पहिल्या दिवशी इंग्लंडचे वर्चस्व
भारत वि इंग्लंड तिसरी कसोटी : ब्रिटिशांच्या दिवसअखेरीस 4 बाद 251 धावा : रुट शतकाच्या उंबरठ्यावर : नितीश कुमार रेड्डीचे 2 बळी
वृत्तसंस्था/लॉर्ड्स (लंडन)
लॉर्ड्सवर सुरु असलेल्या भारताविरुद्ध तिसऱ्या कसोटी सामन्यात अनुभवी जो रुटच्या नाबाद 99 धावा आणि ओली पोप, बेन स्टोक्सच्या दमदार खेळीच्या जोरावर इंग्लंडने पहिल्या दिवशी 4 बाद 251 धावा केल्या आहेत. अँडरसन-तेंडुलकर कसोटी मालिकेतील तिसऱ्या सामन्यात भारतीय संघाने दमदार सुरुवात केली पण सुरुवातीच्या धक्क्यानंतर इंग्लंडने सावध खेळ साकारला. पहिल्या दिवशी खेळ थांबला तेव्हा जो रुट 99 तर बेन स्टोक्स 39 धावांवर खेळत होते. लॉर्ड्सवरील तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने प्लेइंग-11 मध्ये एक बदल केला आहे. जोफ्रा आर्चरला जोश टंगूच्या जागी स्थान देण्यात आले आहे. भारतीय संघातही बदल करण्यात आला आहे. प्रसिद्ध कृष्णाची जागा जसप्रीत बुमराहने घेतली.
जो रुटची धमाकेदार खेळी
नितीश कुमाररेड्डीने इंग्लंडला सुरुवातीला दोन धक्के दिले, त्याने दोन्ही सलामीवीरांना लवकरच पॅव्हेलियनमध्ये पाठवले. इंग्लंडला पहिला धक्का 43 धावांवर बसला. बेन डकेट 40 चेंडूत 3 चौकारासह 23 धावा करु शकला. त्यानंतर नितीशने जॅक क्रॉलीलाही आऊट केले. 43 चेंडूत 4 चौकारासह 18 धावा करून तो पॅव्हेलियनमध्ये परतला. दोन अडचणींनंतर, अनुभवी जो रुटने ऑली पोपसह डावाची सूत्रे हाती घेतली आणि भारताला यश मिळू दिले नाही. या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी करत संघाचा डाव सावरला. अनुभवी रुटने ऑली पोपला सोबतीला घेत एकेरी-दुहेरी धावांवर भर दिला. दरम्यान, रुटने शानदार अर्धशतकी खेळी साकारली. त्याने 109 चेंडूचा सामना करताना 7 चौकारासह नाबाद 54 धावा केल्या. पोपनेही त्याला चांगली साथ देताना 103 चेंडूत 4 चौकारासह 44 धावांची खेळी साकारली. चहापानासाठी खेळ थांबला तेव्हा इंग्लंडने 49 षटकांत 2 गडी गमावत 153 धावापर्यंत मजल मारली होती. चहापानानंतर मात्र पोपला जडेजाने बाद करत भारताला तिसरे यश मिळवून दिले. युवा फलंदाज हॅरी ब्रूकला 11 धावांवर बुमराहने तंबूचा रस्ता दाखवला. यानंतर मात्र रुट आणि कर्णधार स्टोक्सने दिवसअखेरीस आणखी पडझड होऊ दिली नाही. या जोडीने संघाला अडीचशेचा टप्पा गाठून दिला. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा जो रुट 191 चेंडूत 9 चौकारासह 99 तर बेन स्टोक्स 39 धावांवर खेळत होता.
क्रिकेटच्या पंढरीत मास्टर ब्लास्टरचा सन्मान
क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या लॉर्ड्सच्या मैदानात भारत-इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामन्याला गुरुवारपासून सुरुवात झाली. या ऐतिहासिक मैदानातील परंपरेनुसार, मास्टर सचिन तेंडुलकरनं घंटा वाजवल्यावर सामना सुरु करण्याची घोषणा केली. दरम्यान, उभय संघातील द्विपक्षीय मालिकेला अँडरसन-तेंडुलकर या दोन दिग्गजांचे नाव देण्यात आले आहे. याशिवाय लॉर्ड्सच्या मैदानातील सामन्याआधी सचिन तेंडुलकरचा खास सन्मान करण्यात आला. सामन्याआधी सचिन तेंडुलकरने एमसीसी म्युझियमलाही भेट दिली. या म्युझियममध्ये सचिनच्या हस्ते त्याच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात आले.
ऋषभ पंतला गंभीर दुखापत
प्रथम गोलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतला मैदान सोडून बाहेर जावे लागले आहे. इंग्लंडच्या डावातील 34 व्या षटकात जसप्रीत बुमराह हा गोलंदाजी करत होता. या षटकाच्या पहिल्या चेंडूवर ऑली पोप हा बुमराहचा सामना करत होता. बुमराहने टाकलेला हा चेंडू पोपच्या पॅडवर आदळला आणि तो लेग साईडच्या दिशेने गेला. चेंडू लांब जात असल्याचे पाहताच पोप आणि जो रुट यांनी धाव घेण्याचा प्रयत्न केला. हा चेंडू सीमारेषच्या जवळ जात होता. त्याचवेळी ऋषभ पंत आणि करुण नायर हे दोघेही चेंडूच्या दिशेने धावत सुटले. यावेळी पोप आणि रुट तिसरी धाव घेण्यासाठी प्रयत्न करत होते. पण त्यांना ही गोष्ट जमली नाही. त्यानंतर जेव्हा पंत हा स्टंपच्या दिशेने येत होता, तेव्हा त्याच्या बोटांना काही तरी लागल्याचे वाटले. पंतने यावेळी आपले ग्लोव्हज काढले आणि त्याच्या बोटांना दुखापत झाल्याचे समोर आले. पंतला दुखापत झाल्याचे समजताच फिजिओ मैदानात आले आणि त्याच्या बोटाला स्प्रे मारला. त्यानंतर तो यष्टिरक्षण करण्यासाठी सज्ज झाला. पण 35 व्या षटकात त्याने मैदान सोडण्याचा निर्णय घेतला. त्याच्या जागी ध्रुव जुरेल यष्टिरक्षण करण्यासाठी मैदानात उतरला आहे.
संक्षिप्त धावफलक
इंग्लंड पहिला डाव 83 षटकांत 4 बाद 251 (जॅक क्रॉली 18, बेन डकेट 23, ओली पोप 44, जो रुट नाबाद 99, हॅरी ब्रूक 11, बेन स्टोक्स नाबाद 39, नितीश कुमार रेड्डी 2 बळी, जसप्रीत बुमराह आणि रविंद्र जडेजा प्रत्येकी 1 बळी).