पहिल्या कसोटीवर इंग्लंडचे पूर्ण वर्चस्व
लंका 15 धावांनी पिछाडीवर, चहापानावेळी दु. डाव 4 बाद 107
वृत्तसंस्था/मॅचेंस्टर
येथे सुरू असलेल्या पहिल्या क्रिकेट कसोटीत शुक्रवारी खेळाच्या तिसऱ्या दिवशी चहापानापर्यंत यजमान इंग्लंडने आपली स्थिती अधिक भक्कम केली आहे. इंग्लंडने लंकेवर पहिल्या डावात 122 धावांची मजबूत आघाडी मिळविल्यानंतर लंकेने दुसऱ्या डावात चहापानापर्यंत 30 षटकात 4 बाद 107 धावा जमविल्या. लंकेचा संघ अद्याप 15 धावांनी पिछाडीवर आहे.
या कसोटीत लंकेचा पहिला डाव 236 धावांवर आटोपला. त्यानंतर इंग्लंडने पहिल्या डावात 358 धावा जमवित लंकेवर 122 धावांची आघाडी मिळविली. जेमी स्मिथच्या शानदार शतकामुळे इंग्लंडला ही आघाडी घेता आली. स्मिथने 148 चेंडूत 1 षटकार आणि 8 चौकारांसह 111 तर ब्रुकने 73 चेंडूत 4 चौकारांसह 56, रुटने 4 चौकारांसह 42, वोक्सने 3 चौकारांसह 25, वूडने 1 षटकार आणि 3 चौकारांसह 22 तसेच अॅटकिनसनने 1 चौकारासह 20 धावा जमविल्या. लंकेतर्फे असिता फर्नांडोने 103 धावांत 4 तर प्रभात जयसुर्याने 85 धावांत 3, विश्वा फर्नांडोने 73 धावांत 2 आणि रत्ननायकेने 66 धावांत 1 गडी बाद केला.
इंग्लंडने 6 बाद 259 या धावसंख्येवरुन तिसऱ्या दिवशीच्या खेळाला पुढे प्रारंभ केला आणि त्यांचे शेवटचे चार गडी 99 धावांची भर घालत तंबूत परतले. इंग्लंडच्या तळाच्या फलंदाजांनी उपयुक्त धावा घेतल्याने इंग्लंडला साडेतीनशे धावांचा टप्पा ओलांडता आला.
112 धावांनी पिछाडीवर असलेल्या लंकेने आपल्या दुसऱ्या डावाला सुरूवात केली आणि चहापानापर्यंत त्यांनी 30 षटकात 4 बाद 107 धावांपर्यंत मजल मारली. सलामीचा मधुशेका खाते उघडण्यापूर्वीच वोक्सच्या गोलंदाजीवर त्रिफळा चित झाला. त्यानंतर अॅटकिनसनने कुशल मेडीसला खाते उघडण्यापूर्वी झेलबाद झाले. करुणारत्ने व मॅथ्युज यांनी तिसऱ्या गड्यासाठी 51 धावांची भागिदारी केली. वूडने करुणारत्नेला झेलबाद केले. त्याने 4 चौकारांसह 27 धावा जमविल्या. दिनेश चंडीमल 10 धावा केल्या असताना दुखापतीमुळे निवृत्त झाला. फिरकी गोलंदाज पॉटसने कर्णधार धनंजय डिसील्वाला 11 धावावर पायचित केले. मॅथ्युज 1 षटकार आणि 1चौकारासह 52 तर कमिंदु मेंडीस 1 षटकारासह 12 धावांवर चहापानावेळी खेळत होते. इंग्लंडतर्फे वौक्स, अॅटकिनसन, वूड आणि पॉटस् यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक लंका प. डाव 74 षटकात सर्व बाद 236, इंग्लंड प. डाव 85.3 षटकात सर्व बाद 358 (जेमी स्मिथ 111, ब्रुक 56, रुट 42, लॉरेन्स 30, वोक्स 25, वूड 22, अॅटकिनसन 20, असिता फर्नांडो 4-103, प्रभात जयसुर्या 3-85, विश्वा फर्नांडो 2-73, रत्ननायके 1-66)
लंका दु. डाव चहापानापर्यंत 30 षटकात 4 बाद 107 (करुणारत्ने 27, अॅन्जेलो मॅथ्युज खेळत आहे 52, चंडीमल दुखापतीने निवृत्त 10, डिसिल्वा 11, कमिंदु मेंडीस खेळत आहे 12, वोक्स, वूड, अॅटकिनसन, पॉटस प्रत्येकी 1 बळी)