चौथ्या कसोटीत इंग्लंडचा वरचष्मा
तिसऱ्या दिवशी 7 बाद 544 धावा : यजमानांकडे 186 धावांची आघाडी : भारतीय गोलंदाजांची निराशा
वृत्तसंस्था/ मँचेस्टर
ओल्ड ट्रॅफर्ड येथे सुरु असलेल्या चौथ्या कसोटीत इंग्लंडने मजबूत पकड घेतली आहे. भारताची दिशाहीन गोलंदाजी आणि गचाळ क्षेत्ररक्षत्रणाचा इंग्लंडने पुरेपूर फायदा उचलला. जो रुटच्या शतकाने भारताला पूर्णपणे बॅकफूटवर फेकले. त्याआधी बेन डकेट, झॅक क्रॉली व ऑली पोप यांनी अर्धशतकी खेळी करून इंग्लंडचा पाया भक्कम केला. ओल्ड ट्रॅफर्ड कसोटीचा तिसरा दिवस हा रूटच्या नावे राहिला. हॅमस्ट्रींगमुळे रिटायर्ड हर्ट झालेला बेन स्टोक्स (नाबाद 77) पुन्हा फलंदाजीला आला अन् संघाला 550 धावांच्या नजीक घेऊन गेला. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा यजमान संघाने 7 बाद 544 धावा केल्या होत्या. स्टोक्स 77 तर डॉसन 21 धावांवर खेळता होता. इंग्लंडकडे आता 186 धावांची आघाडी आहे.
भारतीय संघाचा पहिला डाव 358 धावांत संपल्यानंतर इंग्लंडने मात्र जोरदार सुरुवात केली. सलामीवीर क्रॉली आण डकेटने 166 धावांची भागीदारी साकारली. शतकाच्या उंबरठ्यावर असताना क्रॉलीला जडेजाने बाद केले. त्याने 113 चेंडूत 84 धावा केल्या. तर डकेटचा अडथळा अंशुल कंबोजने दूर केला. त्याने 13 चौकारासह 94 धावा फटकावल्या. ही जोडी बाद झाल्यानंतर दुसऱ्या दिवसअखेरीस ओली पोप व जो रुटने आणखी पडझड होऊ दिली नाही. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडने 46 षटकांत 2 बाद 225 धावा केल्या होत्या. याच धावसंख्येवरुन त्यांनी तिसऱ्या दिवशीच्या खेळाला सुरुवात केली.
रुटचा विक्रमी शतकी धमाका, इंग्लंडला आघाडी
ओली पोप व अनुभवी जो रुटने भारतीय गोलंदाजांचा समाचार घेताना तिसऱ्या विकेटसाठी 144 धावांची भागीदारी साकारली. यादरम्यान, पोपने अर्धशतकी खेळी साकारताना 7 चौकारांसह 71 धावा फटकावल्या. मैदानात जमलेल्या या जोडीला वॉशिंग्टन सुंदरने बाद करत भारताला तिसरे यश मिळवून दिले. यानंतर फलंदाजीला आलेला हॅरी ब्रूक (3) स्वस्तात माघारी परतला. त्यालाही सुंदरनेच माघारी पाठवले. यानंतर, रुटने कर्णधार स्टोक्सला सोबतीला घेत अर्धशतकी भागीदारी करताना संघाला चारशेचा टप्पा गाठून दिला. दरम्यान, रुटने तिसऱ्या दिवशी दुसऱ्या सत्रात अंशुल कंबोजने टाकलेल्या 96 व्या ओव्हरमधील पहिल्या बॉलवर चौकार ठोकला. यासह त्याने आपले शतक पूर्ण केले. त्याचे हे कसोटी कारकीर्दीतील 38 वे तर टीम इंडियाविरुद्ध 12 वे शतक ठरले. रुटने या शतकानंतर रिकी पॉन्टिंगला मागे टाकले. यासह रुट कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज ठरला आहे.
कर्णधार स्टोक्सची महत्वपूर्ण खेळी
दरम्यान, रुटला कर्णधार स्टोक्सने चांगली साथ देताना पाचव्या विकेटसाठी 142 धावा जोडल्या. स्टोक्स 116 चेंडूंत 6 चौकारांच्या मदतीने 66 धावांवर हॅमस्ट्रींगमुळे रिटायर्ड हर्ट झाला. भारताला आवश्यक असलेली विकेट रवींद्र जडेजाने मिळवून दिली. जो रूट यष्टीचीत झाला. तो 248 चेंडूंत 14 चौकारांसह 150 धावांवर बाद झाला. त्यानंतर जसप्रीत बुमराहने आक्रमक फलंदाज जेमी स्मिथला (9) स्वस्तात माघारी पाठवले. मोहम्मद सिराजने इंग्लंडला सातवा धक्का देताना ख्रिस वोक्सला (4) बाद केले आणि रिटायर्ड हर्ट झालेला स्टोक्स पुन्हा फलंदाजीला आला. स्टोक्सने शानदार खेळी साकारताना 6 चौकारासह नाबाद 77 धावांचे योगदान दिले. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडने 7 बाद 544 धावा केल्या होत्या आणि त्यांच्याकडे 186 धावांची आघाडी होती. बेन स्टोक्स 77 धावांवर तर लिएम डॉसन 21 धावांवर नाबाद होता.
संक्षिप्त धावफलक
भारत पहिला डाव 358
इंग्लंड पहिला डाव 135 षटकांत 7 बाद 544 (झॅक क्रॉली 84, बेन डकेट 94, ओली पोप 71, जो रुट 150, हॅरी ब्रूक 3, बेन स्टोक्स खेळत आहे 77, जेमी स्मिथ 9, डॉसन खेळत आहे 21, ख्रिस वोक्स 4, वॉशिंग्टन सुंदर आणि रविंद्र जडेजा प्रत्येकी 2 बळी, बुमराहृ, सिराज, कंबोज प्रत्येकी 1 बळी).
विक्रमवीर जो रुट
इंग्लंडचा अनुभवी फलंदाज जो रुटने टीम इंडियाविरूद्ध कसोटी मालिकेत धावांसह विक्रमांचा तडाखा कायम ठेवला आहे. रुटने चौथ्या कसोटी सामन्यात शतकी खेळीसह मँचेस्टरमध्ये राहुल द्रविड आणि जॅक कॅलिस या दोघांना मागे टाकलं. रुट यासह कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा तिसरा फलंदाज ठरला. याशिवाय, श्रीलंकेचा माजी फलंदाज कुमार संगकाराच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.
- कसोटीत सर्वाधिक शतके करणाऱ्यांच्या यादीत चौथा
कसोटीमध्ये सर्वाधिक शतके झळकावण्याच्या बाबतीत जो रूट आता संयुक्तपणे चौथ्या स्थानावर आला आहे. कुमार संगकारा आणि जो रुटच्या नावावर आता कसोटीत 38 शतके आहेत. रूट यापूर्वीच कसोटीत इंग्लंडसाठी सर्वाधिक शतके झळकावणारा फलंदाज बनला आहे.
कसोटीत सर्वाधिक शतके -
सचिन तेंडुलकर - 51 शतके
जॅक कॅलिस - 45 शतके
रिकी पाँटिंग - 41 शतके
जो रूट - 38 शतके
- कसोटीत सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज
रुटने नाबाद शतकी खेळी साकारताना आणखी एक कारनामा केला आहे. रुट आता कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज ठरला आहे. त्याने ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज रिकी पॉन्टिंगला मागे टाकले. आता, सर्वाधिक करणाऱ्यांच्या यादीत त्याच्या पुढे आता फक्त सचिन तेंडुलकर आहे.
कसोटीत सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
सचिन तेंडुलकर - 15,921
जो रुट - 13,389
रिकी पॉन्टिंग - 13,378
जॅक कॅलिस - 13, 289
- रुट (104 वेळा) सर्वाधिक 50 हून धावा करण्राया फलंदाजांच्या यादीत दुस्रया क्रमांकावर आला आहे. या बाबतीत त्याने ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग (103 वेळा) यांना मागे टाकले.
- कसोटीमध्ये एका संघाविरुद्ध सर्वाधिक शतके झळकवणाऱ्या फलंदाजांच्या यादीत जो रुट तिसऱ्या स्थानावर आहे. टीम इंडियाविरुद्ध त्याने 12 शतके झळकावली आहेत. या यादीत ऑस्ट्रेलियन दिग्गज सर डॉन ब्रॅडमन अव्वलस्थानी आहेत. त्यांनी इंग्लंडविरुद्ध कसोटीत 19 शतके झळकवण्याचा पराक्रम केला आहे. गावसकरांनी वेस्ट इंडिजविरुद्ध 13 शतके झळकावल्याचा रेकॉर्ड आहे.