280 (ब्रुक 123, पॉप 66, वोक्स 18, क्रॉले 17, बेथेल 16 अवांतर 22, स्मिथ 4-86, ओरुरके 3-49, हेन्री 2-43), न्यूझीलंड प. डाव 26 षटकात 5 बाद 86 (विलियमसन 37, कॉन्वे 11, लॅथम 17, मिचेल 6, रचिन रविंद्र 3, अवांतर 5, कार्से 2-28, वोक्स, स्टोक्स आणि अॅटकिनसन प्रत्येकी 1 बळी)