लॉर्ड्सवर इंग्लंडच वरचढ, ऑस्ट्रेलियावर दणकेबाज विजय
चौथ्या वनडेत कांगांरुवर 186 धावांनी मात : मालिकेत 2-2 अशी बरोबरी : सामनावीर हॅरी ब्रुक
वृत्तसंस्था/ लॉर्ड्स
शुक्रवारी रात्री झालेल्या चौथ्या वनडे सामन्यात इंग्लंडने ऑस्ट्रेलियाचा 186 धावांनी पराभव केला आणि 0-2 पिछाडीवर असताना 2-2 अशी बरोबरी साधली. लॉर्ड्सवर झालेल्या सामन्यात हॅरी ब्रुक, लिव्हिंगस्टोन, बेन डकेट यांच्या शानदार खेळीच्या जोरावर इंग्लंडने 39 षटकांत 5 बाद 312 धावा केल्या. विजयी आव्हानाचा पाठलाग करताना कांगांरुचा डाव अवघ्या 126 धावांवर आटोपला. या मालिकेतील निर्णायक पाचवा व शेवटचा सामना दि. 29 रोजी ब्रिस्टल येथे खेळवला जाईल. विशेष म्हणजे, लॉर्ड्सवर इंग्लंडचा हा दुसरा सर्वात मोठा विजय ठरला. याआधी 1975 मध्ये इंग्लंडने भारताला 202 धावांनी पराभूत केले होते. यानंतर 49 वर्षानंतर इंग्लंडने दुसरा मोठा विजय मिळवला आहे.
लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर खेळल्या गेलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पावसाने प्रभावित झालेला हा सामना प्रत्येकी 39 षटकांचा खेळवण्यात आला. इंग्लंडच्या आघाडीच्या फलंदाजांनी कांगारूंच्या गोलंदाजांची तुफानी धुलाई केली. विशेषत: मिचेल स्टार्क, शॉन अॅबॉट आणि अॅडम झाम्पा यांना चांगलाच फटका बसला. फिल सॉल्ट आणि बेन डकेट या इंग्लिश सलामीवीरांनी इंग्लंडला संतुलित सुरुवात करून दिली. दोघांनी 48 धावांची सलामीची भागीदारी केली. सॉल्ट 22 धावा करून बाद झाला. यानंतर विल जॅकला मार्शने बाद करत इंग्लंडला दुसरा धक्का दिला.
ब्रुक, डकेटची अर्धशतके
लागोपाठ दोन गडी बाद झाल्यानंतर बेन डकेट व हॅरी ब्रुक यांनी संघाला सावरले. या दोघांनी 79 धावांची भागीदारी केली. डकेटने 62 चेंडूत 63 धावांचे योगदान दिले. ही जोडी झम्पाने तोडली. डकेटला त्याने तंबूचा रस्ता दाखवला. डकेट बाद झाल्यानंतर हॅरी ब्रूकने जेमी स्मिथसह धावसंख्या 200 च्या पुढे नेली. या दोघांनी 47 चेंडूत 75 धावांची भागीदारी केली. हॅरी ब्रुकने 58 चेंडूत 87 धावांची खेळी साकारली. ब्रुकचा अडथळा झम्पाने दूर केला. स्मिथला (39 धावा) ग्लेन मॅक्सवेलने बाद केले.
लिव्हिंगस्टोनचे 25 चेंडूत अर्धशतक
हॅरी ब्रूक बाद झाल्यानंतर लियाम लिव्हिंगस्टोन आणि जेकब बेथॉल यांनी इंग्लिश संघाची धावसंख्या 312 धावांपर्यंत नेली. शेवटच्या काही षटकात लिव्हिंगस्टोनने तुफानी फलंदाजी करताना कांगांरुची चांगलीच धुलाई केली. त्याने अवघ्या 25 चेंडूत अर्धशतक झळकावले. तो 62 धावांवर नाबाद राहिला. आपल्या खेळीत त्याने 3 चौकार व 7 षटकार लगावले. बेथेलने 12 धावा केल्या.
कांगांरु 126 धावांत ऑलआऊट
लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात चांगली झाली. सलामीवीर ट्रॅव्हिस हेड आणि कर्णधार मिचेल मार्श या जोडीने पहिल्या विकेटसाठी 68 धावांची भागीदारी केली. मार्शने 34 चेंडूंत 28 धावा केल्या. तर ट्रॅव्हिस हेडने 23 चेंडूंत 4 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 34 धावांची खेळी केली. मात्र, यानंतर डाव गडगडला. यानंतर इतर ऑसी फलंदाजांनी केवळ हजेरी लावण्याचे काम केले. इंग्लंडकडून मॅथ्यू पॉट्सने 4 आणि ब्रेडन कार्सने 3 विकेट घेत कांगारुंना 24.4 षटकांत 126 धावांवर गुंडाळले.
ऑस्ट्रेलियाचा वनडेतील चौथा मोठा पराभव
इंग्लंडविरुद्ध चौथ्या वनडेत कांगांरुना 186 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. ऑस्ट्रेलियाचा वनडे क्रिकेटमधील चौथा मोठा पराभव ठरला. याआधी ऑसी संघाचा वनडेतील सर्वात मोठा पराभव 2018 मध्ये नॉटिंगहॅममध्ये 242 धावांनी इंग्लंडविरुद्ध झाला होता.
कांगांरुचा चौथा मोठा पराभव
- 242 वि इंग्लंड, 2018
- 206 वि. न्यूझीलंड, 1986
- 196 वि. द.आफ्रिका, 2006
- 186 वि इंग्लंड, 2024.