बांगलादेशपुढे आज भारी आव्हान इंग्लंडचे
वृत्तसंस्था/ गुवाहाटी
अनुभवी खेळाडूंचा भरणा असलेला चार वेळचा विजेता इंग्लंड आज मंगळवारी येथे होणाऱ्या आयसीसी महिला एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषकातील साखळी सामन्यात बांगलादेशचा सामना करणार असून यावेळी इंग्लंडचे पारडे प्रचंड भारी राहील. दोन्ही संघांनी आपापल्या स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात खात्रीशीर विजय मिळवलेले आहेत. बांगलादेशने पाकिस्तानला सात गड्यांनी हरवलेले आहे आणि इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेला 69 धावांत गुंडाळल्यानंतर 10 गड्यांनी पराभूत केलेले आहे.
तथापि, जर गुणवत्ता आणि उपलब्ध पर्यायांवर भर दिला, तर इंग्लंड त्यांच्या आशियाई प्रतिस्पर्ध्यांपेक्षा खूप पुढे आहे. टॅमी ब्युमोंट, एमी जोन्स, हीदर नाइट, नॅट सायव्हर-ब्रंट, सोफी एक्लेस्टोन, लॉरेन बेल आणि सोफिया डंकली यासारख्या दर्जाच्या खेळाडू असल्याने इंग्लंडचे आव्हान पेलणे बांगलादेशला खूप जड जाणार आहे. दुसरीकडे, कर्णधार आणि यष्टीरक्षण करणारी निगार सुलताना, ऊबिया हैदर, निशिता अक्तर निशी आणि सुमैया अक्तर यासारख्या खेळाडूंवर बांगलादेशच्या आशा टिकलेल्या आहेत. परंतु एक संघ म्हणून तो इंग्लंडइतका अनुभवी किंवा बळकट नाही. इंग्लंड 2017 मध्ये शेवटच्या खेपेला स्पर्धा जिंकल्यानंतर आता पाचवे जेतेपद मिळविण्यास उत्सुक आहे.
चार दिवसांपूर्वी याच ठिकाणी दक्षिण आफ्रिकेला हरविलेले असल्याने आणि स्पर्धेच्या सुऊवातीच्या सामन्यापूर्वी येथे काही काळ सराव केलेला असल्याने इंग्लंडला येथील परिस्थितीची ओळख झाली आहे. इंग्लंड-दक्षिण आफ्रिका सामन्यात इंग्लिश गोलंदाजांनी केलेल्या शानदार प्रदर्शनामुळे 150 पेक्षा कमी धावा निघाल्या असल्या, तरी बरसापारा क्रिकेट स्टेडियमवरील खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल मानली जाते आणि अनेकदा त्यावर भरपूर धावसंख्येचे सामने पाहायला मिळालेले आहेत. चेंडू सामान्यत: येथे समान प्रमाणात उसळतो आणि बॅटवर चांगला येतो. यामुळे फलंदाजांना विशेषत: पॉवर प्लेदरम्यान त्यांचे फटके खेळण्यास आत्मविश्वास मिळतो.
सामना जसजसा पुढे सरकतो तसतशी खेळपट्टी मंदावते असे दिसून येत आहे, ज्यामुळे फिरकी गोलंदाज आणि संथ गोलंदाजांना महत्त्व येऊ लागते. जर गोलंदाजांनी शिस्तबद्ध दिशा व टप्प्याचा वापर केला आणि विविधता वापरली, तर त्यांना येथे यश मिळण्याची शक्यता आहे. इंग्लंड आणि बांगलादेश या दोघांकडेही खेळपट्टीचा वापर करण्याच्या दृष्टीने पुरेशी शक्ती आहे. मात्र इंग्लंडमध्ये अर्थातच अधिक चांगल्या दर्जाचा मारा आहे. इंग्लंडच्या गोलंदाजांचा अनुभव येथे कामी येणार असून दक्षिण आफ्रिकेविऊद्धच्या यशस्वी सामन्यानंतर लिन्सी स्मिथ, सोफी एक्लेस्टोन आणि चार्ली डीन हे फिरकी त्रिकुटा पुन्हा आव्हान उभे करेल. फलंदाज आणि अष्टपैलू खेळाडूंबद्दल बोलायचे झाले, तर इंग्लंडचे पारडे निश्चितच भारी आहे.
सामन्याची वेळ : दुपारी 3 वा.